वृक्षांचे संगोपन लहान मुलांप्रमाणे करा-चेतन सौंदळे

    47

    ✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

    परळी(दि.24जून):-पर्यावरण दिनानिमित्त, जमात- ए-ईस्लामी हिन्द परळी शाखेच्या वतीने ‘पर्यावरण संरक्षण व संवर्धन’ जनजागृती सप्ताह’ अभियानाची सांगता समारोपाच्या कार्यक्रमाने झाली. पवित्र कुरआन पठनाने सांगता समारोहाची सुरूवात झाली. कार्यक्रमास प्रमुख पाहूने म्हणून परळी नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य माननीय चेतन सौंदळे सर उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी पवित्र कुरआन मध्ये पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्यासाठी असलेल्या दोनशे ‘आयत’ चा दाखला देत ढासळत चाललेल्या निसर्गाच्या समतोलासाठी प्रत्येक व्यक्तिने जबाबदारी स्विकारली पाहिजे असे या प्रसंगी नमुद केले.

    निसर्गाच्या ढासळलेल्या समतोलामुळे जगभरात सजीव सृष्टीला आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात झाडे जगवली गेली नाही तर ग्लोबल वॉर्मिंगमध्ये अजून वाढ होऊन याही पेक्षा गंभीर परिस्थितीचा संपूर्ण सजीवसृष्टीला सामना करावा लागेल. फक्त वृक्षारोपण करून चालणार नाही तर त्या वृक्षांचा आपल्या लहान लेकरांप्रमाने संगोपन करावे लागेल अशी सुचना आपल्या भाषणात पर्यावरण मित्र चेतन सरांनी केली.

    अध्यक्षीय समारोपात सालार पटेल यांनी तुकाराम महाराजांचे अभंग व बसवेश्वरांचे निसर्गाची महत्ती व्यक्त करणारे वचन याचा उल्लेख करत पर्यावरणाचे महत्व विषद केले. तसेच महंमद पैगंबरांची पर्यावरण संरक्षण विषयक शिकवणीच्या आठवण उपस्थितांना करून दिली. या कार्यक्रमास परळी शहरातील पर्यावरण प्रेमी तसेच जमात ए इस्लामी परळी शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन सय्यद सबाहत अली यांनी केले.