चीनी माल बहिष्कार ! एक फार्स !!

33

सत्ताधारी मग ते कुठल्याही पक्षाचे असोत.अगदी पार्टी विथ डिफरन्स म्हणत सर्व काही डोक्याला गुंडाळणारे असोत, आपला एखादा निर्णय चुकला असेल आणि त्याची परिणीती खूप मोठ्या नुकसानीत होऊन प्रकरण आपल्या अंगलट येताना दिसली की,जनतेचे लक्ष विचलित करण्याच्या हेतूने त्या संबंधीचा प्रश्न भावनिक बनवून मूळ मुद्दा बाजूला सारायची खेळी खेळली जाते*. *असाच खेळ चिनी मालासंदर्भात आपल्या समर्थकांकडून खेळवला जात आहे.

आज जवळपास अकरा वर्षे झाली असतील खाजगीकरण आणि मुक्त बाजारपेठेची टूम निघाल्यापासून इथले लघु उद्योजक आणि भारतावर प्रामाणिकपणे प्रेम करून रितसर कर भरणा-या व्यवसायिकांचे कंबरडं मोडलं आहे.त्यांची प्रचंड अशी गोची झालेली आहे.याला राज्यकर्ते जितके जबाबदार आहेत त्याहून अधिक जबाबदार परदेशी उत्पादन वापरायचे फॅड आणि हव्यास बाळगणारी स्वत:वर नियंत्रण न ठेवणारी जनता देखील आहे.*.
*यात सतत महान भारतीय संस्कृतीचा सतत डांगोरा पिटणा-या महाभागांचे प्रमाण थोडे अधिक आहे. दैनंदिन वापरातील वस्तूच नव्हे तर, इधल्या सण उत्सवात कमी किमतीत अधिक झगमगाट दाखविण्याच्या उद्देशानेही चिनी मालांची खरेदी केली जाते.

अगदी दिपावलीच्या पणतीच नव्हे तर गणपतीच्या, देवी-देवतांच्या पूजेसहीत मूर्ती ही परदेशी म्हणजे चिनी बनावटीच्या वापरण्याची वाईट सवय आपल्याला लागल्यामुळे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला फार मोठा धक्का पोहोचत आहे*. *यामधे सरकारच्या परदेश व्यापार नीतिचा ही दोष तितकाच महत्वाचा आहे. सा-या जगाला पळता भुई थोडी करून सोडणा-या ‘करोना जीवाणू’ च्या प्रतापाने माणसं पार हादरून गेली आहेत.यावर मात करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.दोन लाटा येऊन गेले आहेत.तिस-या लाटेची टांगती तलवार डोक्यावर असल्याचा प्रचार प्रसारमाध्यमांच्या द्वारे सरकार अहोरात्र करत आहे.तिसरी लाट येऊन जाईल. काही काळानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल ही*.

*पण पुढे काय ?*
*जेव्हा कोरोना जीवाणूचा उपद्रव पूर्णपणे आटोक्यात येईल आणि धोका टळून जाईल तेव्हां मात्र प्रथम सरकारची आणि आपली जबाबदारी ख-या अर्थाने वाढणार आहे*.
*चीनच्या नावाने नुसती हाकाटी देऊन चालणार नाही. ऐकून कान किटून गेले आहेत. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून चीनचा नीचपणाच्या नुसत्या कथा चघळणे हेच सुरू आहे.राष्ट्रभक्तीचा हवाला देत चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे तोंड फाटेस्तोवर आवाहन केले जात आहे. गलवान सारख्या अनेक ठिकाणी काही अतिउत्साही महाभागांनी या चिनी मालांवर बहिष्कार घालून चिनी मालांची होळी केल्याच्या बातम्या न विसरता छापून आणले जात आहेत.काही ठिकाणी तर अशा होळी करण्याचा उत्सवच मांडला आहे.असे केल्यामुळे चीनचे काहीच म्हणजे एक रुपयाचे ही नुकसान होणार नाही हे ध्यानात घेतले पाहिजे. कारण चीनने विकायचा तो माल विकलेला आहे.

