अजिंक्य चारित्र्यसंपन्न योद्धा – अद्वितीय राजा – स्वराज्यरक्षक – छत्रपती संभाजी महाराज

38

शौर्य,साहित्य आणि चारित्र्यसंपन्नतेचा आदर्श संघर्षयोद्धा स्वराज्यरक्षक संभाजीराजे होय.इतिहास हा ऐतिहासिक साधने, पुरावे यावरून लिहिला जातो. त्या इतिहासातून शोध बोध प्रेरणा घेऊन आपण पुढे मार्गक्रमण करत असतो. तथ्य आणि सत्य बाबी या वैचारिक इतिहास लिखानातून, वाचनातून पुढे येत असतात.वाचन हे व्यक्तीला माहिती मिळवून देते. चिकित्सक, वैचारिक वाचनामुळे व्यक्ती समृद्ध आणि आनंदी बनवते. त्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढला जातो. म्हणून वेळ काढून वाचूया!तसेच काव्य कादंबरी नाटक चित्रपट यापेक्षा ऐतिहासिक आणि वैचारिक वाचन करावे असे वाटते. कारण व्यवस्था आजही अप्रासंगिक, युगबाहय, कालबाहय, महाकाव्य अशा बाबीवर तुम्हांला नाचवित आहे, असे वाटते. कारण किती वाचक हे वढू बु. तुळापूर किंवा पुरंदर, रायगड गेले आहेत? वढू ला तर जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले आहे, असे वाटते. तरी आपण जागृत होऊन प्रासंगिक, योग्य बाबीवर लक्ष देवून आपला वेळ, बुद्धी, श्रम आणि पैसा खर्च कराल अशी आशा आणि विश्वास वाटतो, हेतू हाच की, जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवूया!

१-जन्म बालपण: आपल्या ३२ वर्षाच्या आयुष्यात ज्याने प्रचंड संघर्ष केला, ज्याला सवाई शिवाजी महाराज म्हणून गौरविण्यात आले त्या छत्रपती संभाजी महाराज यांचा परिचय आपण करून घेऊया. त्यांचा जन्म १४ मे १६५७ ला पुरंदर किल्ल्यावर महाराणी सईबाईच्या पोटी झाला. त्यांच्या जन्माचे खूप स्वागत झाले. सखुबाई, रानुबाई आणि अंबिका नंतरचे हे चवथे अपत्य होय. पण यातच सईबाईची प्रकृती बिघडली आणि बाळाला आवश्यक आईच दूध येईना, त्यामुळे जिजामाता यांनी कापूरहोळ येथील धाराऊ गाढे यांच्या मर्जीने त्यांची दुधआई म्हणून सोय केली. बाळ शंभू रांगत होते सव्वा दोन वर्ष वय आणि दुसरे संकट आले आई सईबाई यांचा बाळंत रोगाने ५ सप्टेंबर १६५९ ला मृत्यू झाला.वडील स्वराज्याच्या मोहिमेत आणि आईचा मृत्यू अशा अवस्थेत आजी जिजामाता यांनी त्यांच्यावर संस्कार केले.

त्यांची तल्लख बुद्धी आणि critical thinking and problem solving approch यामुळे युद्धविषयक आणि भाषा शिक्षण यात त्यांनी असामान्य प्रगती केली. बालपणीच्या खेळण्याच्या वयात आठव्या वर्षी त्यांना मुघल छावणीत ११ जून १६६५ च्या पुरंदरच्या तहानुसार बापाशिवाय जामीन ओलीस म्हणून रहावे लागले. मुघलांचा पंचहजारी मनसबदार म्हणून व्हावं लागलं. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान यांच्या सोबत रहात असतांना चर्चा संवाद यांत त्यांच्या बुद्धीची चुणूक याने हे दोघेही प्रभावित होतं. त्यावर खूश होऊन दिलेरखानाने त्यांना एक हत्ती भेट दिला. लगेच प्रश्न केला की,”शंभू आप इतने छोटे हो और हाथी इतना बडा इसे आप कैसे लेकर जायेंगे?बाळ शंभू बाणेदारपणे उत्तर देते, खानसहाब, यह हाथी है जो चलता हिलता है ईसे हम लेकर जायेंगे, लेकिन हमारे जो २३ किल्ले आपको तह में दिये है, वह न हिलते है, न चलते है, उसे आप कैसे लेकर जायेंगे?
खानाची बोलती बंद!

