तीच ही निर्जला एकादशी : पाणीही न पिता उपाशी

32

(निर्जला एकादशी विशेष)

एकादशी हा हिंदु पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला – पंधरवड्यातला अकरावा दिवस आहे. त्याचप्रमाणे महिन्यातला दोन पंधरवड्यांत – पक्षात प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादशा येतात. मध्यप्रदेशात आणि उत्तरप्रदेशात महिन्यातला कृष्ण पक्ष हा शुक्ल पक्षाच्या आधी येत असल्याने कृष्ण पक्षात येणारी विशिष्ट नावाची एकादशी नंतरचे नाव असलेल्या महिन्यात येते. उदा.ज्या दिवशी महाराष्ट्रात आषाढ महिन्यातील कामिका एकादशी असते, त्यादिवशी मध्यप्रदेशात श्रावण महिन्यातली कामिका एकादशी असते. हा प्रकार शुक्ल एकादशांच्या बाबतीत होत नाही. वर्षाच्या सर्व एकादशींमध्ये निर्जला एकादशीचे फार मोठे महत्त्व आहे. पद्म पुराणानुसार ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला निर्जला एकादशी म्हटले जाते. तिलाच ‘पांडव एकादशी’ या नावाने देखील ओळखले जाते. या एकादशीच्या दिवशी पाणीही न पिता उपवास केला जातो.तो दिवस ज्येष्ठ शुद्ध एकादशीचा असतो.

प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात एक आणि कृष्ण पक्षात एक अशा २ एकादशा असतात. अशा मिळून वर्षभरात एकूण २४ एकादशा येतात. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला ‘निर्जला एकादशी’ असे म्हणतात. वर्षभरातील सर्व एकादशांपैकी सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण एकादशी म्हणून ‘निर्जला एकादशी’ मानली जाते. स्कंद पुराणानुसार वर्षभरात एकाही एकादशीला व्रत करु शकला नाहीत तर केवळ निर्जला एकादशीला व्रत केल्यास पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. महाभारतातील पांच पांडवांपैकी भीम ही एक व्यक्तीरेखा आहे. त्याचा मात्र आहार फार विलक्षण! भीमाला सर्व एकादशांना उपवास करणे शक्य नव्हते; म्हणून त्याने व्यास मुनींच्या उपदेशानुसार ज्येष्ठ शुद्ध एकादशीला पाणीही न पिता उपवास केला आणि सर्व एकादशांच्या उपवासाचे पुण्य जोडले गेले. महाबलशाली भीमाने निर्जला एकादशीचे व्रत करुन सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त केले होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या एकादशीला भीमसेनी एकादशी किंवा पांडव एकादशी असेही म्हंटले जाते. यंदा सन २०२१ मध्ये निर्जला एकादशी ही आज दि.२१ जून रोजी आली आहे.
निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान श्रीविष्णुची पूजा आणि व्रत केले जाते. विशेष महत्त्व असलेल्या या एकादशी निमित्त व्रत केल्याने पुण्याची प्राप्ती होऊन सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते. तसेच मरणानंतर मोक्षप्राप्ती होते, अशीही या एकादशीबद्दलची धार्मिक भावना आहे.

निर्जला एकादशी पूजाविधीमध्ये या एकादशीच्या निमित्त्याने सकाळी लवकर उठून स्नान केले जाते. त्यानंतर भगवान विष्णूंची पूजा केली जाते. पूजा करताना श्रीविष्णूंच्या प्रतिमेला – मुर्तीला हळद-कुंकू लावले जाते. त्यानंतर अक्षता, चंदन वगैरे लावून पिवळी फुले अर्पण केली जातात. पणती-अगरबत्ती ओवाळून नमस्कार करतात. ‘ओम नमो भगवते वासुदेवाय!’ हा मंत्रोच्चार करतात. त्यानंतर निर्जला एकादशीच्या कथेचे पठण केले जाते. कथापठण केल्यानंतर आरती करुन श्रीविष्णूंची प्रार्थना करतात. निर्जला एकदाशी निमित्त उपवास करण्याची प्रथा सुद्धा आहे. परंतु हा उपवास निर्जळी म्हणजे पाणी न पिता करायचा असतो. त्यामुळे आपल्या प्रकृतीचा विचार करुनच उपवास धरावा लागतो. संपूर्ण दिवस फलाहार करावा लागतो. दुसऱ्या दिवशी पूजा करुन उपवास सोडला जातो. तत्पूर्वी दीनदुबळ्यांना व गरीब ब्राह्मणांना भोजन व अन्नधान्याचा दानधर्म करण्याची परंपरा रूढ आहे.

निर्जला एकादशीचे व्रत विधीपूर्वक केल्यास वर्षात दुसरी कोणतीही एकादशी न करताही सर्व एकादशांचे पुण्य मिळते, असे शास्त्रोक्त विधान आहे. हे सत्य असेल किंवा नसेलही. मात्र अशा उपवासाने आपले जठर, अन्नकोष व आंतडे यांची यंत्रवत स्वच्छता होते. मलावरोध सारखे आजार बळावत नाहीत. भूक व तहान सोसण्याची सवय अंगवळणी पडली तर वेळप्रसंगी ती सवय फार मोलाचे कार्य करून जाते. सहनशीलता गुण अंगी बाणवल्यामुळे भूकतहानेवर आपण नियंत्रण मिळविलेले असतो. त्याबरोबरच आपण खा-खा वृत्तीलाही लगाम घातलेले असतो. मात्र फलाहार अथवा उपासाच्या नास्त्यावर नियंत्रण ठेऊन मर्यादा पाळलीच पाहिजे.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे निर्जला एकादशीच्या समस्त बंधुभगिनींना हार्दिक शुभेच्छा !!


✒️संकलक व लेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी(मराठी साहित्यिक विदर्भ प्रदेश.)मु. पिसेवडधा, तह. आरमोरी,जि. गडचिरोली, व्हा. नं. ७४१४९८३३३९.