समग्र क्रांतीचा पुरस्कार करणारी आंबेडकरी चळवळ कट्टर असू शकत नाही

  37

  अभिव्यक्तीला मानवी जीवनाच्या विकासात अनन्य साधारण महत्व आहे. आधुनिक काळात तर ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ हा परवलीचा शब्द झाला आहे. सकारार्थी अभिव्यक्ती आणि संवादाने माणसाने मजल दरमजल वैचारिक प्रगती करत अनेकविध ‘इझम’ला जन्म दिला आहे. माणसाच्या बौद्धिक प्रगतीत या अनेक ‘इझम’नी आणि वैचारिक चळवळींनी महत्वाची भूमिकाच बजावली नाही तर माणसाच्या जगण्याला बळ सुद्धा दिले आहे. केवळ भारतीयच नाही तर जगातला माणूस आज अश्या एक टप्प्यावर येऊन उभा आहे की जगाची विभागणी मूलतत्त्ववाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद अश्या दोन छावण्यात झालेली दिसेल. समग्र परिवर्तनाचा ध्यास असणारा मोठा मानवी समूह बुद्धिवादाकडे अग्रेसर हातांना दिसत आहे. जगात एक असाही समूह आहे जो परिवर्तनाला शत्रू समजतो. परिवर्तन ही उत्तरोत्तर उजेडाकडे धाव घेणारी प्रक्रिया आहे. मात्र काही अंधारयात्री लोक उजेडाच्या या प्रक्रियेला खीळ घालण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. परिवर्तनाचे उजेडगामी चक्र उलटे फिरवण्याचा ते सातत्यपूर्ण कार्यक्रम आखत असतात.

  स्वतःला विचारवंत,लेखक म्हणवून घेणारे लोक जेव्हा काळोखाचे प्रवक्तेपद स्वतःकडे घेऊन अंधाराचा जयजयकार करतात. अंधाराशी हातमिळवणी करण्याचे खुले निमंत्रण देतात तेव्हा घनघोर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
  अलीकडेच ज्येष्ठ लेखक शरणकुमार लिंबाळे यांचा एक लेख वाचनात आला. ‘कट्टर, आक्रस्ताळी भूमिका दलितांनी सोडावी’ असे शीर्षक असणारा तो लेख होता. डॉ.लिंबाळेंचा ‘दलित’ या शब्दाचा कॅनव्हास बऱ्यापैकी मोठा आहे. हे त्यांच्या लेखावरून लक्षात येतं.हिंदू धर्मानुसार सर्व पूर्वास्पृश्यांना ते ‘दलितच’ समजतात आणि मानतात. ज्यांनी हिंदू धर्म सोडला त्या बौद्ध लोकांना सुद्धा ते ‘दलितच’ समजतात, किंबहुना सर्वांनी दलितच राहावे असा सुद्धा त्यांचा मानस दिसतो. मा. न्यायालयाने ‘दलित’ शब्द निषिद्ध ठरवला असतांना तो वारंवार वापरून आणि स्वतः चा सुद्धा ‘दलित लेखक’ म्हणून गौरवपूर्ण उल्लेख करतात, याचे सखेद आश्चर्य वाटते.

  दलित आणि दलितत्वाची एक अपमानजनक परंपरा महाराष्ट्राला आणि देशाला नवीन नाही. अनेकांना आजही दलित हा शब्द पुरस्कारासारखा वाटतो. अनेकांना हा शब्द आभूषणांसारखा वाटतो. असो, वैचारिक आणि तात्विक दृष्टीने कुणी किती खाली जावे हे ज्याचे त्याने ठरवावे. हा सुद्धा डॉ.बाबासाहेबांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा भाग आहे.डॉ.लिंबाळे हे प्रथितयश लेखक आहेत, विचारवंत आहेत. त्यांच्या साहित्यिक प्रतिभेबद्दल आम्हाला काहीही म्हणायचे नाही. पण आंबेडकरी चळवळीची चुकीची मीमांसा करून ते गैरसमज पसरवत आहेत एवढे मात्र निश्चित. आंबेडकरी माणसांच्या राजकीय पीछे हाटीलाच ते ‘आंबेडकरी चळवळ’ असे संबोधतात. आंबेडकरी समाजाचे राजकीय अपयश हे एकूण चळवळीचे अपयश आहे असे त्यांना वाटते. खरं म्हणजे ‘चळवळीला’ अनेक आघाड्यावर कार्य करावं लागतं.

  सामाजिक/सांस्कृतिक/आर्थिक/राजकीय उद्दिष्टांच्या एकत्रीकरणातून चळवळ साकार होत असते. म्हणून चळवळीच्या एखाद्या अंगाच्या मूल्यमापनावरून चळवळीचे यशापयश मोजत नसतात ही साधी गोष्ट लेखक म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाला समजली पाहिजे,अशी अपेक्षा करणे गैर नाही. नकार जर संदर्भासहित असेल तर पर्याय सुद्धा दमदार असावा लागतो हे लिंबाळेंना मान्य नाही का? असा प्रश्न त्यांचा लेख वाचल्यावर पडणे साहजिक आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला केलेले धर्मांतर हे केवळ धर्म बदलणे नव्हते तर इथल्या प्रस्थापित विषम व्यवस्थेला दिलेला १०० टक्के नकार होता. बाबासाहेबांचे धर्मांतर हे केवळ धर्मांतर नव्हते तर ते मूल्यांतर होते.

  या धर्मांतराने हजारो वर्षांपासून शोषित असलेल्या समूहाने जगण्याची नवी मूल्ये स्वीकारली होती. (ज्यांनी मूल्यांतराच्या या ऐतिहासिक घटनेकडे दुर्लक्ष केले ते समूह अजूनही विषमतावादी व्यवस्थेचे पालखीचे भोई बनलेले असून दलितत्वात गुण्यागोविंदाने राहत आहेत.) मूल्यांतराने नवे मूल्यभान असणारा समाज अस्तित्वात येणे हे नैसर्गिक होते. नव्या मूल्यव्यवस्थेमुळे नवे शब्द, नवे आचारविचार, नव्या संकल्पना अस्तित्वात आल्या त्या विषम व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हिंदुत्वाच्या विरुद्ध होत्या. त्यामुळे मूल्यांतरोत्तर समाजाने बोलण्यात आणि लिहिण्यात नवी शब्दसंहिता रुजवायला सुरुवात केली, आणि ती रुजवली सुद्धा. या मूल्यभानातून ‘स्वकथन’, ‘विचारमंच’ इत्यादी शब्द अस्तित्वात आले. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान सांस्कृतिक क्रांतीचा सुपरिणाम होता.हा बाबासाहेबांच्या मूल्यांतरचा सौंदर्याविष्कार होता.

  थोडक्यात काय तर समाज बदलाच्या प्रक्रियेवरच डॉ. लिंबाळेंचा आक्षेप आहे की काय अशीही शंका घ्यायला भरपूर वाव आहे.
  आंबेडकरी समाज सहअस्तित्वाला त्याज्य मानतो आणि एखाद्या बेटावर राहण्याची मागणी करतो अशी समजूत मा.लिंबाळे यांनी करून घेतली आहे. ती गैरवाजवी आहे. या देशातील अनुसूचित जातीच्या लोकांनी सह अस्तित्वाची किंमत वेळोवेळी मोजली आहे. खून,बलात्कार,छळ,बहिष्कार यांचा सामना अनुसूचित जातीच्याच लोकांना करावा लागतो हे सरकारी आकडेवारीवरून सहज आपल्या लक्षात येईल. आजही या लोकांना घोड्यावर बसून वरात काढण्यावर तथाकथित उच्चजातीयांची बंदी आहे, दलित युवकाने मिशी ठेवणे जातीयवादी समाजात आजही निषिद्ध मानले जाते, दलित महिला सरपंच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी खुर्चीवर बसून ऑनलाईन बोलते म्हणून गावातील दबंगांनी तिला खाली बसायला लावून तिचा विनयभंग केला.

  तेव्हा ऑनलाईन असलेले अधिकारी मात्र ‘तमाशा’ बघत होते. राजस्थानमध्ये एक युवकाने आंबेडकरांचे पोस्टर लावले म्हणून त्याचा खून करण्यात आला. अशा कितीतरी घटना सांगता येतील म्हणजे लिंबाळेंना सहजीवनाची दाहकता समजेल. या घटना अगदी आठवडाभरापूर्वीच्या आहेत हे विशेष. वाघ आणि बकऱ्याने एकत्र राहावे हि कल्पनाच मोठी भन्नाट आहे. सहजीवनाची कल्पना जातिविहीन समाजाशिवाय खऱ्या अर्थाने अस्तित्वात येणे शक्य नाही हे सांगण्यासाठी कुण्या जोतिष्याची गरज नाही.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील शोषित समूहांना पर्यायी राष्ट्र जरी दिले नसले तरी पर्यायी संस्कृती मात्र निश्चितच दिली आहे. या पर्यायी संस्कृतीचे नाते सरस्वतीशी नाही तर बुद्धाशी आहे.

  ही पर्यायी संस्कृती धर्माशी नाही तर धर्मविहीनतेशी नातं सांगणारी आहे. ही पर्यायी संस्कृती पूर्णतःजातिविहीन,धर्मविहीन समाजाची प्रस्थापना करणारी आहे. अशा विश्वकल्याणाचा ध्यास असणाऱ्या आणि ‘सब्बे सत्ता सुखी होन्तु’ हे ब्रीद असणाऱ्या अनुयायांना ‘कट्टर’ वगैरे म्हणणे हे निश्चितच समजूतदारपणाचे लक्षण असावे असे अजिबात वाटत नाही.
  ‘मोक्याच्या जागा काबीज करा’ हा आदेश बाबासाहेबांनी आपल्या अनुयायायांना दिला, तो संदर्भ खूप व्यापक होता. लिंबाळे म्हणतात की,मोक्याच्या जागा पटकवायच्या असतील तर आंबेडकरी समाजाने आक्रमक कट्टर भूमिकेचा पुनर्विचार करायला पाहिजे. आंबेडकरी समाजात कट्टरता आहे हा साक्षात्कार लिंबाळेंना कोणत्या गोष्टीवरून झाला हे कळायला मार्ग नाही.लिंबाळे मात्र प्राप्त परिस्थितीशी (अनागोंदीशी, वैचारिक आणि सांस्कृतिक व्यभिचाराशी) हातमिळवणी करून मोक्याच्या जागा काबीज करायला सांगत आहेत.

