चार पैशाची मजुरी..…!

    33

    दोन दिवसांपूर्वी एका हॉटेलात चहा पित बसलो होतो; तेवढ्यात तिथे एक व्यक्ती येऊन “एक कट या गरीबाला पण द्या!” असे हॉटेल चालकाला म्हणत होता. माझ्या शेजारीच तो व्यक्ती येऊन बसला आणि माझ्याकडे एकटक पहायला लागला. त्याचे ते पहाणे मला थोडे विचित्रच वाटले. त्याच्या पोशाखावरून व बोलण्याच्या पद्धतीवरून मला तो एखादा भामटाच असेल असे वाटायला लागले कारण त्याचे ते पहाणे तसे दर्शवत होते. काही वेळाने माझ्यातला लेखक जागा झाला आणि आपण जरा बोलून या व्यक्तीला बोलते करावे; असे मी मनाशीच ठरवले.

    तो व्यक्ती असेल साधारणपणे 45 किंवा 48 वयाच्या दरम्यानचा! अंगावरचे कपडे मळके व जागोजाग फाटलेले होते. आपण जो ‘ठिगळ’ म्हणतो न तो प्रकारपण काही इथे पहायला मिळाला नाही. त्याचा तो आळस होता की त्याला फुरसतच नव्हती; ते शिवत बसायला! काय माहीत! (आपण कोणाच्याही अंगवस्त्रावरून त्याची लायकी व पेशा ठरवतो हे पाहून जरा वेगळे वाटले. मी पण सुरुवातीला तसाच विचार केला होता, त्यामुळे मीच खजील झालो! ) रंग सावळा- तसा कामाने व उन्हाने तो काळाच झाला होता. चेहऱ्यावरचे तेज काळ्या वर्णाने झाकोळून गेले होते. किरकोळ बांधा कपड्याच्या बाहेर डोकावत होता. हाताच्या भेगा नशिबाच्या रेषा पुसून टाकत होत्या. पिंगट डोळे आतली चिंता बाहेर दाखवत होते. रखरखीत त्वचा कोणत्याही बॉडी लोशनने ताजेतवानी होईल असे अजिबात वाटत नव्हते. घोगरा आवाज ज्यात वेदना दाटली होती.

    मध्ये- मध्ये फुटलेला की-पॅड चा मोबाईल कुठलीतर टोन सारखा वाजवत होता. विचारलं तर कळलं, त्याच्या मुलाने सकाळी कुठलातरी एक गेम त्या मोबाईलवर खेळल्यापासून तो मोबाईल असाच आवाज देत आहे. ( आणि त्याला तो आवाज बंद पण करता येत नव्हता…) मी मनाशीच विचार केला इथे पन्नास हजाराच्या मोबाईलमध्ये घरच पोरगं “नवीन गेम डाउनलोड करा पप्पा!” असे म्हणते, ज्याला आता जुने गेम खुप जुने वाटून बोअर झाले आहेत. इकडे या व्यक्तीचा मुलगा कोणता बरं गेम या की पॅड च्या मोबाईलमध्ये खेळत असेल? हे मला विचार करायला प्रवृत्त करून गेले. ( कमी सुखाच्या यादीत अधिकच सुख कोणतं? हे शोधणे सोपं आहे, पण जास्तीच्या सुखात मनाजोग सुख कोणतं? हे शोधणं तितकंच अवघड! )

    दाढीतले पांढरे केस दाढीची कधी नव्हे ती शोभा वाढवत होते. मिशांचा झुपकेदार संच जो काळाभोर होता, जसे वाळवंटाच्या माळरानातील अचानक फुललेली गर्द हिरवी वृक्षराजी! अंगावरचा सदरा पांढरा होता की पिवळा काही समजत नव्हते, इतका तो मलीन झाला होता. केस विंचरलेले पण अतिशय कमी होते. त्याचे कर्तनच तसे कमी केलेले होते. दाताचे पुढचे संच पांढरेशुभ्र सोडले तर बाकी दात पिवळे व काळवंडले होते, 1 -2 पडलेल्या दाढा बोलतानाच मध्ये नसल्याच्या खुणा न राहवून ती रिकामी जागा दाखवून देत होत्या. पायातला जोडा बूट होता की चप्पल हे काही अंदाज बांधता येत नव्हता. कारण तो जोडा इतका फाटलेला होता, की क्षणात बूट तर क्षणात चप्पल जाणवत होता. आजच्या ड्वेलरुपी जमान्यात त्याला तो नको असलेला आनंद उगाच जसा काय लपून-छपून मिळत असावा! मध्येच तंबाखू खाताना हातावर उड्या मारणाऱ्या टाळ्यांच्या हादऱ्यानने, त्या कणाने मला ठसका भरून शिंका येत होत्या. हातावरच्या शिरा पानातल्या शिरांसारख्या जागोजाग पसरल्या होत्या. जणू काही नदी व तिच्या उपनद्याच असाव्यात. पायाला व हाताला लागलेले जखमेचे वर्ण कुठे कोरडे तर कुठे रक्त पसरवत असलेले दिसत होते. बोलताना तंबाखूचा वास भपका मारत होता. जो माझ्यासाठी असहनीय होता.

