चिमणी पाखरांचे बालमित्र

28

[गिजुभाई बधेका पुण्यतिथी विशेष]

गिजुभाईंनी बालकांचे शिक्षण या संदर्भात व्यापक दृष्टीकोन मांडताना म्हटले, “देशातील लाखो बालकांच्या शिक्षणाचा प्रश्न हा केवळ शिक्षण खात्यापुरता मर्यादित नसून तो राज्य, शासन व जनता यांचाही असतो. शाळांमध्ये केवळ माहितीचे शिक्षण न देता कृतींवर भर द्यावा. मुलांना वर्गात मारून त्यांना नितीमान करता येत नाही. तर सर्वांत महत्त्वपूर्ण शिक्षण हे हृदयाचे शिक्षण असते.” गिजुभाई बधेका हे आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील गुजरातमधील एक आद्य प्रवर्तक होत. त्यांच्या कार्यानं पश्चिम भारतात बालशिक्षणाचा पाया घातला गेला. त्यांच्या कार्यावर माँटेसरी, फ्रायड्रिक फ्रॉइबेल आणि योहान हाइन्‍रिक पेस्टालॉझ्झी यांच्या विचारांची छाप होती.

त्यांच्या या कार्याचं गौरव म्हणून गुजरात साहित्यसभेनं त्यांना रणजितराम सुवर्णपदकासह दहा हजार रुपये रोख बक्षीस दिलं. तसंच गलीयारा पुरस्कारही त्यांना मिळालं. भारतात पार पडलेलं दुसरं माँटेसरी सम्मेलन व हैदराबाद येथील अखिल भारतीय बालसाहित्य परिषद यांत त्यांनी अध्यक्षपद भूषविलं होतं. ते बालकांसाठी आईसारखं काम करत. त्यामुळं त्यांना चिमणी पाखरांचे ‘बालमित्र’ ही पदवी तर मिळालीच; पण गमतीनं मूछिवाली माँ अर्थात मिशीवाली आई असं नामाभिधानही प्राप्त झालं.

गिजुभाईंचा जन्म सौराष्ट्र चितळ येथे दि.१५ नोव्हेंबर १८८५ रोजी झाला. वडिलांचे नाव भगवानजी व आईचे नाव काशीबा होते. गिरिजाशंकर ऊर्फ गिजुभाई यांचे प्राथमिक शिक्षण वेळा येथे व त्यानंतरचे शिक्षण भावनगर येथे झाले. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी भावनगर येथे त्यांचे मामा हरगोविंद पंड्या यांच्याकडे गेले. त्यांनी सामलदास महाविद्यालयात नाव दाखल केले; परंतु तेथील अभ्यासक्रम पुर्ण न करताच महाविद्यालय सोडून त्यांनी उपजीविकेसाठी आफ्रिकेस प्रयाण केले. तेथील सॉलिलीटरच्या कंपनीत काम करू लागले. तीन वर्षांच्या वास्तव्यानंतर सन १९१० साली ते भारतात परतले. त्यांनी आफ्रिकेतील अनुभवांवर आधारित प्रवासवर्णने लिहिली. भारतात त्यांनी वकिलीचा अभ्यास करून व्यवसाय आरंभिला. पुढे हा व्यवसाय सोडून भावनगर येथील दक्षिणामूर्ती या संस्थेत त्यांनी साहाय्यक अधीक्षक म्हणून नोकरी पत्करली व कालांतराने ते त्याच संस्थेत प्राचार्य झाले. सन १९०२ साली ते हरिबेन यांच्याशी विवाहबद्ध झाले.

