गंगाखेडमधील वीज समस्या प्राधान्याने सोडवू – ऊर्जामंत्री राऊत

29

🔹कॉंग्रेस तालुकाध्यक्ष यादव यांचे निवेदन

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.12जून):-गंगाखेड तालुक्यासह शहरातील वीज विषयक समस्या प्रलंबीत आहेत. त्यांची तातडीने सोडवणूक करावी, अशी मागणी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी परभणी भेटीवर आलेले ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचेकडे केली. या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील, असे अश्वासन यावेळी राऊत यांनी दिले.

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आज परभणीत आले होते. कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश वरपुडकर यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी ऊपस्थित होते. गंगाखेड तालुक्यातील वीज विषयक विविध मागण्यांचे निवेदन कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यावेळी ऊर्जा मंत्र्यांना सादर केले.

महातपुरी येथील ऊपकेंद्रात ५ एमव्हीए ट्रांसफार्मर बसवण्यात यावा, सेलमोहा येथील मंजूर ऊपकेंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करावे, तालुक्यातील शेती आणि गावठाण वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र विद्युत वाहिण्या द्याव्यात, गंगाखेड शहरात एबी ( एअर बंच ) केबल द्वारे भुमिगत पद्धतीने वीज पुरवठा करावा, गंगाखेड शहराचे वाढते क्षेत्रफळ आणि ग्राहकसंख्या लक्षात घेवून शहर शाखेचे विभाजन दोन शाखांमध्ये करावे, शहराच्या रहीवास क्षेत्रातून जाणाऱ्या ऊच्च दाबाच्या धोकादायक वाहिण्या स्थलांतरीत कराव्यात.

गंगाखेड शहर आणि तालुक्यातील जुन्या व जीर्ण झालेल्या वीज खांबांचे सर्वेक्षण करून असे पोल बदलण्यात यावेत व कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सक्तीची वीज बील वसुली, वीज तोडणी मोहिम राबवू नये आदि मागण्या यावेळी ऊर्जा मंत्र्यांकडे करण्यात आल्या. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संबंधीतांना सुचना देण्यात येतील, असे नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. गोविंद यादव यांचेसह शहराध्यक्ष शेख युनूस, सुशांत चौधरी, युवक कॉंग्रेसचे विधानसभा सरचिटणीस सिद्धोधन भालेराव, माजी सरपंच श्रीकांत गायकवाड आदिंच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.