कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णसंख्या लक्षात घेता हिंगणघाट येथे कोविड रुग्णालय सुरू करा- माजी आमदार प्रा.राजू तिमांडे

26

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.२१एप्रिल):-वर्धा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व बाधित रुग्ण संख्या लक्षात घेता हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे कोविड रुग्णालय सुरू करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे ,पालकमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

वर्धा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि बाधित रुग्णसंख्या लक्षात घेता भविष्यात जनतेसाठी वैद्यकीय सुविधा कमी पडणार नाही या दृष्टिकोनातून हिंगणघाट येथे कोविड रुग्णालय सुरू करण्यात यावे अशी मागणी त्या वेळी करण्यात आली.सध्याच्या परिस्थितीत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून वैद्यकीय सेवा कमी पडत आहे. नागपूर ,वर्धा, अमरावती जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना भरती करण्यासाठी बेडची व्यवस्था नाही. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण हतबल झाले आहे.

सरकारी दवाखान्यात डॉक्टर, व्हेंटिलेटर, बेड ,नर्स इत्यादीची व्यवस्था नसल्यामुळे वैद्यकीय सेवा मोडकळीस आली आहे. तसेच प्रायव्हेट दवाखान्यात जागा उपलब्ध नसल्यामुळे बाधित रुग्णांची हेळसांड होत आहे.हिंगणघाट येथे शहराच्या बाहेर नागपूर रोडवर मातोश्री सेलिब्रेशन हॉल तयार असून दोन माळ्यात १५००० स्क्वेअर फुट मध्ये बांधकाम आहे. या ठिकाणी उत्तम व्यवस्था होऊ शकते.
तरी भविष्यात कोविड रुग्णांची वाढ लक्षात घेता हिंगणघाट येथे रुग्णालयाची लवकरात लवकर व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या वतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे,पालकमंत्री सुनील केदार ,जिल्हाधिकारी वर्धा व जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा यांना मागणी केली आहे.
—————————————-
प्रतिक्रिया :- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व बाधित रुग्णसंख्या लक्षात घेता हिंगणघाट येथे कोविड रुग्णालय सुरू झाल्यास बाधित रुग्णांना उपचारासाठी बाहेर न नेता हिंगणघाट येथेच उपचार व सुख सुविधा उपलब्ध होईल. भविष्यात जनतेसाठी वैद्यकीय सुविधा कमी पडणार नाही आणि रुग्णांची हेळसांड होणार नाही यासाठी हि मागणी केली आहे.
-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे