पाखंडाचे खंडन करून मानवतेची पेरणी करणारे – संत कबीर

31

भारताच्या इतिहासामध्ये संत कबीरांचे नाव अतिशय अग्रभागी आहे ते त्यांच्या दोह्यामुळे! संत कबीरांचे दोहे हे दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रसंगी सर्वत्र वापरली जातात. संत कबीर यांचा जन्माच्याबाबत निष्कर्ष हे 1398 हे वर्ष मानतात. त्यांचा जन्म हा वाराणसीत लहरताराताल येथे झाला आहे. वाराणसीसह भारतभर लोकांचे प्रबोधन करण्यासाठी त्यांनी भ्रमंती केली. काही भक्त संत कबीर हे इस्लाम धर्माचे तर काही भक्त ते हिंदू धर्माचे,असे म्हणतात! पण त्यांचे दोहे मात्र ते मानवता धर्माचे होते हेच सांगतात!
एका दोह्यात ते म्हणतात,

मुल्ला होकर बांग जो देवे, क्या तेरा साहब बहरा है।
किडी के पग नेवर बाजे,
सो भी साहब सूनता रे।।
माला फेरी तिलक लगाया,
लंबी जटा बढाता है।
अंतर तेरे कुफर कटारी,
यो नहीं साहब मिलता रे।।

याचा अर्थ जर पाहिला तर छोट्या किडीच्या पायात असणाऱ्या घुंगरू ही त्याला ऐकू येतात आणि मुल्ला तुम्ही इतक्या जोरात बांग देतात,तुझा देव बहिरा आहे काय? तर पुढे गळ्यात मोठ्या मोठ्या माळा घालून कपाळावर गंध,भस्म टिळा आणि डोईवर लांब लांब जटा वाढविल्याने आणि अंतर्मनात जर कपट असेल तर देव कसा मिळणार? कबिरांच्या परखड विश्लेषण व दोहे यामुळे ते दोन्ही धर्माचे असल्याचे जाणवतात.त्यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीने की इस्लाम पद्धतीने याबाबत प्रश्न निर्माण झाला होता,असे सांगितले जाते!
आणखी एक दोहा यास पुष्टी देतो,

हिंदू कहू तो हो नही,
मूसलमान भी नाही।
गैबी दोनो दीन मे,खेलु दोनो माही।

याचा अर्थ मी हिंदूही नाही,मुस्लिमही नाही.मी दोघांच्या आत लपलो असून दोघांचाही आनंद घेत आहे. कबीरांचे कार्य सामान्य लोकांच्या उद्धारासाठी होते! म्हणून तर ते म्हणतात,
*कबीरा खडा बाजार मे।मांगे सबकी खैर।ना काहू से दोस्ती।ना काहू से बैर।।* भारतात त्यांच्या धर्म चिकित्सा व आदर्श वर्तनाबाबत संत कबीरांचे योगदान हे मौलिक आणि मार्गदर्शक आहे. कारण संत तुकाराम महाराज म्हणतात, *धर्माचे पालन। करणे पाखंड खंडन। हेचि आम्हा करणे काम*। *बीज वाढवावे नाम।* *तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे। नाही भीड भार* *तुका म्हणे सान थोर*।।

या दोन्ही संतांनी केलेली चिकित्सा आणि मानवता धर्माच्या स्थापनेसाठी केलेले प्रयत्न निश्चितच मार्गदर्शक आहेत. संत कबीर भारत देशांमधील विविध प्रांतात भ्रमंती करून त्यांनी समाजातलं वास्तव याचं परखड चिकित्सा करून मानवता या मूल्याचा पुरस्कार केलेला आहे.समाजाला समजेल अशा भाषेत त्यांनी अभंगरचना केली आहे!भारतभर संत कबीर यांच्या कृतीविचारांचे अनुयायी मोठ्या प्रमाणात आहेत.ज्यांना कबीरपंथीय असे म्हटले जाते. *कबीर जत्रा* सारखे काही कबीरांच्या विचारांचं जागरण करणारे सत्संगही आयोजित केले जातात. कबिरांची भजने ही सहजपणे गायिली जातात ज्यांचा अर्थ परिणामकारक जाणवतो! संत तुकाराम महाराज कबीरांना ते माझे सोयरे आहेत,असे अभंगात वर्णन करतात,

*नागजन मित्र नरहरी सुनार।कबीर रविदास सगे मेरे*।तर संत सेना महाराज म्हणतात,
*वेद ही झुठा शास्त्रही झुठा। झुठी साकी न मानी।*
*धन्य रविदासा धन्य कबिरा गावे सेना न्हावी।।*

देशातील नामवंत वक्ते असो की कीर्तनकार असो त्यांच्या बोलण्यात कबिरांचा दोहा,प्रसंग येत असतोच! संत कबिरांच्या या विचारांचा प्रभाव सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या कुटुंबावर होता हे आपल्याला सर्वश्रुत आहेच. संत कबिरांच्या कृती विचारांना प्रभावित होऊन जागतिक विद्वान डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांना आपल्या गुरूचा दर्जा देतात! एक प्रसंग आहे,ज्यात संत कबीर त्यांच्या गुरूच्या सांगण्यावरून श्राद्धासाठी खीर करायला दूध आणायला जातात. वाटेत एका ठिकाणी एक गाय दिसते तिच्याजवळ थांबतात. ती गाय मेलेली असते! पण हे तिथेच थांबतात, खूप वेळ झाला कबीर दूध घेवून परत आले नाही म्हणून शिष्यासह रामानंद शोधत येतात तर कबीर मेलेल्या गाईजवळ बसलेले ,हातात दूध घेण्याचे पात्र ही! रामानंद विचारतात दूध आणायला पुढे का नाही गेलास,इथे काय करतोस? त्यावेळी कबीर म्हणतात या गायीचे दूध घेण्यासाठी! त्यावेळी रामानंद म्हणतात हे कसे शक्य आहे,ही गाय मरण पावलेली आहे,ती दूध देवू शकत नाही की चारा खाऊ शकत नाही! त्यावर कबीर म्हणतात ही आज मेलेली गाय दूध देवू शकत नाही तर वर्षभरापूर्वी मेलेले तुमचे वडील ती खीर कशी खातील? रामानंद व शिष्य यांना समजले ! आपले डोळे कधी उघडणार, कधी समजणार! प्रसिद्ध विचारवंत MN टी व्ही चे मुख्य संपादक कमलकांत काळे म्हणतात, जन्मलेली कुत्रे मांजर चार -आठ दिवसांत डोळे उघडतात! आमचं काय??

कबीरांचा एक दोहा अनेकांच्या भाषणांत असतो जो फारच मार्मिक व मार्गदर्शक आहे, *माटिका एक नाग बनाके पूजे लोग लुगाया* *जिंदा नाग जब घर मे निकला। ले काठी धमकाया*। *जिंदा बाप कोई ना पुजे। मेरे बाद पुजवाया। *मुठ्ठीभर चावल लेके कोवे को बाप बनाया*।।या दोह्याचा अर्थ समजून घेतला की लक्षात येते मातीचा साप बनवायचा जो आम्ही नागपंचमी सणाला काढतो,त्या चित्राला/वारूळाला दूध इतर नैवेद्य ठेवून त्याचे पाया पडतो! पण वास्तवात जर साप अंगणात जरी दिसला तर लगेच काठी घेवून त्याला ठार केले जाते! तसेच पुढे म्हणतात माय बाप जिवंत असतांना त्यांचे वेळेवर जेवण,कपडे,औषधी संवाद याकडे दुर्लक्ष करायचे आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना कावळ्याच्यारुपात समजून पिंडदान/गोड जेवणाचे ताट मांडायचे! म्हणजे हा शुद्ध बावळटपणा झाला की! माय बाप कावळा कसा होईल! हाच कावळा जर इतरवेळी अंगणात जरी काव काव करत असेल तर त्याला दगड मारून हुसकावण्यात येते बरं! सापाच्या चित्राची पूजा आणि खरे असले की काठीने मारझोड करायची!

21 व्या शतकात चालत असतांना आजही मनुस्मृतीचे समर्थक जातीय विष पेरत आहेतच! बहुजन समाजाला हे लक्षात येत नाही,ज्यांच्या आले त्यांनी इतर बांधवाना जागृतीसाठी कृतीयुक्त प्रयत्न करणे गरजेचे असते! बहुजन समाजाची गत कशी आहे याबाबत संत कबिरांचा दोहा, *कबिरा कहे जग अंधा।*
*अंधी जैसी गाय।बछडा था सो मर गया।झुठी चाम चटाय।।*
म्हणजे जग हे अंधविश्वास बाळगणारे आहे.ज्याप्रमाणे गायीचं वासरू मेलेलं आहे. मालक मात्र भुसा भरून वासरू बनवतो.गाय त्याला वासरू समजून चाटते, दुधाचा पान्हा सोडते!बहुजन समाजातील शिकलेल्या न शिकलेल्या लोकांचेही हेच आहे! ते काल्पनिक देवी देवता यांच्या मुर्त्या /चित्रे यांच्या समोर दक्षिणा ठेवून त्यांच्या कडून अपेक्षा करीत आहेत.जे स्वतः सुरक्षित नाहीत,त्यांच्या गेट ला / दानपेटीला लॉक आहे!! तो सगळं पाहतो असं म्हणतात आणि सी.सी.टी.व्ही. बसविलेले आहेत! हे पाखंड लक्षात न आल्यामुळे बहुजन समाजाच्या सत्यनाशाला कारण बनले आहे.त्यामुळे डोळसपणे पाखंड समजून घेण्यासाठी चिकित्सक बनवू या.त्यासाठी का आणि कसे असे सोपे प्रश्न विचारू या!

पोथी पुराण वाचून पाठांतर करून सगळेच विद्वान होत नाहीत,मात्र *प्रेम* ही अडीच अक्षरे आचरणात आणली तर निश्चितच तो विद्वान समजला जाईल..या आशयाचा दोहा
*पोथी पढी पढी जग मुआ,* *पंडित भया न कोई।* *ढाई आखर प्रेम का,पढे सो पंडित होई।।*
ज्ञान हे कोणत्याही जातीच्या धर्माच्या लोकांची मक्तेदारी नाही.ज्यांना संधी मिळाली त्यांनी प्रयास करून त्यात प्राविण्य मिळवले.आजही समाजात जातीयवादी शक्ती विषमता पसरवित आहेच.काही जातींना धर्माला हलकं समजून त्यांना तुच्छतेने वागवितात. त्यांच्यावर शाब्दिक,शारीरिक हल्ले करतात! जे भयंकर आहे. कबीर महाराज याबाबतीत म्हणतात,
*जाती न पुछो साधू की। पुच्छ लिजीए ज्ञान। मोल करो तलवार का। पडी रहने दो म्यान।*

मिळालेल्या ज्ञानाचा समाजाच्या उद्धारासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला ती माणसं आजही उल्लेखली जातात! त्यामुळे कोरोना सारख्या महामारीने जाणीव अधिक दृढ झाली की आपला वेळ बुद्धी श्रम आणि पैसा हा समाजाच्या कल्याणासाठी खर्च करावा! त्यासाठी ही ध्येय घेवून काम करणारी देशभरात काम करणारी *नेतृत्व,विचारधारा आणि संघटन* असणारी संघटना यात आपण सहभागी होऊन काम कराल अशी आशा आणि विश्वास बाळगतो.

✒️लेखक:-रामेश्वर तिरमुखे(राज्यप्रभारी सत्यशोधक वारकरी महासंघ,महाराष्ट्र राज्य)9420705653