रणमोचन च्या मोनाली ढोरे ची केंद्रीय औद्योगिक संरक्षण दलात निवड

36

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.30जुन):-ब्रम्हपुरी तालुक्यातील रणमोचन येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील कन्या कु.मोनाली दिलीप ढोरे हीची भारतीय अर्धसैन्यदलातील केंद्रीय औद्योगिक संरक्षण दलात निवड झाली असून तीचे प्रशिक्षण तामिळनाडू राज्यातील आराकोरम येथे होणार आहे.ब्रम्हपुरी तालुक्यातील रणमोचन या छोट्याशा गावात जन्माला आलेल्या मोनालीच्या घरी जेमतेम १ एकर शेती आहे.आई-वडील शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.सैन्यदलात नोकरी म्हटलं कि मुलींना त्यासाठी अजुनही बऱ्याच कुटुंबीयांकडून नकार दिला जातो. मात्र मोनाली च्या कुटुंबीयांनी तिला मात्र यासाठी नेहमीच प्रोत्साहित केले.

सैन्यदलाच्या भरतीची तयारी करत असतांना तिला अनेक अडचणी व संकटे आलीत. परंतु तीने कधीही मागे वळुन बघितले नाही. वैनगंगा नदीकाठालगत असलेल्या तिच्या गावात जायला धड रस्ते नाहीत. त्या रस्त्यांवरून ती एकटी मुलगी पहाटेच्या अंधारात धावण्याचा सराव करायची यावरून तिच्या मधला निर्भीडपणा दिसून येतो.सैन्य दलाच्या नोकरभरती साठी कोणत्याही सुविधा नसतांना केवळ दुर्दम्य इच्छाशक्ती व प्रचंड मेहनतीच्या बळावर तीने हे यश गाठले आहे.

ग्रामीण भागातील प्रत्येक मुलीने मनात कसलीही भीती व न्यूनगंड न बाळगता अभ्यास व शारीरिक तयारी केल्यास त्या यशाला सहज गवसणी घालू शकतात हे मोनालीच्या यशावरून सिध्द होते. तिच्या निवडीबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन केले जात आहे.तिने आपल्या यशाचे श्रेय आपले आई,वडील, गुरूजण, प्रा.कुलजीत कौर गील, प्रा.लक्ष्मण मेश्राम, मित्र-मैत्रीणी, गावकरी यांना दिले आहे.