जागतिक वन्यजीव दिन

  36

  आज ३ मार्च, आजचा दिवस संपूर्ण जगात जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा केला जातो. वन्यजीवांची शिकार थांबवून वन्यजीव प्रजातींचे संवर्धन करणे हा या दिना मागिल मुख्य उद्देश आहे. १९७० च्या सुमाराला वन्यजीवांची शिकार, त्यांची तस्करी याचे प्रमाण वाढू लागले होते. हे प्रमाण इतके वाढले की त्यापैकी बरेचसे वन्यजीव कायमचे नष्ट होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. याबाबत जागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ( युनो ) वन्यजीव दिवस साजरा करण्याचे ठरवले. यादिवशी वन्यजीवांचे रक्षण त्यांचे संवर्धन आणि निसर्ग साखळीतील त्यांचे महत्व आदी विषयांवर जनजागृतीचे कार्यक्रम केले जातात. नामशेष होण्याच्या धोका असलेल्या वन्य सृष्टीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधन आणणारा कायदा ३ मार्च १९७३ रोजी ८० देशांनी मान्य केला म्हणून या दिवसाला महत्व आहे.
  वन्यजीवांची शिकार तसेच त्यांच्या आणि दुर्मिळ वनस्पतींचा चोरटा व्यापार ही मोठी समस्या बनली आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात ही मोठी समस्या बनली आहे. एककिडे जंगले कमी होत आहे तर दुसरीकडे शिकार आणि तस्करीमुळे वन्यजीव नामशेष होत आहे.

  निसर्गाच्या समृद्ध परंपरेचा केंद्रबिंदू म्हणजे वन्यजीव. बंगालचे वाघ, आशियातील एकशिंगी गेंडे, भारतीय मोर आणि अशा इतर वैशिष्ट्यपूर्ण वन्यजीवांचे सुरक्षित वसतिस्थान म्हणजे जंगल. पण आता याच जंगलावर मानवाने अतिक्रमण केल्याने या वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हत्ती, गेंडा आणि वाघ हे जंगलातील मुख्य वन्यजीव आहेत. निसर्ग साखळीत या वन्यजीवांचे महत्व अनन्यसाधारण आहे पण हस्तिदंत, गेंड्याचे शिंग आणि वाघाच्या शरीरातील विविध अवयव यांच्या चोरट्या व्यापाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जगभरात या व्यापारातून दरवर्षी ३५ हजार ते ७० हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या ४० वर्षात जगभरातील अर्धे वन्यजीवन धोक्यात आले आहे. वन्यजीवांचा अधिवास धोक्यात येणे, वन्यजीवांची शिकार त्यांची तस्करी अशा अनेक कारणाने वन्यजीवांची संख्या कमालीची घटली आहे. हस्तिदंतासाठी आजवर १ लाख आफ्रिकन हत्ती शिकार झाले आहेत. खवले मांजर हा जगातील सर्वाधिक मारला जाणारा सस्तन प्राणी ठरला आहे. मागील दहा वर्षात गेंड्याच्या शिकारीत कैक पटीने वाढ झाली आहे.

  वन्यजीवांच्या तस्करीमुळे कायदा आणि सुरक्षा व्यवस्था, गुन्हेगारी टोळ्यांचा निधी यासारखे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. वन्यजीवांची शिकार तसेच त्यांच्या आणि दुर्मिळ वनस्पतींचा चोरटा व्यापार स्थानिकांच्या मदतीशिवाय होणे शक्य नाही. त्यामुळे असे होऊ नये यासाठी त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. निसर्गाच्या साखळीतील प्रत्येक घटक किड्यांपासून ते हत्तीपर्यंत पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी महत्वाचा आहे. ही बाब सर्वानी ध्यानात घेतली पाहिजे. जगातील एकूण लोकसंख्येपैकी ३० टक्के लोकसंख्या तरुण आहे. विशेष म्हणजे भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के लोकसंख्या तरुण आहे. म्हणून वन्यजीव संरक्षण व संवर्धन करण्यात तरुणांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. तरुणांना वन आणि वन्यजीवांचे महत्व समजावून सांगावे त्यासाठी शाळा कॉलेजमध्ये जाऊन त्यांचे प्रबोधन करावे. तरुणांच्या हातात त्या त्या देशाचे भविष्यच नसून जगभरातील सर्व वन्यजीवांच भविष्य त्यांच्याच हाती आहे. सरकारनेही वन्यजीवांची शिकार करणारे व त्यांची तस्करी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. जंगलतोड होऊ नये यासाठी उपाय योजावेत. वन्यजीवांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी नसून कर्तव्य आहे.

  ✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५)