    मी समोरच्या व्यक्तीला बोलते करण्यासाठी त्याचे नाव विचारले. समोरुन उत्तर आले,” कचरू!”; ” तुम्ही काय करता?” मी पुन्हा विचारले. “शेतात व बाहेरच्या कुठल्याही कामात मजुरीवर जातो.” कचरू बोलत होता. कचरूच्या बोलण्यातून कळले की तो ‘शेतमजूर’ आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी ‘मजुरी’ हाच एकमेव त्याचा स्तोत्र आहे. उत्पन्न जे म्हणतात न त्याचा तो भाग आहे. उत्पन्न बहुदा काही कमावल्यानन्तर शिल्लक राहणाऱ्या भागाला म्हणता येईल. इथेतर खायालाच उधारीने मागावे लागते तर शिल्लकचा तो प्रश्नच नाही. इतकी तुटपुंजी मजुरी होती.

    अंगावरचे कपडे फाटके व मळके असण्याचे कारणही त्यातलेच. कपडे शिवायला फुरसत नाही, अन् धुवायला बसतो म्हणलं तर साबण नाही. अशी ही दयनीय अवस्था त्या व्यक्तीची होती. हा व्यक्ती समाजातील उपेक्षितांचा केवळ एक नमुना म्हणता येईल, असे कित्येक लोक दयनीय व शोचनीय जीवन व्यतीत करत आहे; ज्याबद्धल आपल्या कोणालाही काही पडलेले नाही. त्यांच्या जिंदगानीला जीवन म्हणणे म्हणजे विनोदच होईल; कारण जीवन म्हणावं अस काही नाहीच आहे. हं! मरणासन्न वेदनेचे नाव नक्की देता येईल.

    तंबाखू खाणे ही लागलेली वाईट सवय जी आता व्यसन झाली होती; आणि हे व्यसन त्या मजुराला अजिबात परवडणारे नव्हते. हे व्यसन सोडतो म्हणलं तर सुटत नाही आणि कोणी यांचे व्यसन सोडायला पण येत नाही. समाजातला तो एक ‘वंचित’ व ‘दुर्लक्षित’ प्रकार आहे. ज्याला न कोणती जात आहे ना कुठला धर्म! ‘काहीतरी कमी आहे’, याचा विचार करत राहणे हेच काय ते जीवन असावे. एकवेळ क्षितिज गाठता येईल पण यांचे कठोर जीवनमान मरेपर्यंत संपणार नाही असेच राहील.

    शेतामधील काट्या-कुट्या लागून शरीरभर झालेल्या जखमा त्यांच्या वेदनेची तोंडी ओळ्ख देतात; आणि या जखमा जोडायला ना दवाखान्यातील औषधी आहे, ना पुसायला कोणी माणूस! केस कर्तन करून मुद्दाम छोटे केले होते; कशासाठी? तर पुनः पुनः तेच काम खर्चिक होऊ नये यासाठी!

    हॉटेल चालक आशा व्यक्तींच्या चार हाकांना तर ढुंकूनही पाहत नाही. जसा काय याचे तो पैसेच देणार नाही. यांची 200- 300 ची मजुरी बुडवणारे ते प्रतिष्ठित; आणि हे गरीब व हलाखीचे म्हणून कमी प्रतिष्ठित होतात काय? कमी प्रतिष्ठित कशाचे, प्रतिष्ठा नसलेलेच! कुत्र्यांना वागणूक देणार नाही, इतकी बदतर वागणूक मजुरांना मिळत असेल तर मानवी हक्क संघटना कोणते मानवी हक्क पाहतात हे त्यांनाच ठावूक असेल!

    शासन- मग ते केंद्रशासन असो की राज्यशासन पगार वाढ, वेतन आयोग आणि महागाई भत्ता यांची फेरी सातत्याने चालूच ठेवते. ज्यामुळे भरमसाठ पगार- पगारदार वर्गाला मिळत आहे. तसा पगार मिळत असेल तर आनंदच आहे. त्यांची ती मेहनतच आहे; आणि त्यांना तो मिळायलाचा पाहिजे. पण शेतमजूर व इतर असंघटित कामगार ज्यांचा मजुरीदर जो अत्यल्प आहे, ज्यातून जीवनावश्यक मानवी गरजाही पूर्ण होत नाहीत, त्यांच्यासाठी वेगळा न्याय का? माणूस जर विज्ञानाच्या दृष्टीने इतर प्राण्यांपेक्षा वेगळा असेल तर एकाच मानव जातीत फरक करणे जरुरी आहे का? महागाई ही सर्वांसाठी एकसारखीच आणि इतर खर्चपण सारखाच असायला हवा! मग, मजुरांना चार पैशातून हा सगळा ताळमेळ जमायला ते देवाचे नातू किंवा चार्टर्ड अकाऊंटंटची पैदास नाहीत!

    तो रोजमजुर ( कचरू ) व्यक्ती सारखा लक्ष्य देऊन एकटक माझ्याकडे यासाठी पाहत होता, की “याच्याकडे काय आहे जे माझ्याजवळ नाही. ज्यामुळे हा इतकी ऐट करत असेल.” याचाच तो शून्यात विचार करत असावा. तो काही चोर किंवा ठग नव्हता! ( त्यामुळे माझ्या पुसटशा विचारांना 21 तोफांची सलामी!)

    माझ्या काही ओळी,

    समाजमन स्वीकारत नाही की सोडवत नाही,

    कष्टीतांच्या वेदना….

    काही मिळेल की नाही त्यांकडे पाहून माहीत नाही..

    जमेल तर घ्या थोडीशीच..

    प्रेरणा…….!

    धन्यवाद!

    ✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती(लेखक,कवी,व्याख्याते,नांदेड )मो:-8806721206