येत्या आठ दिवसात पुणे- पनवेल रेल्वे सुरु करण्याचे दमरेच्या महाव्यवस्थापकांचे आश्‍वासन

30

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.19जून):-प्रवाशांच्या दृष्टीने महत्वाची असणारी तसेच प्रवाश्यांची मोठी मागणी असलेल्या नांदेड- पुणे- पनवेल रेल्वे येत्या आठ दिवसात सुरू करण्याचे आश्‍वासन दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या यांनी सिकंदरबाद येथे मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या पदाधिकार्‍यांना दिले.
पुणे पनवेल गाड्यासह इतर मागण्या मांडण्यासाठी प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, कादिर लाला हाश्मी आदींचा समावेश असलेले एक शिष्टमंडळ दमरेच्या महाव्यस्थापक गजाजन मल्ल्या यांना भेटण्यासाठी येथे आले होते. या दरम्यान महाव्यवस्थापकांनी पुणे पनवेल येत्या आठ दिवसात सुरु करु, असे आश्‍वासन दिले.

लॉकडाऊन मधील बंधने शिथिल झाले असतांनासुद्धा मराठवाड्यातील अनेक रेल्वे गाड्या दक्षिण मध्य रेल्वेने सुरु केल्या नाहीत. विशेषतः पुणे येथे जाण्यासाठी नांदेड-पुणे पनवेल गाडीची प्रवाश्यांकडून मोठी मागणी आहे. विद्यार्थी, व्यापारी, अधिकारी, नोकरदार यांना पुणे येथे जाण्यासाठी गाडी नसल्याने येणार्‍या अडचणीं मल्ल्या यांना पटवून दिल्या. त्यानंतर मल्ल्या यांनी अधिकारी पाचारण करून तात्काळ रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवून तात्काळ ही गाडी चालू करण्याचे आदेश दिले. ही गाडी आठ दिवसाच्या आत चालू होईल, असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी पदाधिकार्‍यांनी पंढरपूरसाठी नांदेड-पंढरपुर एक्सप्रेस सुरू करावी, नांदेड-पुणे द्विसप्तहिक गाडी नियमित करावी, पॅसेंजर गाड्या बंद केल्याने नांदेड-औरंगाबाद, अकोला-परळी, नांदेड- बिदर, अकोला-निझमबाद डेमु रेल्वे सुरू कराव्यात, पूर्णा मार्गे नांदेड नागपूर तसेच नांदेड हुन गोवा, बिकानेर आदी ठिकाणी रेल्वे सुरू कराव्यात. तसेच परभणी स्थानकावरील अनेक समस्या गजानन मल्ल्या यांच्या समोर मांडल्या. या समस्या तसेच नवीन रेल्वे सुरू करण्याबाबत लक्ष घालू.असे आश्वासन दिले.