कामगार कल्याण: बाबासाहेबांचे भरीव योगदान

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज, १४ एप्रिल २०२१ रोजी १३० वी जयंती साजरी होत आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या बाबासाहेबांनी केलेले कामगार कल्याण विषयक कायदे व कार्य आजही आपल्याला उपयुक्त आहेत.
भारतात पहिला कामगार दिन मद्रास येथे (आताचे चेन्नई ) १ मे १९२३ रोजी डाव्या विचार सरणीच्या किसान पार्टी ऑफ हिंदुस्थान या संघटनेनं कॉम्रेड मलयपूरम सिंघवेलू चेट्टीयार यांच्या नेतृत्वाखाली पाळला. यावेळी विविध प्रकारच्या मागण्या मांडण्यात आल्या. त्यातील एक प्रमुख मागणी होती, ती म्हणजे कामाचे तास १६ वरून ८ करणे ही होय. प्रत्यक्षात ही मागणी मान्य व्हायला अनेक वर्षे लोटली. आणि याचं श्रेय आहे,ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कामगार नेते असलेल्या बाबासाहेबांची ब्रिटीश सरकारने व्हॉइसरॉय एक्सिकुटिव्ह कॉनसिलचे सदस्य म्हणून ७ जुलै १९४२ रोजी नेमणूक केली.

तेव्हा पासून कामगार कल्याण विषयक अनेक कायदे, योजना बाबासाहेबांनी लागू केल्या. खरं म्हणजे हा सर्व आढावा या लेखात घेणं शक्य नाही,स्वतंत्र ग्रंथाचा तो विषय आहे . म्हणून इथे आपण निदान तोंड ओळख तरी करून घेऊ या. बाबासाहेबांनी कामगार कल्याण विषयक कायदे आणि योजनांची संख्या २५ पेक्षा जास्त आहे. यातील काही प्रमुख म्हणजे त्यांनी कामगारांचे कामाचे तास ८ केले.समान काम समान वेतन या तत्वानुसार स्त्री पुरुष यांच्या वेतनात समानता आणली.

स्त्रियांना बाळंतपणाची रजा लागू केली. कामगार राज्य विमा योजना, आरोग्य योजना, कामगार कल्याण निधी, भविष्य निर्वाह निधी, कामगार संघटना मान्यता, किमान वेतन हमी, महागाई भत्ता, कामगारांना कौशल्य प्रशिक्षण, महिला व बाल कामगारांना संरक्षण मिळण्यासाठी कायदा, खाणीत काम करण्यास महिलांना बंदी, महिला कामगार कल्याण निधी, भर पगारी रजा, सेवा योजना कार्यालये, अशा अनेक बाबींचा समावेश आहे. बाबासाहेब केवळ कामगार नेतेच नव्हते तर निष्णात कायदे पंडित होते. इंग्लंड, अमेरिकेत उच्च शिक्षण घेतल्यामुळे त्यांचा तिकडील कामगार चळवळी, कायदे, योजना यांचा चांगला अभ्यास होता.

कामगार कल्याणाची तळमळ, कायदे करण्याचे ज्ञान,मिळालेली संधी याचा त्यांनी सुरेख उपयोग करून देशातील कामगारांना कायमस्वरूपी लाभ मिळवुन दिले. १९४२ ते १९४६ अशी ४ वर्षांची त्यांची कारकीर्द देशातील कामगार कल्याणावर कायमचा ठसा उमटवून गेली.त्यांच्या या थोर कामगार कल्याण कार्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

✒️लेखक:-देवेंद्र भुजबळ(मो:-9869484800)

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED