ब्रिटिश सरकारची स्कॉलरशीप मिळवणाऱ्या राजूचा शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी केला गौरव

    37

    ?शेतकऱ्यांच्या मुलांची गरूडझेप….

    ✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

    मेहकर(दि.6जुलै):- ब्रिटीश सरकारची प्रतिष्ठित चेवनिंग ही स्कॉलरशिप मिळवणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील पिंप्री खंदारे येथील राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे या युवकाचा व त्याच्या आई वडिलांचा आज शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला पिंप्री खंदारे येथील अल्प भूधारक शेतकऱ्यांचा मुलगा राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे याने मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे.तर तुळजापूर येथे ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. यासोबतच राजू ने मेळघाट, ग्रामपरिवर्तन,मुख्यमंत्री फेलोशिप, समाजकार्य महाविद्यालय, आयपँक येथे सामाजिक कार्य केले. युवकांसाठी एकलव्य ही चळवळ सुरू आहे.सांगली, कोल्हापूर, केरळ येथे महापुराच्या काळात कार्य केले.

    यवतमाळ येथे जवळपास ३० हजार पुस्तके संकलन केले. ग्रामीण भागात ग्रंथालये सुरू करण्यासाठी ही मोहीम राबवली.या ध्येय वेड्या तरूणाच्या कार्याला आकार देण्यासाठी व पदव्युत्तर शिक्षणासाठी राजूला नुकतीच ब्रिटिश सरकारची प्रतिष्ठित चेवनिंग ही स्कॉलरशिप त्याला मिळाली आहे. जगातील १८ विद्यापिठात तो उच्च शिक्षणासाठी निवडला गेला. जगभरातील १६० देशातील युवा नेतृत्व करणाऱ्या तरूणांसाठी ही स्कॉलरशिप दिली जाते.६३००० युवकांमधून केवळ एक टक्का युवकांना ही स्कॉलरशिप दिली गेली त्यात राजू आहे. याचा आनंद संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याला असल्याने आज शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, सौ.राजश्री प्रतापराव जाधव यांनी पिंप्री खंदारे येथे जाऊन राजू चे कौतुक केले. त्याच्या कार्याचा गौरव केला. त्याच्या आई वडिलांचा सत्कार केला. तर खा.प्रतापराव जाधव यांनी राजूला प्रशस्तीपत्र दिले.

    त्यात खा.जाधव यांनी म्हटले की आपला बुलढाणा जिल्हा हा राष्ट्रमाता माँ जिजाऊंचा जिल्हा म्हणून जगात ओळखला जातो. आज एका जिजाऊ पुत्रामुळे पुन्हा एकदा जगात जिल्ह्याची मान उंचावली आहे.पिंप्री खंदारे येथील मातोश्री जिजाऊ व आत्माराम केंद्रे यांच्या पोटी जन्मलेल्या राजू ने स्वकर्तुत्वाने ब्रिटिश सरकारची जगमान्य स्कॉलरशिप मिळवल्याने जगात बुलढाणा जिल्ह्याची मान उंचावली आहे.याबद्दल राजूचे कौतुक व अभिनंदन करीत आहे. यावेळी सरपंच कमल चौधर,सुरेश चौधर,पोलीस पाटील प्रभाकर पाटील, रोजगार सेवक भास्कर उबाळे, शिवसेना पदाधिकारी राम भालेराव,सोशल मिडिया प्रमुख बाळू जाधव उपस्थित होते.