वंदेमातरम्… रचनाकार : बंकिमचंद्र चॅटर्जी

34

[बंकिमचंद्र चॅटर्जी जयंती विशेष]

बंकिमचंद्र चॅटर्जी विशेष करून ओळखले जातात ते त्यांनी लिहिलेलं देशाचं राष्ट्रगाण ‘वंदेमातरम्’ या करीता! त्यांनी लिहिलेलं हे राष्ट्रगीत आजपण लोकांच्या मनात देशाप्रती प्रेम व अभिमानाची भावना विकसित करते. ते बंगाली साहित्याचे एक महान कवी व कादंबरीकार होत. त्याबरोबरच ते एक प्रसिद्ध पत्रकार देखील होते. चॅटर्जींनी आधुनिक साहित्याची सुरूवात बंगाली भाषेतच केली नाही तर त्या बंगाली भाषेतील साहित्याला विशिष्ट दर्जा मिळावा याकरिता त्यांनी त्या साहित्याला उंच ठिकाणी नेण्याचं महत्वपूर्ण कामही केलं आहे. चला तर जाणून घेऊया अशा महान देशप्रेमीबद्दल थोडेसे… बालपण व जीवन : भारतातील महान साहित्यकार बंकिमचंद्र चॅटर्जी यांचा जन्म २६ जून १८३८ साली पश्चिम बंगालच्या परगणा जिल्ह्यातील कंठाला पाडा नावाच्या एका छोट्याशा गावी झाला. त्यांचं एक समृद्ध आणि संपन्न कुटुंब होतं. त्यांचे वडील यादव – जाधव चट्टोपाध्याय एक सरकारी अधिकारी होते.

तसचं त्यांच्या वडिलांनी पश्चिम बंगाल मधील मिदनापूर शहराच्या उपजिल्हाधिकारी पदावर आपली सेवा दिली होती. त्यांची आई दुर्गादेवी या एक गृहिणी होत्या. त्या घर काम करत आणि आपल्या परिवाराची काळजी घेत असतं. त्यांना दोन भाऊ होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण मिदनापूर मधील एका सरकारी शाळेत आपल्या भावंडांसोबत घेतलं होतं. भारताचे ‘अलेक्झांडर ड्यूमा’ म्हणून ओळखले जाणारे बंकिमचंद्र चॅटर्जी सुरवातीपासूनच एक हुशार विद्यार्थी होते. लहानपणापासूनच त्यांचे मन लिहण्या-वाचण्यात रमत असे. अशी महान बुद्धिमत्ता असणार्‍या बंकिमचंद्रांनी आपल्या शालेय जीवनातच एक कविता लिहिली. त्यांनी या आपल्या लिखाणातून सर्वाना अचंबित करून टाकल होतं. तसेच त्यांना संस्कृत भाषेचं खूपच आकर्षण होतं. शिक्षणाबरोबरच खेळामध्येही त्यांना खुप आवड होती. शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात ते मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असत. आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपलं पुढील शिक्षण मोहसीन महाविद्यालयात पूर्ण केलं. बंकिमचंद्र चॅटर्जी यांचा विवाह ज्यावेळी झाला, त्यावेळेला भारतात बालविवाह प्रथा सुरु होती.

याच प्रथेनुसार त्यांचा विवाह केवळ वयाच्या अकराव्या वर्षी सन १८४९ साली करण्यात आला. विवाहाच्या केवळ अकरा वर्षानंतर त्यांच्या पत्नीचं निधन झालं. यानंतर सन १८६० साली त्यांनी राजलक्ष्मी नावाच्या महिलेसोबत आपलं दुसरं लग्न केलं. त्यांच्या दुसऱ्या पत्नीकडून त्यांना तीन मुली झाल्या. त्यांनी आपल्या वयाच्या विसाव्या वर्षी प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून आपली कलाविषयाची पदवी पूर्ण केली. याचबरोबर सन १८५७ च्यापूर्वी स्वातंत्र्य चळवळींच्या वेळेला कलकत्ता विद्यापीठातून पदवी ग्रहण करणारे ते पहिले भारतीय नागरिक ठरले. पुढं त्यांनी आपलं वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं.

