आमदार कपिल पाटील पहिल्यांदा शिक्षक आमदार म्हणून निवडून आले त्याला आज १५ वर्षे पूर्ण होत आहेत. सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जयंतीदिनी कपिल पाटील पहिल्यांदा मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून आले. निवडून आल्यानंतर शिक्षकांच्या हक्कांसाठी सातत्याने ते विधानमंडळात लढत आहेत. विधीमंडळ समालोचन प्रत्येक वृत्तपत्रांत येत असते. २००६ आणि त्यानंतरही जेव्हा जेव्हा शिक्षण आणि शिक्षक यासंबंधी वृत्तपत्रांत बातम्या यायच्या त्यात आमदार कपिल पाटील यांचे नाव अग्रक्रमाने असायचे. छात्रभारतीशी संपर्क असल्याने तसेच पत्रकार म्हणून कपिल पाटील यांचे नाव माहित होते. शिक्षक भारतीची स्थापना झाल्यानंतर अवघ्या वर्षभरात कपिल पाटील आमदार झाले. विधीमंडळात विविध “आयुधे” वापरुन सरकारला जेरीस आणण्याचे काम त्यांनी केले, करित आहेत.

शिक्षकांचा आमदार असतो, हे पहिल्यांदा लोकांना माहित झाले ते कपिल पाटील यांचेमुळे. आज कपिल पाटील फक्त शिक्षक, शिक्षकेत्तर यांचेपुरते मर्यादित राहिले नाहीत तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य, वंचित, पीडीत, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, अंगणवाडी ताई यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा आवाज झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांच्या हक्काचा माणूस झाले आहेत. मुंबई मतदारसंघातून निवडून येऊन त्या मतदारसंघापुरते मर्यादित राहिले नसून ते सा-या महाराष्ट्राचे आमदार झाले आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मतदार असलेल्या मतदारांनी निवडून दिलेले आमदार असूनही ते प्राथमिक शिक्षक, आश्रमशाळा, विशेष शाळा, संगणक परिचर, कंत्राटी साधनव्यक्ती, अंगणवाडी ताई या सर्वांसाठी लढणारे व न्याय मिळवून देणारे कपिलभाऊ झाले आहेत. महाराष्ट्रातील वस्ती, वाड्यावर अल्प मानधनात काम करणा-या ८५०० वस्तीशाळा शिक्षकांंना न्याय मिळवून देणारे भाग्यविधाते झाले आहेत.

महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्राशी संबंधित प्रत्येक घटकाला आपल्या समस्येचे एकमेव उत्तर कपिल पाटील असल्याची जी भावना निर्माण झाली आहे ती त्यांनी मागील १५ वर्षांत केलेल्या कार्याचे द्योतक आहे. सरकार कोणतेही असो, तडजोड नाहीच या अविर्भावात कपिल पाटील शासनाच्या अन्यायकारक निर्णयांवर तुटून पडतात. “चांदा ते बांदा” पसरलेला शिक्षक भारतीचा वटवृक्ष बहरात येतोय, अनेक कार्यकर्ते घडवतोय. कपिल पाटील यांच्या गुणग्राहक नजरेतून हजारो कार्यकर्ते शिक्षक भारती, राष्ट्र सेवा दल, छात्रभारतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात कार्य करित आहेत.

शिक्षकांतील साहित्य प्रतिभेला नवे आयाम देण्यासाठी शिक्षक साहित्य संमेलन संस्था स्थापन करुन महाराष्ट्रभर शिक्षकांची साहित्य संमेलने भरवली जात आहेत. त्यातून शिक्षक साहित्यिक तयार होत आहेत. कपिल पाटील यांचे कल्पनेतूनच हे होत आहे. कोरोना काळात सातत्याने मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि इतरही मंत्र्यांना भेटून, अधिका-यांना भेटून शिक्षकांच्या समस्यांसाठी लढत आहेत. पत्रव्यवहार करित आहेत. आमदारकीची १५ वर्षे शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी पुरेपूर वापर करुन कपिल पाटील शिक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.

आमदारकीच्या १५ वर्षपूर्तीकरिता कपिल पाटील यांचे मनस्वी अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा!

✒️सुरेश डांगे,(विभागीय सरचिटणीस-शिक्षक भारती नागपूर विभाग,विभागीय कार्यवाह-शिक्षक साहित्य संमेलन संस्था नागपूर विभाग,राष्ट्र सेवा दल राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य)

महाराष्ट्र, लेख, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED