शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आयोजन केंद्र सरकार विरोधात २६ मार्चला उपोषण

    36

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    चंद्रपूर(दि.23मार्च):- कृषी विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील १०० दिवसांपासून देशभरातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. दुसरीकडे महागाईने देशात उच्चांक गाठला आहे. मात्र, केंद्रातील सरकार काहीही बोलण्यास तयार नाही. शेतकरी संघटनांनी २६ मार्चला भारत बंदचे आयोजन केले आहे. या आंदोलनाला पाठींबा म्हणून काँग्रेसच्या वतीने संपूर्ण देशात उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

    त्यामुळे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्या नेतृत्वात गिरनार चौकात सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान उपोषण केले जाणार आहे.

    तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी मागील १०० दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. आतापर्यंत ३०० हुन अधिक शेतकरी शहिद झाले आहेत. केंद्र सरकारने आधी चर्चेचा देखावा केला. मात्र आता या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने आधीपासूनच पाठींबा दर्शविला आहे. काँगेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार देशभर अनेक आंदोलने करण्यात आली. खासदार राहुल गांधी यांनी पंजाब, हरियाणा याज्यात ट्रॅक्टर रॅली काढून सहभाग दर्शविला. काँग्रेसच्या पुढाकारातून सुमारे ६० लाख शेतकऱ्यांच्या सहीचे निवेदन राष्टपतींना पाठविले आहे.

    तर, दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव दिवसागणिक वाढत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधडीला लागणार आहेत. मात्र, केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांनी केले आहे.