  याचा अर्थ ते सरळ सरळ (दलितांना) सरेंडर व्हायला तर सांगत नाही ना? स्वसन्मानाचा बळी देऊन आम्हाला मोक्याच्या जागा नको हे कुठलाही आंबेडकरी माणूस छाती ठोकून सांगेल. एखाद्या स्त्रीने अब्रूचा बळी देऊन भाकरी कमवावी असा निर्लज्जपणा आंबेडकरी विचारात बसतच नाही.
  व्यक्तिगत जीवन आणि सार्वजनिक जीवन यात भेद करून अर्थात दुटप्पी वागून सामंजस्य प्रस्थापित करायला लिंबाळे सर सांगत तर नाही ना अशी साधार भीती आहे. व्यतिगत जीवनात तुम्ही कट्टर असा पण सार्वजनिक जीवनात इतर जाती समूहाला सोयीस्कर होतील अशी ‘नाटकं’ करा असे कदाचित शरणकुमार लिंबाळे यांना सांगायचे असेल.

  उद्या या देशातील जातीयवादी,संविधानविरोधी, आरक्षणविरोधी पक्ष/संघटना आंबेडकरी समाजासमोर मदतीचा हात देतील तर आंबेडकरी समाजाने त्यांच्या बरोबर जावे असे डॉ. लिंबाळे सुचवत आहेत का? डॉ.लिंबाळे सामाजिक समतेऐवजी सामाजिक समरसतेला बळ तर देत नाही ना? याचाही उहापोह होणे गरजेचे आहे. आगामी काळात आरएसएस आणि सनातन सारख्या संघटना आंबेडकरी समाजासमोर मैत्रीचा हात पुढे करतील तर आंबेडकरी समाजाने त्यांच्या सोबत जायचे का? याचेही मार्गदर्शन डॉ. लिंबाळे यांनी करावे ही अपेक्षा गैर नाही.
  साहित्यिकाची कृती ही राजकीय असण्याबरोबरच सांस्कृतिक सुद्धा असते. यशवंत मनोहर आणि उर्मिला पवार यांची पुरस्कार नाकारण्याची कृती ही सांस्कृतिक तर होतीच पण येणाऱ्या पिढ्यांना साकारार्थी दिशा देणारी सुद्धा होती. लिंबाळे यांनी सरस्वती पुरस्कार स्वीकारणे आणि मनोहर यांनी सरस्वती प्रतिमा नाकारने या भिन्न सांस्कृतिक घटना आहे. ज्या प्रतिमा आणि प्रतीके १९५६ साली आपण नाकारली, त्याच प्रतिमा आणि प्रतिकांना आपण पुन्हा स्वीकारायचे का? हाच प्रश्न दोन्ही घटनांच्या मुळाशी होता. त्यामुळे सरस्वती प्रतिमा नाकारण्याच्या मनोहरांच्या भूमिकेचे कौतुक देशभरातील बुद्धिजीवी आणि बुद्धिवादी वर्गाने केले हा ताजा इतिहास आहे.

  सरस्वती पुरस्कार स्वीकारण्यामागे कट्टरता नाकारणे हा डॉ.लिंबाळेंचा विचार होता. असं त्यांनी म्हटलं आहे. यात काय लॉजिक आहे हे कळायला मार्ग नाही. कट्टरता आणि पुरस्कार यांचा काही संबंध असतो का? आणि तसा संबंध असेलच तर पुरस्कार दिल्या घेतल्याने कट्टरता जाते का? हा सुद्धा कळीचा प्रश्न आहे. हिंदूंच्या प्रत्येक जातीत असे अनेक कट्टरपंथी निर्माण झाले आहेत,लिंबाळे म्हणतात त्याप्रमाणे अशांना पुरस्कार देऊन कट्टरता नाकारता येईल का या दृष्टीनेसुद्धा विचार करायला हरकत नाही.वाद, संवाद आणि प्रतिवाद वैचारिक पर्यावरण जिवंत ठेवण्यासाठी गरजेचे असतात. यातून कटूता नाही तर सकारार्थी संवादाचे मार्ग खुले झाले पाहिजे यासाठी हा लेखन प्रपंच आहे. आम्ही कुणालाही शत्रू समजत नाही तर आज ना उद्या सर्वच जात समूह विश्व बंधुत्वाच्या मार्गाने अग्रेसर होतील असा ठाम विश्वास आहे.

  ✒️लेखक:-प्रशांत वंजारे(यवतमाळ)मो.9420689242