वय ९ वर्ष ५ मार्च १६६६ ला तहाच्या अटीनुसार औरंगजेब बादशहाच्या भेटीला आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाल शम्भू यांना जावे लागते. त्याठिकाणी अपमानास्पद वागणूक यामुळे शाही दरबारातून हे पिता पुत्र निघून येतात, त्यामुळे बादशहा त्यांना नजरकैदेत टाकतो. यातून शिताफीने शिवराय आणि शंभू निसटून येतात. मात्र ही बातमी माहीत होते आणि दोघांनी सोबत पसार होणे यात अडचणी येतात म्हणून बाल शंभूला मथुरेत ठेवतात. महाराज संन्याशी वेशात १२ सप्टेंबर १६६६ ला सुखरूप रायगडावर पोहचतात. त्यावेळी शंभू कुठे आहे? तर उत्तर शंभूचे प्रवासात निधन झाले आहे, त्यांचे मृत्यूनंतरचे विधी ही ते रायगडावर उरकून घेतात. त्यामुळे बादशाहाची शोध मोहीम थांबते! पुढे दोन महिने आठ दिवसांनी २० नोव्हेंबर १६६६ ला शंभूराजे रायगडावर सुखरूप पोहचतात.
२-सांस्कृतिक दहशत संपवून साहित्यलेखन: शंभूराजे राज्यकारभारात लक्ष घालत. विविध भाषा, राज्यकारभार, आणि लष्करी शिक्षण यांत ते पारंगत झाले होते.वय १३ वर्ष असतांना २६ जानेवारी १६७१ ला त्यांना स्वतंत्र कारभार पाहण्यासाठी जबाबदारी देण्यात आली.

याचवर्षी रायप्पा महार याचे शौर्य पाहून शिवरायांच्या भरदारबारात त्याचा सत्कार केला. पुढे त्याला आपल्या खास सहकारी म्हणून जबाबदारी दिली. पुढे दहा हजार सैन्याचे नेतृत्व देण्यात आले.वय १४ वर्ष असतांना बुधभूषण हा संस्कृत मधील अतिशय मौलिक ग्रंथ लिहला. जो क्रांतिकारक आणि मार्गदर्शक ठरला. ज्यांनी वेळ काढून तो लिहून सांस्कृतिक साहित्य निर्मिती केली. आम्ही वारस म्हणून किमान तो वाचवा तरी! ज्यात ते म्हणतात,

“जे दैववादी ते नामर्द* *जे प्रयत्नवादी तेच मर्द”* (५८वा श्लोक बुधभूषण)

यातून आम्ही मावळे म्हणून घेत असू तर वर्तन तपासावे लागेल!
पुढे त्यांनी हिंदी भाषेत नायिकाभेद, नखशिख आणि सातसतक हे ग्रंथलेखन केले. ज्यात संत कबीर, संत रविदास, संत नामदेव या संतांच्या विचारांचा प्रभाव आहे. त्यांचा गौरव करतांना काशीचे पंडित गागाभट यांनी त्यांचा “सनयन” हा ग्रंथ शंभूराजे यांना अर्पण केला आहे.वयाच्या १६ व्या वर्षी ६ जुन १६७४ ला शिवराज्याभिषेक वेळी युवराज म्हणून हक्क, अधिकार व जबाबदारी देण्यात आली. त्यावेळी अनेक दूत यांच्या सोबत त्या भाषेत त्यांनी संवाद साधला. यात उदाहरण म्हणून ब्रिटिश प्रतिनिधी हेंरी ऑक्सिडेन सांगता येईल. शंभूराजे बहुभाषा पारंगत होते.लागलीच १५ व्या वर्षी त्यांनी आदिलशाही मुलखावर स्वारी करून गोवळकोंडा, भागानगरी (हैद्राबाद) स्वराज्यात सामील केले. तसेच शिवरायांच्या नितीनुसार १३ डिसेंबर १६७८ ला शंभूराजे यांना दिलेरखान यास मिळतात.त्यावेळी ते विजापूर ताब्यात घेण्यासाठी कूच करतात. मध्येच दिलेरखान भूपाळगडावर हल्ला करून स्त्रिया आणि रयतेला त्रास देतात त्यामुळे त्यांचे दिलेरखान सोबत खटके उडतात.

त्यामुळे दिलेरखान शंभूराजे यांना संपविण्याचा बेत करतो. ही बाब माहीत होताच शंभूराजे शिताफीने निसटून २१ डिसेंबर १६७९ ला स्वराज्यात पन्हाळगडावर पोहचतात. १२ जानेवारी १६८० ला त्याच ठिकाणी राजसदरेत शिवराय आणि शंभूराजेची तीन वर्षानंतर भेट होते.3-अष्टप्रधानातील पंताची कुटील कट: स्वराज्याला शिस्त लावण्यासाठी शंभूराजे प्रत्येक काम पूर्णपणे झोकून देऊन करत. ते परखड स्पष्टवक्ते होते. त्यांना कारभारात हयगय, प्रजेचे दुःख, हाल, त्यांच्यावर अन्याय सहनच होत नसे. शिवनीती जी “रयतेचे राज्य” यासाठी ते प्रसंगी कुणाचीही गय करत नसे. अण्णाजीपंत दत्तो यांच्या हिशोबातील आर्थिक घोळ शंभूराजे यांनी पकडून तसेच त्यांचे इतर गैरव्यवहार उघड पाडून त्यांना समज दिली. त्यामुळे त्यांनी शंभूराजे यांच्या विरोधात कुटीलकट रचायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी मोरोपंत पिंगळे, राहुजीपंत सोमनाथ, निराजीपंत रावजी यांनाही सहभागी करून घेतले.

त्यांनी त्यात शिवराय विषप्रयोग करणे, शंभूराजे चारित्र्यहनन करणे, त्यांच्या बाबत त्यांना जीवित मारणे, तसेच शिवराय, महाराणी सोयराबाई यांच्या कडे शंभूराजे बाबत सतत तक्रारी करणे, त्यांच्यात दुही निर्माण करणे असे कुटील डाव खेळत राहिले. ज्यात शिवरायांच्या निधनानंतर (विषप्रयोग) ३ एप्रिल १६८० ही बातमी शंभूराजे सह इतरांना माहिती होवू नये यासाठी गडाचे दरवाजे बंद करून घेतात. शंभूराजे यांच्या गैरहजेरीत अंत्यविधी उरकुन घेतात. त्यांना निरोप ही देत नाहीत, ही बाब लपवून ठेवतात. महाराणी सोयराबाई यांना आमिष दाखवून या पंतांचा पूर्ण ताबा राहील या हिशोबाने २१ एप्रिल १६८० ला दहा वर्षाच्या राजाराम यांस राजगादीवर बसवून शंभूराजे यांना अटकेचे आदेश काढतात.सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मात्र ही बाब पटत नाही, ते या पंतांनाच अटक करून शंभूराजे पुढे हजर करतात. पुढे १६ जानेवारी १६८१ ला शंभूराजे यांचा राज्याभिषेक होतो. कट करणाऱ्या पंतांना शंभूराजे माफी देतात. परंतु सवय जात नाही, ते शंभूराजे यांना अन्नातून विषप्रयोग कट साधतात, परंतु तो एका सैनिकामुळे उघड होतो.

पुढे हे पंत तर औरंगजेब पुत्र अकबर यास खलिता पाठवून त्यास संभाजीस ठार करावे तुला स्वराज्यातील काही हिस्सा देवू! परंतु हा खलिता तो शंभू राजाकडे पाठवितो. त्यावेळी मात्र शंभूराजे हा स्वराज्यद्रोह न्यायाने अण्णाजीपंत, सोमाजीपंत, आवजीपंत यांना हत्तीच्या पायाखाली देतात.४- सतत रणझुंजार योद्धा – वयाच्या 23 व्या वर्षी राजगादीवर बसल्यानंतर शंभूराजे यांना बादशहा औरंगजेब याच्या कुटील डावामुळे मोगल, इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच या पाच सत्ता सोबत युद्ध संघर्ष करावा लागला. १४० अजिंक्य लढाया लढलेला हा योद्धा.काबुल ते बंगाल आणि काश्मीर ते भीमा नदी अशी सत्ता ज्याची तो मोगल बादशहा औरंगजेब म्हणजे प्रचंड फौज, शस्त्रे, दारूगोळा, सरदार, रसद, संपत्ती आणि पाचशे वर्षाची सत्ता परंपरा असणारा. ज्याने सहा महिन्यात १६८६ ला आदिलशाही संपविली तर नऊ महिन्यात १६८७ ला कुतुबशाही संपविली. पण ज्याला स्वराज्याशी एकोणाविस वर्ष संघर्ष करावा लागला अन स्वतः ही इथेच संपला. संभाजीराजे यांनी त्याच्या सोबत सतत ९ वर्ष संघर्ष केला. एक रामसेज किल्ला घेण्यासाठी त्याला ५ वर्ष लागले. ज्याने शंभूराजे पराक्रमाचा धसका घेऊन डोक्यावरची पगडी उतरविली! शिवराज्य संपवित नाही तो पर्यंत पगडी घालणार नाही!

