कुंभमेळ्यात कोरोनाचा स्फोट

20

देशात कोरोनाचा उद्रेक होत आहे. देशात दररोज दोन लाखांच्या वर कोरोना बाधित रुग्ण सापडत असताना उत्तराखंडची राजधानी हरिद्वार येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत होत असलेल्या कुंभमेळ्यातही कोरोनाने शिरकाव केला आहे. कुंभमेळ्यात कोरोनाने नुसता शिरकाव केला नसून कुंभमेळ्यात कोरोनाचा स्फोट झाला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही कारण अवघ्या पाच दिवसांत सतराशेहुन अधिक भाविक तसेच साधुसंत कोरोनाने बाधित झाले आहे. कोरोनामुळे महानिर्वाण आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे निधन झाले आहे. कुंभमेळ्यात होणारा कोरोनाचा वाढता प्रसार पाहून दोन आखाडयांनी कुंभमेळ्यातुन माघार घेतली आहे त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे. हरिद्वारमध्ये दर बारा वर्षाने कुंभमेळा भरतो. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा म्हणून कुंभमेळ्याकडे पाहिले जाते. कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक उपस्थित राहतात. यावर्षीही ३० लाखांहून अधिक भाविक कुंभमेळ्यास उपस्थित राहतील असा अंदाज आहे.

कुंभमेळ्याचे धार्मिक महत्व मान्य करूनही सध्याच्या परिस्थितीत कुंभमेळ्याला परवानगी देणे योग्य नव्हते असेच जनसामान्यांचे मत आहे. भारतात कोरोनाने थैमान घातले असताना, सामाजिक विलगिकरणाची आवश्यकता असताना हा कुंभमेळा वाजतगाजत साजरा केला जात आहे. कुंभमेळ्याचे फोटो समाज माध्यमात व प्रसार माध्यमात प्रसारित होत आहेत. कुंभमेळ्यात होणारी गर्दी पाहता तिथे सामाजिक अंतर पाळले जाणे अशक्यच आहे. मास्कचा वापरही कोणी करताना दिसत नाही त्यामुळे कुंभमेळ्यात कोरोनाचा स्फोट होणे साहजिकच आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने कुंभमेळ्यास परवानगीच द्यायला नको होती पण सरकारने कुंभमेळ्यास परवानगी तर दिलीच उलट कुंभमेळ्यास येण्यासाठी भाविकांना २५ रेल्वेगाड्यांची सोय केली. एककिडे पंतप्रधान जनतेला सामाजिक अंतर राखा, मास्क वापरा, गर्दी टाळा असे आव्हान करतात तर दुसरीकडे कुंभमेळ्यासारख्या गर्दी जमवणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देते हा विरोधाभासच आहे.

सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच धार्मिक कार्यक्रमावर बंदी आणली आहे. जत्रा, यात्रा यासारख्या धार्मिक कार्यक्रमावर बंदी आहे. सण उत्सव साजरा करण्यावर निर्बंध लादले आहेत. देशातील सर्व मंदिरे कुलूपबंद आहेत मग कुंभमेळ्यालाच परवानगी का? कुंभमेळ्यासारख्या लाखो भाविकांची गर्दी जमवणाऱ्या धार्मिक मेळ्याला परवानगी दिल्यास कोरोना कसा जाणार? कोरोना विरुध्दचे युद्ध जिंकण्यासाठी सर्वसामान्य जनतेला नियम निर्बंध आखून द्यायचे आणि स्वतःच त्या नियम निर्बंधाची पायमल्ली करायची याला काय म्हणावे. कुंभमेळ्यात कोरोनाचा महास्फोट झाला तर देशभर कोरोनाचा फैलाव होऊ शकतो तसे झाल्यास ती देशासाठी मोठी आपत्ती ठरेल, तसे होऊ द्यायचे नसेल तर सरकारने कुंभमेळ्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा. कुंभमेळा रद्द करणे शक्य नसल्यास तो स्थगित करावा किंवा ते ही शक्य नसेल तर कुंभमेळ्यात होणारी गर्दी रोखण्यासाठी प्रयत्न करावेत.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)