हरिबेन यांच्या निधनानंतर चार वर्षांनी जदिबेन यांच्याशी त्यांनी दुसरे लग्न केले. नरेंद्रभाई हा त्यांचा एकुलता एक मुलगा होय. गिजुभाई हे वकिलीचा व्यवसाय करत. ते स्वतःच्या कचेरीत बसले असता लहान मुलाला हातपाय बांधून शाळेत नेत असल्याचे त्यांनी पाहिले. लहान मुलांना असे शाळेत न्यावे लागते, याचे त्यांना वाईट वाटले. त्या सुमारास इटलीच्या मारिया माँटेसरी बाईंच्या शाळेत मुले हसत-खेळत जातात व आनंदाने बागडतात, हे त्यांनी साहित्यातून वाचले. त्यामुळे त्यांना आपले गुरू मानून भारतामध्ये माँटेसरी पद्धतीने बालशिक्षणाची शाळा सुरू करण्याचे ठरविले. त्यांनी सन १९१८मध्ये बालशिक्षणाचे प्रत्यक्ष काम सुरू करून दक्षिणामूर्ती संस्थेत बालमंदिराची स्थापना केली. भारतात भारतीयाने सुरू केलेला बालशिक्षणाचा हा पहिला प्रयोग होता. या प्रयोगाची रचना संपूर्णपणे बालकेंद्री आणि शास्त्रीय होती. शाळेत बालकांना स्वतंत्रपणे कृती करू देणे व शिक्षकाने त्यांचे फक्त निरीक्षण करत राहणे, यावर गीजुभाईंनी भर दिला. त्यांनी बालमंदिराची रचना करताना बालकाला केंद्रबिंदू ठेऊन तशी रचना केली आहे.

त्यात क्रीडांगण, परसबाग, पशुपक्षी संगोपन, ग्रंथालय, हस्तकला उद्योग, कलामंदिर, स्नानगृह, विश्रामकक्ष व दिव्यांग बालकांस खास कक्ष केले होते. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या इंद्रीय विकासाची साधने, वेगवेगळ्या प्रकारची चित्रे, संगीत साधने, बैलगाडी, मोटार, कचराकुंडी, बागकाम साधने, रेडिओ आदी बालमंदिरात ठेवले. त्यांच्या भाषा, गणित, परिसरादी शिक्षणाची उपयुक्त साधनेही तयार केली. त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून चित्रपट पाहणे, कथाकथन करणे, प्रदर्शने भरविणे, उत्सव साजरे करणे, अशा अनेक कार्यक्रमांचे ते आयोजन करत.
गिजुभाईंनी बालशिक्षणाच्या सर्वच अंगांकडे लक्ष दिले. बालमानसशास्त्र जाणून त्यांप्रमाणे बालकांना शिकविणाऱ्या शिक्षकांचा गट करण्याच्या हेतूने त्यांनी सन १९२५ मध्ये भारतातील पहिले पूर्वप्राथमिक प्रशिक्षण केंद्र – अध्यापक मंदिर सुरू केले. तसेच खेड्यांपाड्यांतील प्रौढांना साक्षर करण्याचीही त्यांनी मोठी चळवळ उभारली. यास्तव त्यांनी अक्षरज्ञान नावाची पुस्तिका लिहिली. बालशिक्षण प्रसार हे उद्दिष्ट ठेऊन सन १९२६ मध्ये त्यांनी माँटेसरी संगाची स्थापना केली.

त्यानंतर तिचे नूतन बालशिक्षण संघ असे नामकरण केले. त्यांनी शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहकार्याने शिक्षणपत्रिका हे गुजराती मासिक सुरू केले. पुढे ते मराठी व हिंदीतूनही प्रकाशित होऊ लागले. जुगतराम या सहकाऱ्याबरोबर बालकांसाठी त्यांनी वाचनमाला लिहिली. या प्रकारची त्यांची एकूण शंभरांवर पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यांत बालनाटके, कथा, लोकगीते इत्यादींचा समावेश आहे. गिजुभाईंनी पुढे मतभेदांमुळे दक्षिणामूर्ती ही संस्था सोडली व राजकोट येथे अध्यापक मंदिर स्थापन केले. कठोर परिश्रमाने त्यांचे स्वास्थ्य बिघडले व त्यातच दि.२३ जून १९३९ रोजी अहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले.
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे आज स्मृतिप्रित्यर्थ त्यांना विनम्र अभिवादन !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री निकोडे कृष्णकुमार गुरुजी.
[म. रा. डि. शै. दै.रयतेचा वालीचे लेखविभाग प्रमुख व जिल्हा प्रतिनिधी.]मु. पो. ता. जि. गडचिरोली.व्हा. नं.७४१४९८३३३९.