तरूणाईचा पाऊस

120

✒️लेखक:-संदिप गायकवाड(९६३७३५७४००)

आज आकाश गर्द मेघांनी भरुन आलं होतं.आकाशाचा राखडी रंग जाऊन काळाकुट्ट रंग प्राप्त झाला होता.चरावयास गेलेले सारे खग घरट्याच्या ओढीने रॉकेटसमान धावत होते.किलबिलाट करत होते.झाडावर नाचत होते.झाडांच्या रांगेमध्ये नव संगीताचे स्वर छेडत होते . पावसाची चाहूल हे प्रथम पक्षांना व प्राण्यांना कळते म्हणतात ते असू शकते.मी माझ्या बाईकने प्रवास करीत होतो.मेघ दाटून आलेल्या नभातून भूतलावर केव्हा पाऊस पडेल याचा नेम नव्हता ,तसा पाऊस पूर्व सुचना देऊन येत नसतो, पण त्यांची गंधवार्ता सृष्टीतून जाणवू शकते.पाऊस कधीही,केव्हाही,कसाही येते.”होत्याचं नव्हतं करतो,नव्हत्याचं होतं करतो.”हा पाऊस कवीचा खूप आवडता असतो.पाऊस आणि कविता हे गणित खूप चांगलं जमतं.

या पाण्यासाठी बाबासाहेबांनी मोठा संघर्ष केला .”विद्रोहाचे महाड संगर घडून माणवमुक्तीचे महा आंदोलन केले “. पाणी हा जीवनाचा मल्यवान नैसर्गिक घटक पण यावर सनातनी मानवाची मक्तेदारी होती ती बाबासाहेबांनी मोडून काढली.कवीला पाऊस नव्या सृजनोत्सवाचा मिलनोत्स्व वाटतो.पाऊसाला ओनामा झाला.मी एका झाडाचा आडोसा घेऊन उभा राहलो.सकाळ कधी रात्रीत परिवर्तित झाली मला समजलेच नाही.सर्व सृष्टी पावसासाठी आसूरलेली होती.माझ्या मनाला आनंदाची तरंग भरून आली.पावसाची गाणी आठवू लागली.

“पाऊस म्हणजे चिखल,पाऊस म्हणजे वैताग।
पाऊस म्हणजे रानमोळ,पाऊस म्हणजे महापूर।
पण पाऊस म्हणजे पहिल्या सईचं गीत मधूर।।”

हळूहळू पावसाचे थेंब धरतीवरील उतरू लागले.काही क्षणातच प्रचंड वादळ सुटलं.आणि एकदम जोरात धारा बरसू लागल्या.झाडांच्या बुंध्यापाशी असल्याने मला काही थेंब वाचवता येत होते,पण पाऊस मी म्हणून बरसत होता.काही क्षणात अंधार वादळाला चिरत एक स्कुटी झाडाजवळ येऊन थांबली.एक सुंदर मुलगी चेहऱ्यावर स्कार्प लावून उतरली .लगभगीने स्कुटी लावली व झाडांच्या बुंध्यापाशी उभी झाली.रूमाल काढून पावसाचे थेंब पुसू लागली पण पावसाच्या धारेमुळे चेहऱ्यावर पुन्हा पावसाचे थेंब जमा होऊ लागले .नंतर तीने ती क्रियाच थांबवली.मी एकटा असल्याने तीला भीती वाटली.पण थोडा धीरही आला.समोर काळाकुट्ट अंधार मनसोक्त बरसणारा पाऊस त्यामुळे जवळचं दिसत नव्हतं म्हणून ती थांबली होती . पुन्हा ती झाडांच्या बुंध्यापाशी समीप आली .मी आणि ती पावसाला वाचवत होतो .पण पाऊस काही आम्हाला काही वाचू देत नव्हता . झाडांच्या पानावर पडणाऱ्या थेंबांनी आणि वाहणाऱ्या वाऱ्यामुळे संगीतमय वातावरण निर्माण झालं होतं.निसर्गाच्या या वातावरणानी संगीतातील विविध राग छेडले होते.मानवनिर्मित संगीत रागापेक्षा प्राकृतिक संगीत कितीतरी मनाला आनंद देत होते.पावसावर होणाऱ्या काव्याने कवी बेभान होतो.तसं मला कवी ग्रेसचे काही शब्द स्मरून आले.

पाऊस कधीचा पडतो,झाडांची हलती पाने।
हलकेच मज जाग आली,दुःखाच्या मंद सुराने।।

पाऊस मनाला गारवा देत होता,मातीला सुगंध सुटला होता.झाडावरून हवेचे तरंग हेलकावत होते.गंधवाहाने सारी चराचर सृष्टी आनंदाने नाचत होती.आम्हा दोघांना पावसाने पूर्ण चिंब भिझवून टाकलं होतं .अंग शहारून येत होतं . शरीरातून गर्मी व वरून थंडी अशी आमची अवस्था झाली होती .एक तास होऊनही पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नव्हते.जर पुढे जातो म्हटले तर समोरचं काही दिसत नव्हतं.नाईलाज असतांना तिथं थांबन भाग होतं.मी थांबल्यामुळे ती निघत नव्हती आणि ती थांबल्यामुळे मी निघत नव्हतो.तरूणाईच्या आयुष्यातील पाऊस जीवनाला दिशादर्शक ठरतो.मनसोक्त भिजणाऱ्या तरूणाईला नवा आविष्कार घडवितो.पाऊस मानवाच्या जीवनातील अनमोल क्षण ,आमच्या हजारो पिढ्यां पाण्याने बरबाद केल्या होत्या .त्याला पाऊस जबाबदार नव्हता तर मानवनिर्मित कल्पना जबाबदार होत्या .हाच पाऊस पृथ्वीला गर्भधारणा करून नवे अंकूर आणतो आणि कृषीवल सुखावून जातो.मृगाचा पहिला पाऊस कृषीवलाचे जीवन होय’.

“पाऊस मनाला गारवा देतो,
पाऊस मनाला संदेश देतो।
पाऊस जगण्याची उमेद देतो,
पाऊस नव सृष्टी तयार करतो।।”

पावसासकट आम्ही चिंब होत होतो.झाडावरील पाखरांचे स्वर निनादत होते.तृणावरील सळसळणाऱ्या हवेने नादमाधुर्य एेकू येत होते.पानाची सळसळ,पावसाची झंकार,विजांचा कडकडाट,थेंबाची टपटप,ढंगाचा गडगडाट,याने विलोभनिय चित्र निर्माण केलं होतं.आम्ही समीप असूनही साधी शब्दही ओठातून काढत नव्हतो.एक तास होऊन ही पावसाच्या पडणाऱ्या थेंबांकडे,झाडांकडे रस्त्यावरून वाहणाऱ्या ओढ्याकडे पाहात होतो.कधी पाऊस थांबायचा ,पण लगेच बरसायचा.मानवाला नवसृजनत्व देणारा हा पाऊस जीवनाला गती देतो.सकल बंधुत्वतेची गाणी गातो.तो भेदभाव करीत नाही.त्याला फक्त मनसोक्त बरसनं एवढचं ठावं असतं.समोर निर्माण झालेल्या छोट्या छोट्या ओढ्यामुळे त्यात पडणाऱ्या थेंबाची बूळबूळ माजली होती.तसतशा माझ्या बालपणीच्या आठवणीचे मेंदूत स्मरण होत होते.किती वर्ष लोटली तरी बालवयातील खेळलेले पावसातील खेळ व पावसात भिजण्याचा आनंद वेगळाच असतो.त्याच वेळेला माझेच शब्द मला आठवू लागले.

“नभ भरतो घन मेघांन,
पाऊस बरसतो ओसांडून।
रावा गीत गाताे मंजूळान,
सारा ओढा वाहतो झुळझुळान।”

ढगाआड लपलेल्या सूर्याचे काही किरणं दिसू लागली.अंधकारमय प्रदेश प्रकाशमान होऊ लागला.मी आपल्या बाईककडे जाऊ लागलो.तिने पण आपली स्कुटी सुरू केली .मी पाहतो तर ती कुठच्या कुठे निघून गेली.मला मध्येच ग्रेसचे काही शब्द आठवू लागले.

“ती निघून गेल्यावर
पाऊस निनादत होता।
मेघात अडकली किरणे
सूर्य सोडवित होता।।”