शंभूराजे डीचोळी, कुडाळ येथे दारूगोळा कारखाने उभारतात, त्यासाठी पोर्तुगीज यांच्याकडुन स्फोटाची दारू मागवतात. भारतातील पहिला तोफखाना शंभूराजांनी बनविला. तसेच मुंबई बंदर व इतर व्यवहार संदर्भात इंग्रज गव्हर्नर केजविन सोबत वाटाघाटी करतात. संभाजी राजे रायगड ते बुऱ्हाणपूर धरणगाव, जालना, बिदर, म्हैसूर येथे छापे घालतात.५- फंदफितुरीने कैद- संभाजीराजे पराभूत होत नाहीत या विचाराने औरंगजेब हैराण झाला. जंग जंग पछाडले तरी यश येत नाही. त्याने फितुरीचे डाव फेकले. त्यात वतने प्रचंड संपत्तीचे आमिष दिले. यात त्याचा डाव साधला. शंभूराजे पन्हाळा -विशाळगड यांचा चोख बंदोबस्त करून न्याय निवाड्याच्या निमित्ताने २०० सैन्य तुकडीसह संगमेश्वर येथे आहेत ही बातमी कळताच मुकरबखान त्याचा मुलगा इखलासखान ३ हजार सैन्य घेऊन पोहोचला. त्याने वेढा दिला. सरसेनापती मालोजी घोरपडे लढता लढता कामी आले. अचानक झालेल्या हल्ल्यात शम्भूराजे, कवी कलश १ फेब्रुवारी १६८९ ला पकडले गेले.तेथून त्यांना बहादूरगडाला नेले. तुळापूर येथे त्यांचे प्रचंड हाल करून मनुस्मृतीनुसार जीभ कापणे, डोळे काढणे, कान, त्वचा काढण्यात आली. हलाहल करून त्यांना मारले, ११ मार्च १६८९ ला त्यांचा अंत झाला. त्यांचे शीर धडावेगळे करून त्यांच्या शरीराचे तुकडे करून वढू च्या रानात फेकून देण्यात आले. धाडस करून ते तुकडे एकत्र करून गोविंद गोपाळ महार आणि सहकारी यांनी अंत्यसंस्कार केले. फितुरीत श्रीधर रायरीकर ,रंगनाथ स्वामी, केसो त्रिमल, प्रल्हाद निराजी यांचा समावेश होता.

६ – इतिहासातून आपण धडा घेऊया
संभाजीराजे यांची राजमुद्रा श्री शम्भो:शिव जातस्य,

मुद्रा धौरिव राजते।
यदंकसेविनो लेखा,
वर्तते कस्य नोपरि।।

याचा अर्थ शिवाजीराजे यांचे पुत्र संभाजीराजे यांची ही मुद्रा आकाशाप्रमाणे शोभा देत आहे. तिचे अंक स्वीकार कारणारांचा पगडा कोणावर पडणार नाही.? संत तुकाराम महाराज यांचा मुलगा महादजी यास देहूत आश्रय देऊन वार्षिक मोईन अनुदान सुरू करतात. संत तुकाराम महाराज पालखी देहू ते पंढरपूर सुरू करतात. चिंचवडेच्या मोरेश्वर गोसावी यांना संरक्षण तर केळशीच्या अवलिया फकीर बाबा यांना वर्षासन कायम केले. तसेच दुष्काळी परिस्थिती मध्ये सारा माफी केली. तसेच पडीक जमीन वहितीसाठी सहाय्य केले. शेती सिंचन सोयीसाठी, विहिरीसाठी मदत केली. पशुपालन प्रोत्साहन दिले. त्यासाठी चराईक्षेत्र साठी सनदा दिल्या. फ्रेंच प्रवासी अबे करे म्हणतात, संभाजी महाराज हे “शिवरायापेक्षा काकणभर अधिक सरस होते. तसेच सैन्याला त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास अधिक आनंद असे.”

