कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पत्रकारांना निर्बंधातून सवलत द्यावी

23

🔸प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.15एप्रिल):- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी फक्त अधिस्विकृतीधारक पत्रकार नाही तर सरसकट पत्रकारांना बातमी संकलनासाठी कडक निर्बंध व संचारबंदीतून सवलत देऊन नवीन आदेश पारित करावा अशी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. राज्यात वाढत असलेली कोरोना रुग्ण संख्या कमी करण्यासाठी १ मे पर्यंत कडक निर्बंध, संचारबंदी व १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

यामध्ये आपण फक्त अधिस्विकृतीधारक पत्रकारांना बातमी संकलनासाठी सवलत दिलेली असून त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे मग त्यांनाच सवलत का देण्यात आली यामुळे राज्यातील इतर सर्व पत्रकारांनी संताप व्यक्त केला आहे. ‘ब्रेक द चैन ‘ कोरोनाची साखळी तोडायची असेल तर प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडियातील सर्व पत्रकारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून संचार बंदी व कडक निर्बंधातून या पत्रकारांना सवलत देऊन बातमी संकलनाची परवानगी द्यावी तरच कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे.

त्यामुळे फक्त अधिस्विकृतीधारक पत्रकारच नाही तर सरसकट पत्रकारांना बातमी संकलनासाठी कडक निर्बंध व संचारबंदीतून सवलत द्यावी अशी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.