🔺पोलीस बंदोबस्त, सीसी टिव्हीची मागणी

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.2एप्रिल):- शहरासाठी गोदापात्रात कच्चा बंधारा बांधून पाणीसाठा जतन करून ठेवण्यात आला आहे. हा पाणीसाठा सोडून देण्याचे प्रयत्न सुरू असून या पाण्याचे विविध ऊपाय योजून सरंक्षण करावे, अशी मागणी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी केली आहे. शहर वासीयांची तहान भागवणारे हे एकमेव पाणी सोडण्यात आल्यास तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्याचा ईशारा यादव यांनी निवेदनातून दिला आहे.

जुन्या गंगाखेड शहराला सध्याही आठ दिवसांआड पाणी पुरवठा केला जातो. नगर परिषदेच्या वतीने गोदावरी पात्रात कच्च्या पद्धतीने बंधारा बांधुन साठवणूक केलेल्या पाण्यातून हा पाणीपुरवठा केला जातो. सध्याचा हा पाणीसाठा मे महिण्यापर्यंत पुरणारा असून यानंतर शहरात तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई निर्माण होणार आहे. पण, तत्पूर्वीच काही यंत्रणांकडून हा पाणीसाठी सोडून देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे ऊघडकीस आले आहे. रात्री – अपरात्री पाणी अनधिकृतपणे सोडून देण्याची शक्यता गृहीत धरत येथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तथापी, या संप्ताहात सदर बंधारा फोडण्याच्या हालचाली वाढल्याचे दिसत असल्याने कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी हे पाणी वाचवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

आज गंगाखेडचे तहसीलदार तथा नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी स्वरूप कंकाळ यांची प्रत्यक्ष भेट घेवून यादव यांनी हे पाणी शहरासाठी अत्यंत महत्वाचे असून ते विविध ऊपाययोजना करत जपण्याची मागणी केली आहे. बंधारा परिसरात वाढीव पोलीस बंदोबस्त लावून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची चोवीस तास निगराणी ठेवावी, रात्री अनधिकृतपणे पाणी सोडले जावू नये म्हणून येथे लाईटची व्यवस्था करावी व या भागात सीसी टिव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशा मागण्या त्यांनी निवेदनातुन केल्या आहेत. गंगाखेड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचा पदभार सध्या तहसीलदार स्वरूप कंकाळ यांचेकडेच असल्याने त्यांनी दुहेरी भुमिका बजावत हे पाणी वाचवावे अन्यथा निर्माण होणाऱ्या पाणीटंचाई आणि परिस्थितीस सर्वस्वी मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांचे विरोधात तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन छेडण्याचा ईशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर गोविंद यादव यांचे सह कॉंग्रेस शहराध्यक्ष शेख युनूस, भाकपचे तालुका सरचिटणीस ओंकार पवार, सरवर भाई आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाच्या प्रती जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलीक, जिल्हाधिकारी डॉ. दीपक मुगळीकर, ऊपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांना देण्यात आल्या आहेत.

*खालच्या गावांसाठी पाण्याची मागणी*
गंगाखेड शहराच्या खालच्या भागातील काही गावांकडून हे पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदार कंकाळ यांचेशी चर्चा झाली. सध्याचा ऊपलब्ध पाणीसाठा कमी आहे. हे पाणी सोडले तरी त्या गावांची पिण्याचे पाणी आणि शेतीसाठीच्या पाण्याची पुर्तता होवू शकणार नाही. म्हणून खालच्या भागातील गावांसाठी खडका बंधाऱ्यातून अतीरीक्त पाणी सोडण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याची माहीती गोविंद यादव यांनी दिली आहे.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED