मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी लढा उभारावा

28

२७ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. या दिवशी संपूर्ण राज्यात उत्साहाचे वातावरण होते. या दिवसाचे औचित्य साधून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती पण दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ती फोल ठरली. संस्कृत, तामिळ, तेलगू, कन्नड, उडिया, मल्याळम या भाषांना याआधी अभिजात दर्जा मिळाला आहे. पाच हजार बोलीभाषेपासून तयार झालेली व दोन हजार वर्ष जुनी असणारी मराठी भाषा अभिजात भाषेसाठी लागणारे सर्व निकष पूर्ण करीत असूनही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळत नाही हे मराठी माणसांना पडलेले कोडे आहे. मराठी भाषा ही मराठी संस्कृतीचा अस्सल आधार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासकीय पातळीवर देखील प्रयत्न प्रयत्न झाले आहेत.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे, त्यासाठी आवश्यक ते सर्व पुरावे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सोपवले आहे त्यालाही आता सात वर्ष झाली आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली १० जानेवारी २०१२ रोजी अभिजात मराठी भाषा समिती स्थापन करण्यात आली. मराठी भाषेचे संशोधन करून व सूक्ष्म अभ्यास करुन पुरावे गोळा करण्याचे काम या समितीकडे सोपविण्यात आले होते. प्रा. रंगनाथ पठारे यांच्यासोबत हरी नरके व अन्य काही सदस्य या समितीत होते. या समितीने अतिशय सूक्ष्म अभ्यास करुन मराठी भाषा अभिजात भाषेसाठी कशी पात्र आहे याचे सर्व पुरावे गोळा करून शासनाकडे सोपवले होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास विरोध करणारी याचिकाही उच्च न्यायालयाने फेटाळली आहे, तरीही मराठी भाषा अभिजात दर्जापासून वंचित आहे.

जर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केंद्राकडून जास्तीचा निधी मिळेल त्यामुळे मराठी भाषेची उंची आणखी वाढेल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास मराठी भाषेची प्रतिष्ठा आणखी वाढेल. मराठी भाषेच्या श्रेष्ठतेवर राजमान्यतेची मोहोर उमटेल. मुख्य म्हणजे मराठी भाषेच्या विकास कार्याला अधिक चालना मिळेल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आता व्यापक प्रयत्न व्हायला हवेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारवर दबाव आणावा. महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या खासदारांनी एकत्र येऊन यासंदर्भात माननीय पंतप्रधानांची भेट घ्यावी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी माणसांना मोठा लढा उभारावा लागेल.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९२२५४६२९५