जागतिक कोकणी भाषा दिन

    37

    आज ९ एप्रिल आजचा दिवस जागतिक कोकणी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठीची धाकटी बहीण म्हणून कोकणी भाषा ओळखली जाते. कोकणी भाषा म्हणजे गोव्याची भाषा असा एक समज आहे कारण कोकणी ही गोव्याची राजभाषा आहे. गोव्याशिवाय महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळातील काही भागात कोकणी भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. कोकणी राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात भाषा म्हणून समाविष्ट झाली आहे. कोकणी ही एकसंध बोलीभाषा नसून तिच्यात एकूण आठ प्रकार गणले जातात. गोव्यात बोलली जाणारी कोकणी भाषा ही त्यापैकीच एक असून तिच्यात ख्रिश्चनांची कोकणी आणि हिंदूंची कोकणी असे दोन प्रकार आहेत. ख्रिश्चनांच्या कोकणीवर पोर्तीगीज भाषेचा प्रभाव आहे.

    महाराष्ट्रातील कोकण भागात बोलली जाणारी कोकणीही वेगळी आहे. शिवाय वारली, कोणकोणी, डांगी, चित्पावणी, मालवणी वैगरे अन्य बोलीभाषा कोकणाच्या उपभाषा आहेत. इंडो आर्यन भाषांत कोकणी ही सर्वात दक्षिण टोकाकडील भाषा आहे. तिचे नाते मराठी व गुजरातीशी आहे. कर्नाटक आणि केरळमध्ये बोलल्या जाणाऱ्या कोकणी भाषेत द्रविड भाषेतील अनेक मूळ शब्द आहेत. कोकणी बोली भाषा असणाऱ्या लोकांची संख्या एक कोटीच्या घरात आहे. कोकणी ही मराठीची जवळची भाषा असल्याने तिला स्वतंत्र भाषेचा दर्जा द्यावा का याबाबत मतभिन्नता आहे. अनेकजण कोकणी ही मराठीचीच उपभाषा असल्याने तिला स्वतंत्र भाषेचा दर्जा देऊ नये या मताचे आहेत तर कोकणी भाषेचे अभ्यासक व जाणकार कोकणी ही स्वतंत्र भाषा असल्याचे ठामपणे सांगतात.

    हा वाद लवकर संपणार नाही कारण दोन्ही भाषा सारख्याच आहेत. अगदी साध्या गोष्टी बघितल्या तरी ते आपल्या लक्षात येईल मराठीतील मला या शब्दाला कोकणीत म्हाकां असे म्हणतात, मराठीत इकडे, इथे तर कोकणीत होतो,हांगा. कोकणी आणि मराठी भाषा जवळजवळ सारखीच आहे. कोकणी जर सावकाश बोलली तर कोणत्याही मराठी माणसाला त्याचा अर्थ सहज समजेल. कोकणी भाषा ही जगातील सर्वात गोड भाषेपैकी एक आहे. कोकणी भाषेत बोलणे तसेच कोकणी भाषा ऐकणे ही एक मौजच आहे. कोकणी भाषेसारखा आपलेपणा इतर कोणत्याच भाषेत नाही म्हणूनच कोकणी भाषा सर्वांना आपली भाषा वाटते.

    कोकणी भाषेला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला आहे. कोकणी भाषेतील जेष्ठ साहित्यिक रवींद्र कोळेकर यांना २००६ साली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोकणी भाषेचा जास्तीतजास्त प्रसार आणि प्रचार व्हावा हा जागतिक कोकणी भाषा दिनाचा मुख्य उद्देश आहे. हा उद्देश सफल व्हावा हीच सदिच्छा व्यक्त करून कोकणी भाषा बोलणाऱ्या सर्व लोकांना जागतिक कोकणी भाषा दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो.

    लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५