दंडाधिकारी – मॅजिस्ट्रेट : त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते ब्रिटीश शासनाच्या राजवटीत सरकारी सेवेत दंडाधिकारी – मॅजिस्ट्रेट म्हणून रुजू झाले. या पदावरून त्यांनी ब्रिटीश राजवटीतील सरकारमध्ये जवळपास ३० वर्षे सेवा दिली. नंतर त्यांनी आपली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुरुवातीला ब्रिटीश सरकारच्या अधिकाराखाली काम केलं होतं. क्रांतिकारकांनी केलेल्या स्वातंत्र्याच्या उठावामुळे त्यांच्या मनावर खुप मोठा परिणाम झाला. त्यांनी कुठल्याच सार्वजनिक आंदोलनामध्ये भाग घेतला नाही. परंतु आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांच्या कार्यप्रणाली विरुद्ध आपला राग व्यक्त केला.

लसाहित्यिक प्रतिभा : १९व्या शतकात त्यांनी बंगाली साहित्याला एक नवी दिशा दिली. त्यांच्यामुळेच बंगाली साहित्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली. असे हे महान साहित्यिक ईश्वरचंद्र गुप्ता यांना आपले आदर्श मानत असतं. त्यांच्याच आदर्शांवर चालून चॅटर्जींनी आपल्या साहित्यिक क्षेत्राची सुरुवात केली. त्यांनी इंग्रजीत लिहिलेली प्रथम प्रकाशित कादंबरी ‘रायमोहन्स वाईफ’ ही होय. ती इंग्रजी भाषेत असल्याने त्या कादंबरीला जास्त प्रसिद्धी मिळू शकली नाही. कारण त्यावेळेस इंग्रजीचं ज्ञान भारतातील कमीत कमी लोकांना अवगत होतं. यानंतर त्यांनी आपल्या क्षेत्रातील बंगाली भाषेत साहित्य लिहायला सुरवातच केली नाही तर त्या साहित्याला नव्या पातळीवर आणण्यात महत्वाची भूमिका देखील बजावली. त्यांची प्रेमकथेवर आधारित बंगाली भाषेतील पहिली कादंबरी ‘दुर्गेशनंदिनी’ सन १८६५ साली प्रकाशित झाली होती. तसेच दुसर्‍याच वर्षी त्यांच्याद्वारे लिहिण्यात आलेल्या कपालकुंडला रचनेची मोठ्या प्रमाणात प्रशंसा झाली होती. या रचनेपासूनच ते एक प्रसिद्ध लेखक म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी ऐतिहासिक संदर्भात सर्वात पहिले सन १८६९ साली ‘मृणालिनी’ नावाची कादंबरी लिहिली.

पुढं त्यांनी तीन वर्षातच आपलं ‘बांगदर्शन’ नावाचं मासिक पत्रिकेचं प्रकाशन सुरु केलं. त्यांची ही मासिक पत्रिका चार वर्षांपर्यंत प्रकाशित होत राहिली. सन १८८२ साली त्यांनी ‘आनंदमठ’ कादंबरी लिहिली. त्यांनी लिहिलेल्या याच कादंबरीमधून भारताचे प्रसिद्ध राष्ट्रगाण ‘वंदेमातरम्…’ घेण्यात आले आहे. त्यांनी रचलेली ही एक राजनैतिक स्वरुपाची कादंबरी असून ती हिंदी व ब्रिटीश राष्ट्रांसंबंधी होती. यात त्यांनी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध आपल्या पगारासाठी लढणाऱ्या भारतीय मुस्लीम व संन्यासी ब्राह्मणसेना यांच्याबद्दल उत्तम वर्णन केलं आहे. तसेच ती हिंदू आणि मुस्लीम यांच्यातील एकी दर्शविते. सन १९३७ साली त्यातून घेण्यात आलेल्या वंदेमातरम्… या गीताला राष्ट्रगाणचा दर्जा देण्यात आला आहे.
या गीताची लोकप्रियता इतकी होती की या गीताचे गायन स्वत: गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर यांनी केलं होतं, हे येथे उल्लेखनीयच! या महान रचनाकाराचा मृत्यू दि.८ एप्रिल १८९४ रोजी पश्चिम बंगाल कोलकाता येथे झाला.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे जयंतीनिमित्त बंकिमचंद्र चॅटर्जींना व त्यांच्या साहित्यप्रभेला कोटी कोटी नमन !!

✒️संकलक तथा शब्दयोजक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी[महा. डि. शै. दै. रयतेचा वालीचे लेख विभागप्रमुख व जिल्हा प्रतिनिधी तथा मराठी सारस्वत.]
मु. पोटेगावरोड, पॉवर स्टेशनच्या मागे, गडचिरोली.
जि. गडचिरोली, व्हा. नं. ७४१४९८३३३९.