छत्रपती संभाजी महाराजांचा युद्ध भूमीवरील पराक्रम इथल्या पुरोहितशाहीने दडवून ठेवला तसच त्यांचे साहित्याच्या क्षेत्रातील योगदान सुद्धा दडवून ठेवण्याचे काम यांनी केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी युद्धभूमीवर जसी तलवार चालवली तसंच साहित्याच्या क्षेत्रात सुद्धा वयाच्या १४ व्या वर्षा पासून लेखणी चालविण्याचे काम केले आहे. संभाजी राजेंना पणजोबा मालोजीराजें पासून जसा तलवारीच्या पराक्रमाचा वारसा प्राप्त झाला तसाच भोसले कुळातून लेखणीचा वारसा प्राप्त झाला होता. शंभूराजेच्या साहित्याच्या क्षेत्रातील कार्याचा उल्लेख तुकोबारायांच्या गाथेत बघायला मिळतो.संभाजी महाराजांचे हे चार ग्रंथ सध्या पूर्ण स्वरूपात उपलब्ध नसून त्रोटक स्वरूपात आहेत. एकीकडे हजारो वर्षाच्या स्मृती, पुराणे, वेद जतन केल्या जातात तर चारशे वर्षा पूर्वीचे संभाजी महाराजांचे ग्रंथ उपलब्ध असू नयेत. ही ग्रंथ संपदा नष्ट करणारे नक्की ज्यांनी स्वराज्य नष्ट करुन पेशवाई आणली ते पेशवेच असू शकतात. महाराजांनी या व्यतिरिक्त विपुल साहित्य संपदा लिहिली असेल परंतु त्याचे योग्य जतन न झाल्यामुळे आपणास एका महान ज्ञानापासून मुकावे लागत आहे.

संभाजी महाराज गागाभटाचे गुरु : छत्रपती संभाजी महाराजांचे पंडित्य सांगण्यासाठी, त्यांचे गुण वर्णन करण्यासाठी, त्यांच्या ज्ञानाला वंदन करण्यासाठी त्या काळातील जागविख्यात काशीचे ब्राम्हण पंडित गागाभट यांनी संस्कृत भाषेत समयनय हा ग्रंथ लिहून हा ग्रंथ गागाभटाने संभाजी राजेंना अर्पण केला होता.. त्यावेळी संभाजी राजेंचे वय फक्त १८ वर्षाचे होते. एका वयोवृद्ध पंडिताने १८ वर्षाच्या तरुणाला आपला ग्रंथ अर्पण करावा यातच संभाजी महाराजांची विद्ववता दडलेली आहे. राज्याभिषेका प्रसंगीच्या धार्मिक चर्चेत गागा भटाला राजेंची विद्वता प्रखरतेने जाणवली होती. म्हणूनच एका तरुण पण विद्यासंपन्न पंडित छत्रपती संभाजी राजेंना समयनय हा ग्रंथ अर्पण करून गुरुस्थानी मानले होते. काही कलमकसाई यांनी काव्य, कादंबरी, नाटक, चित्रपट यातून शंभूराजे यांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले. यात वसंत कानेटकर यांनी गोदावरी हे थोराताची कमळा, आत्माराम पाठारे याने तुळसा नावाचे काल्पनिक पात्र नाटकात रचली. ही सर्व पात्र अनैतिहासिक आहेत. राम गणेश गडकरी, बेडेकर, पुरंदरे, भावे, सावरकर हे त्यांना व्यसनी दाखवितात, जे स्पष्टपणे खोटे आहे. चारित्र्यसंपन्न राजा म्हणून गौरव करावा असे शंभूराजे.

आपल्या एकमेव पत्नीचा येसूबाई, “श्री सखी राज्ञी जयति” असा गौरव करतात. तर आपल्या वडिलांचा शिवराय आणि आपल्या माता यांचा शब्दप्रमाण मानून त्याप्रमाणे वागतात. शक्य असेल तर स्वराज्यरक्षक संभाजी, तसेच चांगदेव खैरमोडे लिखित चरित्रावर आधारित महानायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीज्योती या मालिका पहाव्यात! त्यात बरीच सत्यता आहे. विनंती की आपण शंभूराजे यांचे चरित्र समजून घेऊन त्यांच्या कृतीविचारांचा वारसा अंगीकृत करून विचारांचे प्रचारक बनून पुढे जाऊया. असे महान साहित्यिक छत्रपती संभाजी महाराज या भारत भूमीत जन्माला आले, हे आपणास किती गौरवास्पद आहे. अशा महान साहित्यिकास स्मृतीदिनी विनम्र अभिवादन..!

✒️संकलन:-आबासाहेब राजेंद्र वाघ(संयोजक – बहुजन क्रांति मोर्चा,धरणगांव)मो:-9422941333