चार..चार..चार घ्या चार…” चार हे एका जंगलातील फळाचे नाव आहे..

29

थंडीचा गारवा कमी होताच सूर्य आग ओकायला सुरुवात करतो.. पानझड होऊन सर्व वृक्षांनी नवीन पालवी फुटायला सुरुवात होते.. यात रानातील पळस आणखीनच बहरून येतो.. आणि वसंत ऋतू चे आगमन होते… आणि आंब्याच्या कच्चा कैऱ्याचा सुवास चहू बाजूला पसरेला असतो आणि उन्हाची दाहकता सुद्धा वाढलेली असते… अश्या भर तप्त दुपारी सगळे रस्ते ओस पडलेले असताना सर्वत्र शांतता असताना कानावर अलगद एक आवाज येतो….. “चार..चार..चार घ्या चार…” चार हे एका जंगलातील फळाचे नाव आहे..

मैनाबाई देवाजी नारनवरे वय अंदाजे 55 ते 60 वर्षे रा.नवखळा ता.नागभीड डोक्यावर एक बांबूच्या कमच्या पासून बनलेला टोपला त्यात हिरवी पाने आणि त्याच्या आत चाराची ताजी फळे.. मैनाबाई यांचा कपाळाचा कुंकू दहा वर्षाआधी मिटला…. या जगात कोण कुणाचा असतो.. मैनाबाई या आपल्या मुलाच्या मुलीसोबत राहतात.. कधी कुळ्याचे फुल तर धान भाजी,कधी पिंपळ बार तर पातूर ची भाजी अश्या विविध रानभाज्या ऋतुमानानुसार आपल्या टोपल्यात घेऊन नागभीड मधील काही ठराविक कॉलोनी मध्ये विकून आपला पोट भारतात..’आत्मनिर्भर’ या बाणा त्यांच्या अंगी केव्हाचाच.. तेव्हा कोणी सध्या परिस्थिती मध्ये येऊन त्यांना आत्मनिर्भरतेची व्याख्या सांगणे म्हणजे सूर्याला प्रकाश दाखवणे असे होईल..!!
मैना बाई शिकलेल्या नाहीत पण ‘वक्तशीरपणा’ आणि ‘श्रमप्रतिष्ठा’ ही मानवी मूल्ये अनुभवाच्या शाळेतून त्यांच्या अंगी भिनलेली आहेत..

अगदी पहाटेला उठायचे रानात जायचे ऋतूनुसार जो रानमेवा वनातून आणायचा असेल तो आणायचा आल्यावर घरातील सर्व कामे करून दोन घास पोटात टाकून आणलेला रानमेवा टोपल्यात घेऊन तो आमच्या पर्यन्त पोहचवण्याचा फार मोठे कष्ट त्या घेत असतात… हल्ली विषाक्त भाजीपाल्याच्या जगात हा रानमेवा-रानभाज्या म्हणजे मानवी शरीराला मिळालेलं एकप्रकारचा टॉनिक च समजावे लागेल…!!जंगलातून हे सगळे आणताना त्यांना अनेकदा आपले जीव धोक्यात घालून काम करावे लागते.. सर्प, विंचू, जंगली जनावरे,वाघ यासारख्या प्राण्यापासून आपला जीव वाचवून हे सगळे कार्य करावे लागते..!!मैनाबाई या आमच्या घरी खूप प्रसिद्ध आहेत त्यांनी कोणती वस्तू आणली आणि आम्ही घेतली नाही असे होत नाही.. आमची लहानगी स्निग्धा (बिट्टू) त्यांचा चार.. म्हणून आवाज आला की चारवाली आई आली म्हणत भांड घेऊन धावत जाणार आणि सोबत एक ग्लास पाण्याचा ही देणार…!!

गेल्या मार्च महिन्यात या जगात कोरोना विषाणू ने हाहाकार माजवला.. अनेक लोकांच्या नौकरी गेल्या,व्यवसाय बुडाले अनेकांनी याचा धसका घेत आत्महत्या केल्या तर अनेकांची मानसिक स्थिती खराब झाली मात्र या मैनाबाई कडे पाहून पुन्हा एकदा नव्याने जगण्याची इच्छा निर्माण होते…!!कुणाचीही साथ नसताना जगण्यासाठीची तिची धडपड,कष्ट आणि त्यातही तिची समाधानाची बाब.. ही मनाला फार भावून जाते..सगळ्यांच्या मनात वेदना असतात.. मैनाबाई यांच्या वडिलांकडे सुद्धा दहा एकर शेती होती मात्र शेती नसलेल्या व्यक्तीसोबत यांचे बालपणीच लग्न लावून दिले याची खंत त्यांच्या मनात अजूनही आहे.. मात्र फाटलेल्या जिंदगीला रोजचे शिवत जात जगणे आता त्यांना चांगले जमले आहे.. आहे त्या परिस्थितीला सामोरे जात दुःखाचे फारसे भांडवल न करता सुखाने प्रत्येक क्षण शिवत जायचा असे त्यांचे जीवन जगण्याचे साधे गणित आहे..!!

✒️लेखक:-पराग भानारकर(नागभीड,मो:-8275294552)

(लेखक हे सरस्वती ज्ञान मंदिर नागभीड येथे सहायक शिक्षक असून ते आपुलकी फाऊंडेशन नागभीड चे संस्थापक संचालक आहेत लेखन हा त्यांचा आवडता विषय आहे.)