कोरोना नियंत्रणात लॉकडाऊनचे शहरी भागात चांगले परिणाम

54

🔸रुग्ण संख्या कमी होईल त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

येवला(दि.3मे):-विश्रामगृह येथे येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक पार पडली.यावेळी येवला नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर,जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, प्रांत अधिकारी सोपान कासार, डॉ. अर्चना पठारे, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, तहसीलदार प्रमोद हिले, तहसीलदार शरद घोरपडे, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शरद कातकाडे, बीडीओ डॉ.उन्मेष देशमुख, संदीप कराड, ग्रामीण पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, वसंत पवार, दीपक लोणारी, ज्ञानेश्वर शेवाळे, सुनील पैठणकर, मकरंद सोनवणे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

लॉकडाऊन झाल्यापासून शहरी भागातील रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र ग्रामीण भागात अद्यापही रुग्णवाढ होतांना दिसत आहे त्यामुळे सर्व यंत्रणांनी रुग्णसंख्या कमी कशी होईल त्यादृष्टीने काटेकोर नियोजन करण्यात यावे, अशा सूचना दिल्या आहेत.

ऑक्सिजनची कमतरता होऊ नये यासाठी ऑक्सिजनचा आवश्यक साठा रुग्णालयात ठेवण्यात यावा. डॉक्टर तसेच इतर कर्मचारी मनुष्यबळाची कमतरता असलेल्या केंद्रांवर तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे. बंद असलेले व्हेंटिलेटर तातडीने सुरू करण्यात यावेत. ड्युरा आणि जम्बो सिलेंडरची आवश्यकता असल्यास आपली मागणी कळविण्यात येऊन उपलब्ध ते करून घेण्यात यावेत. शहरात प्रत्येक वार्डात नगरसेवकांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन तपासणी मोहीमेस सहकार्य करावे. गृहविलीगिकरण यशस्वी रित्या पार पाडावे. त्याचबरोबर लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सर्वांनी आता आपापली जबाबदारी लक्षात अथक प्रयत्न करावेत.

तालुक्यातील खरीप हंगामाचा घेतला आढावा.

खरीप पिंकांच्या नियोजनाबाबत कृषी विभागाकडून केलेल्या नियोजनाचा आढावा घेऊन तालुक्यात खते, बियाणे यांचा साठा मुबलक प्रमाणात करण्यात यावा. तसेच खरीप हंगामाची तयारी पूर्ण करण्यात यावी असेही निर्देश यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.