पर्यावरण ऱ्हासास जबाबदार कोण?

[आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस]

आज जगभरात दि.२२ एप्रिल हा दिवस जागतिक पृथ्वी दिन अथवा जागतिक वसुंधरा दिवस – वर्ल्ड अर्थ डे म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात दि.२२ एप्रिल १९७० पासून झाली. यामागे खूपच हृदयद्रावक अशी घटना आहे. खरे पाहता इ.स.१९६९ मध्ये सांता बारबरा, कॅलिफोर्निया येथे तीस लाख गॅलेन तेलाच्या गळतीमुळे दहा हजार सी बर्ड्स, डॉल्फिन मासे, सील आदि समुद्री जीव मरण पावले. याच्या विरोधात अमेरिकी सीनेटर गेलॉर्ड नेल्सनने पर्यावरणाच्या रक्षणासाठी दि.२२ एप्रिल १९७० रोजी दोन कोटीहून अधिक अमेरिकन विद्यार्थी व प्राध्यापकांसमवेत मोठे आंदोलन केले होते. याआधी पृथ्वीवर एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलन कधीच झाले नव्हते. या आंदोलनाला देशभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. ज्यामुळे हा दिवस आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.

पृथ्वीवरील कितीतरी प्रकारचे सजीव नष्ट झाले. वैविध्यपूर्ण वृक्ष, वेली, पशू व पक्षी यांचा तळपट बसला. आपल्या सकाळ संध्याकाळ दृष्टीस पडणारे कावळा व चिमणी हे तर दुरापास्तच झाले आहेत. गिधाडे तर केव्हाचीच नामशेष झालीत. नदी नाल्यातील पाण्याची धार – प्रवाह हिवाळ्यातच आटून जात आहेत. उन्हाळ्यात पाण्यासाठी पात्रात कितीही मोठा खोल खड्डा खोदला तरी पाणी गावायचे नाही. या सर्व गोष्टींना जबाबदार कोण? हलकट, हावरा, लोभी व स्वार्थी असलेला आणि संपूर्ण सजीवांचा राजा म्हणून मोठ्या दिमाखात मिरवणारा हा माणूस! त्याच्या उपद्व्यापामुळेच पर्यावरण नेस्तनाबूत होत चालला आहे. मात्र एक दिवस झालेला हा पर्यावरणाचा ऱ्हास त्याला सळो की पळो करून त्याचे अस्तित्वच टिकू देणार नाही, एवढे मात्र नक्की! जागतिक पृथ्वी दिनानिमित्त टाळा पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या या गोष्टी आणि जपा वसुंधरेचे पावित्र्य. त्यामुळे पर्यावरणासाठी जर त्या काळात एवढे मोठे आंदोलन होऊ शकते तर सद्य स्थितीत लोक या गोष्टी का विसरून वागत आहेत? आज ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. याची जाणीव प्रत्येकास असावयास हवी.

पर्यावरणासाठी जर त्या काळात एवढे मोठे आंदोलन होऊ शकते तर सद्य स्थितीत लोक या गोष्टी का विसरून आहेत. आज ग्लोबल वॉर्मिंग मुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. याला खऱ्या कारणीभूत गोष्टी अशा – १) पृथ्वीवरील सूक्ष्म जीवांचा आणि पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास सर्वाधिक जबाबदार आहे तो आपला प्लास्टिकचा वापर! त्यामुळे सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन करुन प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. २) ग्लोबल वॉर्मिंग – पृथ्वीचे वाढते तापमान हा पृथ्वीवरील सर्वात मोठा धोका आहे. ज्याला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. ३) औद्योगिकीकरणामुळे कार्बनडाय ऑक्साइड उत्सर्जित केला जातो. तसेच फ्रिज, कंम्प्यूटर, स्कूटर, कार आदि गोष्टींमधून हा गॅस पर्यावरणात सोडला जातो. त्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे. ४) तसेच गेल्या काही वर्षात मोट्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे. स्वर्गातील नंदनवनालाही लाजवेल असे या वसुंधरेचे सौंदर्य व लावण्य पार रसातळी मिसळले गेले आहे. ही सुंदरा वसुंधरा आता ओक्साबोक्शी रडते आहे. त्याचे हे महापातक माणसाही डुबवू पहात आहे. अतिवर्षा, आम्लवर्षा, अल्पवृष्टी, हिमस्खलन, भूकंप, ज्वालामुखी, कोरोनासारखी महामारी, आदी नैसर्गिक आपदा मानवास याची जाणिव करून देत आहे. तरीही तो कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन आपल्याच तालात बेतालपणे वावरत आहे.

अरे माणसा ऐक जरा! जागा होऊ पहात असशील तर सर्वात आधी वृक्षतोड थांबवून जास्तीत जास्त तू झाडे लावली पाहिजेत. कारण झाडांमधून आपल्याला ऑक्सिजन मिळते. जे सर्व सजीवांसाठी अत्यंत गरजेचे आहे. तसेच पर्यवारणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. आधुनिक उपकरणांचा वापर नियंत्रणात ठेवला पाहिजे.
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे जागतिक वसुंधरा दिनाच्या सर्वांना जाणिव जागृतीपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
(मराठी साहित्यिक)मु. पो. ता. जि. गडचिरोली (९४२३७१४८८३).

गडचिरोली, महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED