सायकल स्नेही मंडळातर्फे अरविंद खारकर यांना श्रध्दाजंली अर्पण

21

🔸अरविंदच्या निधनाने सायकल स्नेही मंडळाचे नुकसान भरून न निघणारे – बंडोपंत बोढेकर

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.17मे):-सायकल स्नेही मंडळाचे कार्यकारिणी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते अरविंद माणिकराव खारकर ( वय ४१) यांचे कोरोना आजाराने परवा रात्री दुःखद निधन झाले व काल त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते गडचिरोली महिला महाविद्यालयात लिपीक म्हणून कार्यरत होते तसेच गडचिरोली सायकल स्नेही मंडळाचे संघटक होते. गेल्या दोन वर्षापूर्वी ते या सायकल चळवळीसोबत उत्स्फुर्तपणे जुळले होते. मंडळाच्या साप्ताहिक जनजागृती रॕलीचे आयोजनात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता .वृक्षारोपण ,अंधश्रध्दा निर्मुलन , गरजुंना मदत आदी कामातही ते सहभागी होत असे.ते मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील शेणगाव येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात त्यांना लहान मुलगा ,पत्नी आणि मोठा आप्तपरिवार आहे.

अरविंद खारकर यांचे सायकल स्नेही मंडळातील संघटनात्मक कार्य पाहु जाता त्यांच्या निधनाने ह्या चळवळीचे मोठे नुकसान झालेले आहे. मंडळात निर्माण झालेली दरी भरून न निघणारी आहे , ते सदैव कार्यरूपाने आमच्या स्मरणात राहील अशी शोकसंवेदना ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केली.आभासी पध्दतीने सायकल स्नेही दिवंगत अरविंद खारकर यांना श्रध्दाजंली देण्यासाठी सभा घेण्यात आली , त्याप्रसंगी ते बोलत होते. शोकसभेत मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. विलास पारखी, प्रा. डाॕ. योगेश पाटील , डाॕ. चंद्रकांत लेनगुरे , श्रीकांत धोटे, प्रमोद राऊत, भोजराज कान्हेकर ,वरून धोडरे, विठ्ठलराव कोठारे आदी सदस्यांनी भावपूर्ण शोकसंवेदना व्यक्त केल्यात. सूत्रसंचालन पुरूषोत्तम ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास निंबोरकर यांनी केले.