गंगाखेड शहरवासीयांच्या पाण्यावर दरोडा

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी

गंगाखेड(दि.30एप्रिल):-प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत शहरासाठी आवश्यक असेलेले पाणी शिल्लक ठेवून ऊर्वरीत पाणी खालच्या भागातील गावांसाठी सोडण्याचे ठरले होते. पण गंगाखेड नगर परिषदेने तयार केलेला कच्चा बंधारा आज अज्ञात लोकांनी मधूनच फोडला आहे. प्रशासनाच्या माघारी गंगाखेड शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्यावर दिवसाढवळ्या पडलेला हा दरोडाच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी व्यक्त केली आहे.

काही लोक बंधारा फोडत असल्याचे जागरूक नागरिकांनी कळवताच आपण तहसीलदार तथा न. प. मुख्याधिकारी स्वरूप कंकाळ, पाणी पुरवठा अभियंता मयुरी पाटील यांचेशी संपर्क साधला. त्यांना पाणी सोडण्यात येत असलेबाबत काहीही माहीती नव्हती. याचा अर्थ नप प्रशासनाला न विचारता करण्यात आलेले हे बेकायदा कृत्य आहे. यामागे असणाऱ्यांचा शोध घेवून त्यांचेविरूद्ध कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी गोविंद यादव यांनी केली आहे.

कच्चा बंधारा मधुनच फोडण्यात आल्याने येथून भरपूर पाणी वाहून गेले आहे. उरलेले पाणी ऊन्हाळा संपेपर्यंत शहराला पुरेल की नाही, याबाबत शंका निर्माण झाल्या आहेत. आजच्या घटनेस संपुर्णतः न. प. प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप गोविंद यादव यांनी केला आहे. आपल्याला आवश्यक तेवढा पाणीसाठा संरक्षीत करून शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. भविष्यात ती व्यवस्थित पार न पाडल्यास मुख्याधिकारी आणि पाणीपुरवठा अधिकारी यांचे विरोधात आंदोलन केले जाईल. तसेच गंगाखेड शहरासाठीच्या पाणी संरक्षणात अपयशी ठरलेल्या संबंधीत अधिकाऱ्यांविरूद्ध कारवाईसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही गोविंद यादव यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED