महापुरषांप्रती कृतज्ञता आणि भारतीयांची मानसिकता

    46

    (भिमराव परघरमोल)

    महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या आंदोलनामुळे ज्या-ज्या समाजघटकांचे भले झाले. ज्यांना-ज्यांना सुखाचे दिवस प्राप्त होऊन सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, पैसा, नोकरी, तथा शिक्षण मिळाले. आज तोच समाज त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे की कृतघ्न? हा गंभीर आणि चिंतेचा विषय होऊन बसला आहे. विषय केवळ कोण्या एका जातीपुरता मर्यादित नसून या देशातील समस्त बहुजन समाजाचा, म्हणजेच पूर्वीच्या शूद्रातिशूद्रांचा, आजच्या महिलांसह अनुसूचित जाती-जमाती, भटके, विमुक्त, आणि इतर मागास वर्गीयांचा आहे.

    वरील समाज घटकांपैकी अस्पृश्य (अतिशूद्र) आजचे अनुसूचित जाती-जमाती (एससी,एसटी) यांच्या स्वातंत्र्यपूर्व म्हणजेच मनुस्मृतिकालीन जीवनाचे वर्णन करताना आंबेडकरी चळवळीतील महान साहित्यिक, कवी वामनदादा कर्डक आपल्या काव्यपंक्तीमध्ये म्हणतात-

    होते कोटी कोटी, इथे अर्धपोटी l
    ल्यावयाला होती एका वितेची लंगोटी l
    त्याच जातीमध्ये हिरा जन्मला भिमाईच्या पोटी l
    अंबाडवे गाव त्याचे आंबेडकर नाव l
    तोच झाला भल्याभल्यांचा राव l

    त्यांच्या या काव्यपंक्तींवरून आपल्या असे लक्षात येते की, भारतातील मनुवादी, ब्राह्मणवादी तथा विषमतावादी व्यवस्थेने एका विशिष्ट वर्गाला अस्पृश्य ठरवून त्यांना मागास ठेवले होते. तसेच त्यांना त्यांच्या नैसर्गिक हक्क अधिकारांपासून वंचित ठेवून त्यांचे सर्वांगाने शोषण करण्यात ती धन्यता मानत होती.
    पुढे आणखी एका काव्यपंक्तीमध्ये वामन दादा म्हणतात-

    गावामधलं शीळं खरकटं आणीत होती आजी l
    नव्हती राजी तुझ्या कुळीला ताजी भाकर भाजी l
    अंग झाकायला मुरदयावरचे आणीत होती कपडे l
    तरी बिचारे अंग तयाचे अर्धे-निर्धे उघडे l
    भीम कृपेने तुझ्या बिऱ्हाडी येती रेशीम साड्या l
    ओळख भीमाला वेड्या, आता ओळख भीमाला वेड्या l

    अशी अल्प जनहिताय, अल्प जनसुखाय असलेली समाजव्यवस्था कोणीही आपणहून स्वतःच्या जीवनात ओढवून घेणार नाही. तर त्या व्यवस्थेच्या टोकावरील विराजमान लोक आपल्यातीलच दबलेल्या-कुजलेल्या दलित वर्गाला घृणीत वागणूक देऊन, त्यांनी ताजं सेवन करणे, नवीन वस्त्र परिधान करणे, शिक्षण घेणे, पायात चपला बूट घालणे यासह अनेक मानवी हक्क अधिकारापासून वंचित ठेवत, त्यांना पशुतुल्य वागणूक देऊन ते मानवच नसल्याचे वेळोवेळी सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते.तर पूर्वीचे शुद्र आजचे इतर मागास वर्गीय (ओबीसी) यांच्यावर लादलेली, त्यांचा अनन्वित छळ मांडणारी अशी ही अमानवी तथा मानवा-मानवा मध्ये भेद निर्माण करणारी व्यवस्था कोणी निर्माण केली? या प्रश्नाचे उत्तर शोधताना त्याचे मूळ आम्हाला धर्मग्रंथांमध्ये दिसून येईल. त्यासाठी मनुस्मृती मधील एकाच स्लोकाकडे कटाक्षदृष्टी टाकूया. जेणेकरून कावेबाज व्यवस्थेची मखलाशी लक्षात येण्यास मदत होई

    शक्ती नापेही शुद्रेन कार्यो धनसंचय: l
    शुद्रो ही धनमासाध्य ब्राह्मण्यनेव बाधते l l
    (अ. क्र.१०, स्लो. क्र.१२९)

    (शूद्रांकडे धनाचा आणि ज्ञानाचा संचय होता कामा नये, असे झाल्यास ते ब्राह्मणांना बाधक ठरते)
    निसर्ग नियमानुसार सर्व मानव समान असताना वर्णव्यवस्था, क्रमिक असमान जातीयता, अस्पृश्यता, गैरबराबरी, स्त्रियांची गुलामगिरी, विषमता निर्माण करणाऱ्या या व्यवस्थेशी चार्वाक-बुद्धा पासून तर अनेक संत महापुरुषांनी कडवी झुंज देऊन तिच्या भींती खिळखिळ्या करण्यासाठी आजीवन संघर्ष करून आपली हयात संपवण्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. अर्वाचीन काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशेआठ वर्षांच्या कालावधीचा आवर्जून आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते. कारण त्यांच्यामुळेच आजचा बहुजन समाज सुटा-बुटात दिसत असून त्यांना सुखाने आणि सन्मानाने दोन घास गिळायला मिळत आहेत. हे ऐतिहासिक सत्य नाकारण्यास कोणीतरी धजावेल असे वाटत नाही.

    भारतीय समाज विघातक प्रचलित समाजव्यवस्थेला आरपार बदलण्यासाठी बहुजन समाजाच्या हाती शिक्षणाचे शस्त्र असले तरच बदल होऊ शकेल. असा महात्मा ज्योतिराव फुले यांचा ठाम आणि भक्कम विश्वास होता. म्हणून त्यांनी त्यासाठीच कुटुंबासह आपली हयात खर्ची घातली. शाहू महाराजांनी महात्मा ज्योतिराव फुलेंना अपेक्षित असणारी समतावादी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आपल्याच राजसत्तेला कलाटणी देऊन, रूढीवादी व्यवस्थेविरुद्ध अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यामुळे त्यांना आपल्या आयुष्याची किंमत चुकवणे भाग पडले.
    महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज यांच्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रातिशूद्रांना सर्वांगाने सुखी करण्यासाठी आपल्या आयुष्याचा भला मोठा हिस्सा कामी लावला. भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये उच्चवर्णीयांच्या ज्या काही पुरोगामी आणि प्रतिगामी चळवळी झाल्या त्यापैकी एकानेही अस्पृश्य तथा महिलांसह शूद्रातिशूद्रांच्या गुलामीच्या बेडीलाही स्पर्श केल्याचे ऐकिवात नाही.

    तर मग त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मूलगामी निर्णय घेणे किती दुरापास्त?
    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात प्रथम १९१९ मध्ये देशातील संपूर्ण नागरिकांसाठी प्रौढ मताधिकाराची मागणी केली होती. ते फक्त मागणी करूनच थांबले नाही, तर गोलमेज परिषदांमध्ये त्यांनी इंग्रजांशी भांडून २० ऑगस्ट १९३२ ला जातीय निवाड्यान्वय ती मागणी आपल्या पदरात पाडून घेतली. नंतर स्वतंत्र भारताच्या संविधानामध्ये अनुच्छेद ३२६ नुसार त्याचा अंतर्भाव केेला.१९१८ मध्ये त्यांनी स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देयर रेमीडीज हे पुस्तक लिहून देशातील शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना मांडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांसाठी कोणत्या सुधारणा कराव्या? सरकारचे उत्तरदायित्व काय? शेतकऱ्यांनी शेतीसह कोण-कोणते जोडधंदे करावे? शासनाने शेतीला उद्योगाचा दर्जा प्रधान करावा जेणेकरून त्यांना चोवीस तास वीज आणि पाण्याचा पुरवठा करता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणातील खोती पद्धत नष्ट करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबई विधासभेमध्ये काही बीलं सादर करून, मोर्चे काढून अनेक परिषदांमधून शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केले.

    आज देशाला लोकसंख्येचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३८ साली मुंबई विधिमंडळामध्ये मांडलेले कुटुंबनियोजनाचे बिल पास झाले असते तर आज भारतामध्ये लोकसंख्येचा विस्फोट होऊन विकासाच्या आड येणाऱ्या समस्यांचा डोंगर उभा राहिला नसता.१९४२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यपूर्व काळात व्हॉइसरायच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मजूर, बांधकाम, पाटबंधारे आणि ऊर्जा या चार खात्यांचे मंत्री असताना, एक हजार वर्षानंतर भारताची लोकसंख्या किती असेल? त्यांची विजेची आणि पाण्याची मागणी किती असेल? याचा आराखडा तयार करून नदीजोड प्रकल्प योजना म्हणजे बारमाही वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कोरड्या नद्यांमध्ये वळते करणे. महापूर येणाऱ्या नद्यांवर धरणे बांधून त्या पाण्याचे नियोजन करून शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, त्यावर अक्षय ऊर्जा प्रकल्प, जलमार्ग, सुट्टीच्या दिवशी जीवनाचा आनंद घेण्यासाठी वॉटर पार्क निर्माण करण्याचा त्यांचा मानस होता. त्याच वेळी त्यांनी कामगार व कर्मचाऱ्यांचे हितरक्षण करणारे पंचवीस कामगार कायदे तयार करून त्यांची अंमलबजावणी सुरू केली होती.

    महिलांविषयी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अतिशय संवेदनशील होते कारण धर्मग्रंथांच्या माध्यमातून हजारो वर्षांपासून त्यांना त्यांच्या नैसर्गिक आणि मानवी हक्क अधिकारांपासून वंचित ठेवलेले होते. म्हणूनच त्यांनी हिंदू कोडबिल व भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांची एकही समस्या बाकी ठेवली नाही.अशाप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या चाळीस वर्षांच्या आंदोलन कालावधीमध्ये देशातील विविध समस्यांवर तथा अनेक आघाड्यांवर संघर्ष करून प्रत्येक समाज घटकांचे हितसंवर्धन केल्याचे स्पष्ट दिसून येते. तरीही काही असामाजिक लोकांनी व्यवस्थेच्या रक्षकांनी त्यांना जातीबंदिस्त करण्याचे यशस्वी प्रयत्न केल्याचे दिसून येतात. परंतु बहुजनांसह देशाच्या विकासाचे श्रेय त्यांच्यावाचून कोणालाही देता येत नाही. जरी कोणी देशाचे नेते, राष्ट्रपिता, महात्मा, लोकमान्य, किंवा भटमान्य असले तरीही. कारण वरील पैकी कोणत्याही कार्याचा साधा ठरावही आपल्या सभासंघटनांच्या बैठकीमध्ये मांडल्याचा किंवा पास केल्याचा पुरावा दिसून येत नाही. म्हणूनच त्यांच्या कार्याचा गौरव करताना आंतरराष्ट्रीय दर्जाचे इतिहासकार रामचंद्र गुहा त्यांना *आधुनिक भारताचे निर्माते* ( Makers of Modern India) म्हणून संबोधतात. अशा महापुरुषांप्रती प्रत्येक भारतीयाने कृतज्ञ असावे. तरच त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा खरा सन्मान होऊन तेच त्यांना विनम्र अभिवादन असेल!……

    ✒️लेखक:-भिमराव परघरमोलव्याख्याता तथा अभ्यासक
    फुले शाहू आंबेडकरी विचारधारा तेल्हारा जि. अकोला मो.९६०४०५६१०४