कामधेनु कोव्हीड केअर सेंटर ठरतंय रुग्णांसाठी वरदान माजी सभापती अंकुशराव चव्हाण घेतायत रुग्णांची काळजी

20

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.11जून):-तालुक्यातील धानोरा येथील कामधेनु कोव्हीड केअर सेंटर आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट पध्दतीने सुरू असून धानोरा परिसरातील ४० कोरोनाग्रस्त रुग्ण सध्या येथे उपचार घेत असून हे कोरोना सेंटर रुग्णासाठी वरदान ठरत आहे.तर पंचायत समितीचे माजी सभापती अंकुशराव चव्हाण हे चोवीस तास येथे थांबून कुटुंबातील सदस्या प्रमाणे रुग्णांची काळजी घेत असल्याने आष्टी तालुक्यात या कोव्हीड सेंटरची चर्चा होत आहे.

आष्टी तालुक्यातील महसूल,आरोग्य व पोलीस प्रशासनाने लॉक डाऊन काळात योग्य खबरदारी घेतली तसेच नागरीकांनी ही नियमांचे पालन केल्याने रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.तालुक्यातील अनेक कोव्हीड सेंटरमधील रुग्ण संख्या कमी झाली आहे.आमदार सुरेश धस यांनी आष्टी,पाटोदा,शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी कोव्हीड सेंटर उभारून सर्वसामान्य नागरिकांना आधार दिला आहे.आ धस यांनी माजी सभापती अंकुशराव चव्हाण यांच्यावर धानोरा येथे कामधेनु कोव्हीड केअर सेंटरच्या माध्यमातून जबाबदारी दिली असून त्यांनी ही येथे चोवीस तास थांबून रुग्णांची काळजी घेत व आधार देत तालुक्यातील सर्वोत्कृष्ट कोव्हीड सेंटर चालवले आहे.
येथे रुग्णांना सकाळी प्राणायाम व योगा शिकविला जातो.

सकाळी आयुर्वेदिक काढा,चहा बिस्केट,नास्टा,दिवसातून दोन वेळेस रुग्णांच्या आवडीनुसार जेवण बनवले जाते.रुग्णांना व्हिटॅमिन मिळावेत यासाठी विविध प्रकारचे फळ आहार,अंडी दिली जातात.येथील प्रशस्त व हवेशीर वातावरण तसेच झाडे मोठ्या प्रमाणावर असल्याने रुग्ण आनंदी वातावरणात रहात आहेत.भारत काळे हे रुग्णांना प्राणायाम व योगाचे धडे देतात.प्रियांका काळे,निकाळजे,घोडके आदी कर्मचारी ही रुग्णांसाठी मेहनत घेतात.तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी,डॉक्टर हे वेळोवेळी येथे भेट देऊन मार्गदर्शन करतात.रुग्णांना कोव्हीड सेंटर मध्ये नाही तर कुटुंबातील व्यक्तींसोबतच आपण रहात असल्याचे येथील रुग्ण सांगतात.आष्टी तालुक्यातच नव्हे तर बीड जिल्ह्यात कामधेनू कोव्हीड केअर सेंटरची आदर्श कार्यामुळे चर्चा होत आहे.