अख्खं धुळं पालथं घातलं, व्हेंटिलेटर बेड मिळालाच नाही, अखेर हवालदिल कुटुंबाचा परराज्यात जाण्याचा निर्णय

23

🔸कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. धुळ्यात तर प्रचंड भयानक परिस्थिती आहे

✒️प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे,वेल्हाणे धुळे)

धुळे(दि.8एप्रिल):- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. धुळ्यात तर प्रचंड भयानक परिस्थिती आहे. धुळे, जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यांसह राज्यातील अनेक भागांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध होणं कठीण होऊन बसलं आहे. त्यामुळे आता तेथील रुग्णांना नातेवाईकांकडून थेट परराज्यात उपचारासाठी येत आहे. धुळ्यात एका कोरोनाबाधित महिलेला व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने या महिलेला थेट मध्य प्रदेशातील रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

🔺नेमकं प्रकरण काय?

धुळ्यात कोरोनामुळे प्रचंड भयानक परिस्थिती आहे. कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्स मिळणं कठीण झालंय. याशिवाय रेमडेसिव्हीर इंजेक्शनची प्रचंड कमतरता भासताना दिसत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नेमकं काय करावं? हे रुग्णाच्या नातेवाईकांना सूचत नाही. धुळ्यात 25 वर्षीय बाला खैरनार या महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर व्हेंटिलेटर बेड मिळत नव्हता. तिची प्रकृती खालवल्याने अखेर तिच्या कुटुंबियांनी तिला मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ शहरातील एका रुग्णालयात दाखल केलं.

*धुळ्यात सगळे व्हेटिंलेटर बेड्स फुल*

धुळ्याच्या बाला खैरनार या महिलेला कोरोनाची लागण झाल्याने तिला सुरुवातीला शहारातील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती नाजूक असल्याने तिला व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता होती. यासाठी तिच्या नातेवाईकांनी शहरातील सर्व रुग्णालये पिंजून काढले. मात्र, कुठेही व्हेंटिलेटर बेड मिळाला नाही. कोरोनाबाधित महिलेच्या नातेवाईकांचा संपूर्ण दिवस हा व्हेंटिलेटर बेड शोधण्यात गेला. महिलेची प्रकृती खालावत असल्याने तिच्या नातेवाईकांनी अखेर तिला थेट मध्य प्रदेशच्या भोपाळ येथील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला.

*महिलेची प्रकृती स्थिर*

विशेष म्हणजे संबंधित महिला ही नुकतीच प्रसूती झाल्यानंत तिला कोरोनाची लागण झाली होती. त्या महिलेला व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता होती. पण हॉस्पिटल प्रशासनाच्यावतीने व्हेंटिलेटर बेड उपलब्ध न झाल्याने अखेर नातेवाईकांनी रुग्णाला मध्य प्रदेशातील भोपाळ येथे हलवले. सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे.

*जिल्हा प्रशासनाचा दावा खोटा?*

धुळे जिल्ह्यात व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजनच्या बेड्सचा तुटवडा भासत असल्याने रुग्णांना गुजरात तसेच मध्य प्रदेशकडे उपचारासाठी जावे लागत आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन जिल्ह्यात कुठेही रेमडेसिव्हीर इंजेक्शन किंवा व्हेंटिलेटरची कमतरता नाही, असा दावा करत आहे. तर दुसरीकडे रुग्णांना उपचारासाठी गुजरात आणि मध्य प्रदेशात जावं लागत आहे.

*हॉस्पिटल प्रशासनाकडून स्पष्टीकरण*

दरम्यान, सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित महिला 31 मार्चला रुग्णालयात दाखल झाली होती. तिची ऑक्सिजन लेव्हल आधीच कमी असल्याने तिला व्हेंटिलेटर लागेल, असे सांगण्यात आले होते. दिवसेंदिवस तिची परिस्थिती खालावत गेल्याने तिच्या नातेवाईकांना हॉस्पिटल प्रशासनने तिला व्हेंटिलेटर असलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा, असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी आपल्या स्वइच्छेने त्यांचा डिस्चार्ज घेतला, असं हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

*धुळे जिल्ह्यातील व्हेंटिलेटरची स्थिती नेमकी काय?*

धुळे मनपाच्या क्षेत्रातील 21 खाजगी रुग्णालयात 50 व्हेंटिलेटर असून ते सर्व हाऊसफुल आहेत. 500 ते 600 बाधित रुग्णांवर त्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. तर हिरे मेडिकल रुग्णालयात 50 व्हेंटिलेटर उपलब्ध असून त्या सर्व व्हेंटिलेटरवर बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयातील 11 व्हेंटिलेटर हे अपुऱ्या मनुष्यबळाअभावी धूळ खात पडले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसात व्हेंटिलेटर सुरू करण्याचे आदेश देऊनही व्हेंटिलेटर सुरू झाले नसल्याचे चित्र धुळ्यात पहावयास मिळत आहे. याशिवाय बाधित रुग्णाच्या संख्येच्या तुलनेत रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुडवडा भासत असल्याने रुग्णांचा जीव देखील जात आहे.