त्याला त्याचे पैसे मिळाले आहेत.या खरेदीत मधे दलाली करणा-याला त्याचा वाटा मिळालेला आहे.तसेच भारतात माल घेणारी एजन्सी आदी सर्वांना आपापला अपेक्षित लाभ मिळाला.त्यांचे पैसे त्यांना वेळोवेळी मिळालेले आहेत. म्हणजेच आता त्यांच्या दृष्टीने एक रुपयाचा ही तोटा न होता व्यवहार संपलेला आहे. पण…राष्ट्रभक्तीच्या फाजील प्रदर्शनापायी या मालांना चांगली मागणी आहे,चांगली विक्री होतेय म्हणून उसनवारीने पैसे उभे करून मोठ्या एजन्सीकडून ते घेऊन विक्री करणा-याच्या बेतात असणा-या स्थानिक छोट्या विक्रेत्यांना मात्र अशा बहिष्कार टाकण्याच्या, होळी पेटविण्याच्या कार्यक्रमामुळे आणि त्याच्या परिणामाने सध्या मालाच्या विक्रीत घट आल्यामुळे जबरदस्त आर्थिक फटका बसत आहे. आणि गरीब लघुविक्रेते अधिकच कठीण परिस्थितीत ढकलले जात आहेत.

मुळात अशी चिनी बनावटीचे उत्पादने भारतात येण्यावर बंदी घालणे ही संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे. ‘आडात नाही तर पोह-यात कुठून ?’ ही म्हण काय उगीच पडलेली नाही.चिनी बनावटीचे माल स्वस्त मिळतात म्हणून ते खरेदी करायला इथला सामान्य माणूस काय चीन ला जातो का ? अथवा आपल्याला हवे असलेल्या वस्तू डायरेक्ट चीनवरून मागवतो का ?यांची उत्तरे अर्थातच नाही अशीच असणार आहेत.सामान्य जनतेचा कल मानवी स्वभावानुसार समोर उपलब्ध असलेल्या वस्तू भाव मोल करून चार पैसे वाचविण्याकडे असतो. आणि भारतीय व्यापार नितीमुळे तशी चिनी बाजारपेठ आज भारतातील सगळे लघु उद्योग,कुटीरोद्दक मातीत गाडून अगदी खेड्यापाड्यात सरकारकडूनच उपलब्ध करून दिली गेली आहेत.*
*असे एकीकडे दरवाजा उघडा ठेवून ‘आत्मनिर्भर’ च्या वांझोट्या गप्पा झोडून सामान्यांच्या डोळ्यात का धूळफेक केली जात आहे ?

सरकारची विदेश व्यापार नीती काही का असेना आपणच एक देशप्रेमी भारतीय नागरिक या नात्याने पुढील काळात आपल्या देशासाठी काहीतरी चांगले करून दाखवायचे आहे*. *परदेशी फॅड डोक्यातून काढून आपण आपली सहल आणि सुट्टी भारतातच घालवायची आहे,चाईनीजचे चोचले थांबवून स्थानिक रेस्टॉरंट्समध्ये भारतीय खाणेच खायची सवय लाऊन घ्यायचे आहे.भारतीय उत्पादनेच खरेदी करण्याची प्रतिज्ञा करायची आहे. त्यासाठी भारतीय उत्पादकांनी ही आपली प्रामाणिकता दाखवून द्यायची वेळ आली आहे.मांस खाणा-यांनी ज्ञात असलेल्या स्थानिक मांस ‌विक्रेत्यांकडूनच मांस खरेदी करून खायचे आहे. आणि शाकाहारींनी ही आपल्या स्थानिक वस्तूच खरेदी करून स्थानिक व्यवसायांना आधार द्यायचे आहे.आज आपल्या या स्थानिक व्यवसायिकांना स्वत:च्या पायावर उभे राहणे कठीण जात आहे.त्यांना उभे करणे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे. आपल्या मदतीशिवाय त्यांचे जगणे फार कठीण होणार आहे. आपण सर्वांनी त्यांना आता उभारी द्यायचे आहे.

सरकारनेही असा चिनी बनावटीचा मालाला भारतात येण्यापासून रोखून स्थानिक छोट्या विक्रेत्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची हीच वेळ आहे.आपली भारतीय उत्पादने केव्हा़ही जगातील सर्वोत्कृष्ट उत्पादने आहेत.हे आपणही जाणून घेत जगाला दाखवून देण्याची हीच योग्य वेळ आहे.आपला भारत देश प्राचीन काळापासून जगात केवळ सर्वात सुंदरच नव्हे तर एक महान देश आहे*.आपण नुसते घोषणा देऊन चालणार नाही. त्यासाठी भारतीय उत्पादनेच खरेदी करून,भारतीय खाद्यपदार्थच खाऊन भारताचे मोठेपण कायम राखायचे आहे. यासाठी का होईना कोरोनाचे संकट भारतासाठी ईष्टापत्ती समजून ख-या अर्थाने ‘मेरा भारत महान’ हे जगाला दाखवून देऊ या आणि ‘मेरा भारत महान’ असे गर्वाने म्हणू या*

✒️लेखक:-विठ्ठलराव वठारे(उपाध्यक्ष)पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशन महाराष्ट्र
joshaba1001@gmail.com