पत्रकार, नाट्यनिर्माता ते वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांचा प्रवास

20

प्रत्येक राजकीय पक्षाला व राजकीय नेत्यांना प्रसिद्धीची गरज असते. नेता कितीही मोठा का असेना त्यांचे विचार त्यांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार हे एक माध्यम असते. पत्रकारांच्या माध्यमातून पक्षाची भूमिका त्यांचे काम, आंदोलने, मोर्चे आदीची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत देण्यासाठी पक्षाचे प्रसिद्धप्रमुख असतात. पक्ष व पत्रकार यांच्यातील ताळमेळ सांभाळत ते आपले काम करीत असतात. पक्षात काही अतिउत्साही पदाधिकारी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ते काहीही बोलतात. त्यांच्या अश्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पक्ष अडचणीत येण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीतही पक्षाची जमेची बाजू पत्रकारांसमोर मांडण्याचे काम प्रवक्ता बरोबरच प्रसिद्धीप्रमुख करीत असतो.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पदाधिकारी यांचे दौरे, पत्रकार परिषद आदींची माहिती पत्रकारांना देऊन त्यांचे नियोजन प्रसिद्धीप्रमुख करीत असतो. त्यामुळे पक्षातील अनेक गोष्टींची बारीक सारीक माहिती प्रसिद्धीप्रमुखाकडे असते. अशावेळी सल्ले देण्याचे काम ही प्रसिद्धीप्रमुख करीत असतात. त्यामुळे प्रत्येक पक्षात हे पद सन्मानार्थ असते.प्रसिद्धीप्रमुख नसला की त्या पक्षाची भूमिका त्यांची विचारसरणी लोकांपर्यंत जायला वेळ लागतो. पत्रकारांना योग्य ती माहिती वेळेवर न दिल्यास शिवाय पत्रकार व पक्षातील नेत्यांबरोबर समन्वय नसल्यास चुकीची माहिती लोकांपर्यंत जाण्याची शक्यता असते. शिवाय पत्रकार परिषदेतील माहिती ठराविक भागापुरतीच मर्यादित राहते. त्याच बरोबर पक्षातील लाखो कार्यकर्ते आपापल्या परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. मात्र प्रसिद्धीप्रमुख नसल्यास अशा प्रकारचे काम तेवढ्या भागापुरतेच मर्यादित राहते.

ते वरिष्ठांपर्यंत जात नसल्याने कार्यकर्ते काय काम करतात याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. पदाधिकारी पक्षात काय निर्णय घेतात, हे कार्यकर्त्यांना लवकर कळत नाही. एकंदरीत काय तर प्रसिद्धीप्रमुख माहितीची देवाण-घेवाण करण्याचे काम जलद गतीने व योग्य पद्धतीने करीत असतो. त्यामुळे पक्षात अशा पदाला फार मानसन्मान असतो. जे पक्ष अशा पदाला दुय्यम वागणूक देतात तिथे अडचणी व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात ताळमेळ नसल्याचे दिसून येते. अनेक नेते आपापल्या पद्धतीने प्रसिद्धी घेण्यासाठी धडपडत असतो. त्यासाठीं ते सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. त्यात काही पत्रकारांची प्रसिद्धीसाठी मदत घेतली जाते. परिणामी पक्षाची एकतर्फी किंवा चुकीची माहिती लोकांपर्यंत जाते. त्यावरून पक्षात तालमेल नसल्याचे दिसून येते. त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने प्रसिद्धीप्रमुख नेमणे महत्त्वाचे असते. हल्ली तर नगरसेवक, आमदार ही प्रसिद्धीप्रमुख नेमतात. तर काहीजण PR एजन्सीला प्रसिद्धीचे काम देऊन टाकतात.

प्रसिद्धीप्रमुख हे अनुभवी असतात. त्यांच्याकडे लिखाणाचा, पत्रकारितेचा अनेक वर्षाचा अनुभव असतो. शिवाय ज्या पक्षात प्रसिद्धी प्रमुख म्हणून ते काम करतात. त्या पक्षाच्या सर्व विचारसरणीचा अभ्यास करून प्रसिद्धीप्रमुख म्हणून ते आपली भूमिका बजावत असतात.

वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्धीप्रमुख सुरेश नंदिरे यांची माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत. गेले काही वर्षे ते वंचित बहुआजन आघाडीत राज्य प्रसिद्धीप्रमुख म्हणून काम करीत आहेत. पक्षात येण्यापूर्वी ते एक पत्रकार म्हणून काम करीत होते. पत्रकारितेचा अनेक वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे तर ते एक चांगले फोटोग्राफर,चित्रकार, ग्लास पेंटिंग करणारे आहेत. अनेक वर्षे माटुंगा जिमखाना या ठिकाणी ते सिजन क्रिकेट खेळले असून रमाकांत आचरेकर सरांच्या संघाबरोबर खेळण्याचा त्यांना अनुभव आहे. १९९४-९५ साली त्यांनी एक फोटोग्राफर म्हणून आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीला सुरुवात केली. नवशक्ती वृत्तपत्रात ते शिकाऊ पत्रकार तर आमदार कपिल पाटील यांच्या आज दिनांक या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून काम केले. १९९६-९७ मध्ये त्यांनी आपला वार्ताहर व मुंबई चौफेर मध्ये उपसंपादक व फोटोग्राफर म्हणून काम पाहिले. १९९९ मध्ये दूरदर्शनसाठी केलेल्या मालिकेतील स्थिर चित्रणाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. मनोरंजन क्षेत्रातही त्यांनी काही वर्ष काम केल्याने तसेच नाट्य, मालिका व लघुपट निर्माते असल्याने अलका कुबल आठल्ये, विजय चव्हाण, विजय गोखले, सतीश तारे, अशोक शिंदे अशा दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी काम केले आहे. सिने पत्रकारितेत काम करतानाच त्यांनी अनेक चित्रपट क्षेत्रातील बातम्याचे संकलन केले आहे.

त्यामुळे चित्रपटातील अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांची सुरेश नंदिरे यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांनी ईटीव्ही मराठी, सहारा, मी मराठी, आयबीएन लोकमत, टीव्ही9, लेमन व महाराष्ट्र वन या वृत्तवाहिन्यां मध्ये पत्रकार म्हणून काम केले आहे. महाराष्ट्र वन या वृत्तवाहिनीत ते निवासी संपादक म्हणून काम करीत होते. नंदिरे यांनी केवळ पत्रकारिताच केली नाही तर एक व्यावसायिक नाट्यनिर्माते देखील ते आहेत. श्री अरविंद मीरा ही त्यांची नाट्य निर्मिती संस्था असून या संस्थेच्या मार्फत ते अनेक सामाजिक कार्य देखील करतात. त्यांनी काही बालनाट्याची निर्मिती केली असून लावण्या पवार या सर्वात कमी वयाच्या मुलीला नाट्य दिग्दर्शनाची जबाबदारी देऊन त्यांनी एक रेकॉर्ड केला आहे. महावितरणसाठी त्यांनी ‘अंधारातून प्रकाशाकडे’ या लघुपटाची निर्मिती केली आहे तर इतरही लघुपट त्यांच्या नावावर आहेत. सर्व क्षेत्रात त्यांचा दांडगा अनुभव असून राजकीय पुढाऱ्यान पासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांचे संबंध चांगले आहेत.

अनेक ठिकाणी गुन्हेगारी पत्रकारिता, पोलीस खात्यातील कामांबद्दलचे असलेले अनुभव सांगण्यासाठी अनेक ठिकाणी त्यांना आमंत्रण दिले जाते. शिवाय राजकीय पक्षात माहितीची देवाण घेवाण, कामाची पद्धत, माहितीची नोंद कार्यकर्त्यांनशी ताळमेळ कसा ठेवावा, प्रसिद्धीच्या माध्यमांचा वापर कसा करावा, प्रसिद्धी कोणी करावी व कोणी करू नये या सारख्या विषयावर माहिती घेण्यासाठी त्यांना अनेक ठिकाणी निमंत्रण दिले जाते. पत्रकारितेत त्यांनी मुंबई, हैदराबाद, उत्तर प्रदेश, गुजरात या ठिकाणी काम केले आहे.

पत्रकारितेच्या प्रदीर्घ अनुभवामुळे बाळासाहेबांनी त्यांच्यावर वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रसिद्धीप्रमुखाची जबाबदारी दिली. बाळासाहेबांची पत्रकार परिषद, मोर्चे, आंदोलन, पक्षातील इतर घडामोडींची माहिती प्रसिद्धी माध्यमातून लोकांपर्यंत तसेच पत्रकारांपर्यंत पोहचविण्याचे काम ते करतात. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली. हजारो कार्यकर्त्यांशी त्यांचा रोजचा संबंध येतो. रोज येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन ते आपल्या स्तरावर त्या सोडविण्याचा प्रयत्न करतात किंवा वरिष्ठांच्या लक्षात आणून देतात. कार्यकर्त्यांचे सामाजिक काम, आंदोलन, मोर्चे यांना रोजच्या रोज प्रसिद्धी देण्याचे काम ते करीत असतात. अनेकदा त्यांच्याकडे मदतीसाठी, सल्ल्यासाठी फोन येत असतात, त्यांच्या स्तरावर ते मदत करीत असतात. अंतर्गत वाद विवाद आपल्या पद्धतीने सोडवून देतात. त्यामुळे ते पक्षात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात.सध्या ते VB स्पार्क या you tube वाहिनीचे संपादक म्हणून काम पाहतात. इतरांना प्रसिद्धी देणारे सुरेश नंदिरे आता मात्र प्रसिद्धीपासून दूर आहेत. उद्या २५ मे रोजी त्यांचा वाढदिवस असल्याने, त्यांना खूप खूप शुभेच्छा…🙏

✒️लेखक:- समाधान गायकवाड(पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क,बीड)