अखेरचा हा तुला दंडवत !

26

काल (7 जुलै) सकाळची सुरुवातच एका धक्कादायक बातमीने झाली. छातीत चर्र झालं.शतक अगदी जवळ येऊन ९९ धावांवर बाद झाल्यावर जे शल्य मनात घर करून राहते तशी ती बातमी होती. मला मनोमन वाटायचं शतक पार व्हावे.परंतु मनासारखे सर्व घडत गेले तर त्या नियतीचे महत्व ते काय ?एखाद्या घरात हाता पायांच्या हालचालींचा वेग मंदावला असला,नजर कमजोर झाली असली तरी ते त्या घरचा कर्तृत्ववान माणसाकडे जसे एक मोठा आणि भक्कम आधार म्हणून पाहिले जाते अशा आधाराला आज केवळ हिंदी चित्रपटसृष्टीच नव्हे तर सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रही मुकल्याची ती अतिशय वाईट अशी बातमी होती.भारतीय चित्रपटसृष्टीचे अभिनय सम्राट ‘दिलीप कुमार’ आज आपल्यात नाहीत हे मानायला अजूनही मन तयार होत नाही.हिंदी सिनेमात असा एकही कलाकार नाही ज्याने दिलीपकुमार यांची नक्कल केली नाही.किंबहुना आज मावळतीकडे चाललेल्या कलाकारांपासून उदयाला आलेल्या आजतागायत नव्या कलाकारांपर्यंत जवळपास सर्वच कलाकार त्यांच्या अदाकारीची नकल करतच यशस्वी झाले आहेत, नावारूपाला आले आहेत.त्या कलाकारांचे ते आदर्श आणि प्रेरणास्थान होते.

त्यांचा दमदार अभिनय आणि जबरदस्त संवादफेकीने तर सिनेरसिकांच्या मनावर कायमचे अधिराज्य गाजवले आहे.
आमचं घराणं तसं नाट्य आणि चित्रपट रसिकांचं.आमचा जन्मही झाला नव्हता त्यावर्षीचा म्हणजे 1955 ला प्रदर्शित झालेल्या देवदास या चित्रपटाविषयी दिलीपकुमार यांच्या अभिनय संदर्भात आमच्या घरी अनेकवेळा चर्चा होत असे.त्यामुळे त्या चित्रपटविषयी आणि त्यांच्या अभिनयाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मनात खूप उत्सुकता असायची परंतु त्या काळात लहानांना आजच्या सारखी चित्रपट पाहण्याची मुभाही नव्हती आणि प्रथाही नव्हती. पुढे काही काळानंतर देवदास पाहण्याचा योग आला आणि तो चित्रपट आजही पुन्हा पुन्हा पाहावसा वाटतो.त्या चित्रपटातील पारोचा विरह सहन न झालेल्या दुःख उरी दाटलेल्या देवदासाचा “कौन कमबख्त पीता है जीने के लिए” असा संवाद ते दृश्य स्वरूपात दिसत नसले तरी विरहाने व्याकुळ झालेला आणि थेट हृदय पिळवटून टाकणारी त्यांची दर्दभरी आर्त आज इतक्या वर्षांनंतरही मन हेलावून टाकते.

आज पाकिस्तानात असलेल्या पेशावर प्रांतात 11 दिसंबर 1922 रोजी जन्म झालेले युसूफ खान उर्फ दिलीप कुमार हे आपल्या तेरा भावंडांपैकी आपल्या आई वडिलांचे तिसरे अपत्य होते.आपले प्राथमिक शिक्षण त्यांनी पुणे आणि नाशिक जवळील देवळाली येथे पूर्ण केले.घरचा फळ विक्रीचा व्यवसाय असल्यामुळे त्यांनी आपले वडील गुलाम सरवर खान यांना व्यवसायात मदत करु लागले. त्यात त्यांचे मन लागले नाही.स्वतंत्र व्यवसाय करण्याच्या उद्देशाने त्यांनी पुणे येथे चहाचे कॅन्टीन थाटले. याच काळात वर्ष १९४३ ला त्यांची डॉ.मथाई यांच्या वतीने बांबे टॉकीजच्या व्यवस्थापिका देविका राणी यांच्याशी भेट झाली.त्यांचा हसतमुख चेहरा आणि भारदस्त पणा आणि कलात्मक गुण हेरुन देविका राणी यांनी त्यांना मुंबईला येण्याचे आमंत्रण दिले. सुरुवातीला दिलीप कुमार यांनी ती गोष्ट तितक्या गांभीर्याने घेतली नाही. परंतु कॅंटीन व्यवसायातही त्यांचे मन रमेना म्हणून त्यांनी देविका राणींना भेटायचे ठरवले. आणि मुंबई गाठली.

देविका राणी यांनी युसूफ खानला एक सल्ला असा दिला की,जर तू आपले फिल्मी नामकरण करायला तयार होशील तर अभिनेता म्हणून तुला आगामी ‘ज्वार भाटा’ या चित्रपटात काम मिळू शकेल.त्यासाठी युसूफ खान यांच्यासमोर देविका राणींनी वासुदेव,जहांगीर आणि दिलीप कुमार यापैकी एक नाव निवडण्यास सांगितले.जरी १९४४ ला प्रदर्शित झालेल्या ज्वारभाटा या चित्रपटापासून अभिनेता म्हणून दिलीप कुमार यांची कारकीर्द सुरू झाली असली तरी ज्वार भाटाच्या अपयशानंतर दिलीप कुमार यांनी प्रतिमा, जुगनू, अनोखा प्यार, नौका डूबी या सारख्या काही बी आणि सी ग्रेडच्या चित्रपटातूनही अभिनेता म्हणून काम केले परंतु त्यांना म्हणावं तसं यश लाभले नाही. चार वर्ष मुंबईच्या मायानगरीतील संघर्षानंतर १९४७ चा ‘जुगनू’ आणि१९४८ मध्ये प्रदर्शित ‘मेला’ या चित्रपटाच्या यशानंतर दिलीप कुमार यांचे नाव सर्व श्रुत झाले.दिलीप कुमार यांची एकूण चित्रपट कारकीर्द पाहता त्यांनी साकारलेल्या विविध भुमिकांद्वारे अनेक व्यक्तीरेखांना जिवंत तर केलेच त्याचबरोबर त्यांना कायमची ओळखही दिली आहे.

आजही विदेशी पर्यटक चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका पाहून स्पष्ट अभिप्राय नोंदवतात की, भारतात दोन गोष्टी आवर्जून पहावेत त्या म्हणजे एक ताजमहल आणि दूसरे दिलीपकुमार यांचा अभिनय.१९४९ च्या “अंदाज़” या चित्रपटात शोमैन राजकपूर आणि ट्रैजडी किंग दिलीपकुमार यांनी पहिल्यांदा एकत्र काम केले.हा चित्रपट त्याकाळी अतिशय सुपर हिट ठरला. दीदार (१९५१) आणि देवदास (१९५५) यासारख्या चित्रपटांतून गंभीर भूमिकांना न्याय दिल्यामुळेच पुढे जाऊन अभिनय सम्राट या विशेषणाबरोबरच ट्रेजडी किंग अशी ही त्यांची नव्याने ओळख रुढ झाली.चित्रपट सृष्टीत दिलीप कुमार आणि अभिनेत्री मधुबाला यांच्या जोडीची खूप प्रशंसा झाली.’तराना’ च्या निर्मितीच्या काळातच मधुबालाचा दिलीप कुमार यांच्यावर जीव रंगला होता.तिने आपल्या वेशभूषाकरच्या हातून गुलाबपुष्प आणि जर तुम्हालाही प्रेम वाटत असेल तर हे तुमच्याकडे ठेवून घ्या असा संदेश पाठवला.आणि विशेष म्हणजे दिलीप कुमार यांनी ते पत्र आणि त्या गुलाबपुष्पाचा आनंदाने ने स्वीकार केला.

वर्ष १९५७ मध्ये प्रदर्शित आणि अत्यंत गाजलेल्या बी.आर.चोपड़ा यांच्या’नया दौर’ या चित्रपटात आधी दिलीप कुमार यांची नायिका म्हणून मधुबालाची निवड केली गेली होती. मुंबईतच यांचे चित्रीकरण करण्यात येणार होते.नंतर कथानकाची गरज म्हणून स्थल आणि सभोवतालचे वातावरण उठावदार दिसण्यासाठी निर्मात्यांना यांचे चित्रीकरण भोपाळमध्ये ही करावे असे वाटले.मधुबाला हिचे वडील अताउल्लाह खान यांनी आपल्या मुंबईच्या बाहेर गेल्यावर दिलीप आणि मधुबाला अजून जवळ येऊन त्यांच्या प्रेमात आणखी वृद्धी होईल म्हणून तिला मुंबईच्या बाहेर पाठवायला नकार दिला.यानंतर बी.आर.चोपड़ा यांना मधुबालाच्या ऐवजी वैजयंतीमालाला घ्यावं लागलं. अताउल्लाह खान यांनी ही बाब न्यायालयात नेली.आणि नंतर त्यांनी मधुबालाला दिलीप कुमारसोबत काम करण्यास मनाई केली आणि अशा रीतीने दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यातील अंतर दूर झाले.एका गुलाबपुष्पापासून सुरू झालेली प्रेमकथा अताउल्ला खान यांनी काट्याने संपवली.

वर्ष १९६० मध्ये दिलीप कुमार यांच्या चित्रपट कारकीर्दीतील एक सर्वश्रेष्ठ कलाकृती ‘मुगल एक आझम’ प्रदर्शित झाली.के.आसिफ यांनी सलीम-अनारकली यांच्यातील प्रेमसंबंधातील ऐतिहासिक पार्श्वभूमिवर आधारित निर्माण केलेल्या या अजरामर चित्रपटात दिलीप कुमार यांनी शहजादा सलीमला पडद्यावर ख-या अर्थाने जिवंत केले.वर्ष १९६१ मध्ये ‘गंगा जमुना’ या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपट निर्मितीत पाऊल टाकले. गंगा जमुना मध्ये दिलीप कुमार यांनी हिंदी आणि भोजपुरी या दोन्हीचे सुरेख मिश्रण केले होते.त्यांचा हा प्रयोग अतिशय प्रशंसला गेला.या चित्रपटात दिलीप कुमार यांच्यासह त्यांचे बंधू नासिर खान यांची ही भूमिका होती.या चित्रपटाच्या यशानंतर दिलीप कुमार यांनी पुढेही चित्रपट निर्मितीचा मानस जाहीर केला.परंतु आयकर खात्याच्या वाईट अनुभवामुळे त्यांनी तो प्रयत्न सोडून दिले.

१९६६ मध्ये दिलीप कुमार यांनी अभिनेत्री सायरा बानो यांच्याशी विवाह केला. १९६७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘राम और श्याम’ चित्रपट त्यांच्या कारकीर्दीतील आणखी एक सुपरहिट चित्रपट ठरला.दोन जुळ्या भावांचे कथानक असलेल्या या चित्रपटात एक अतिशय पापभिरू मवाळ आणि दुसरा बिनधास्त कुणालाही न जुमानणारा अशी भिन्न व्यक्तीमत्त्वाची दोन भिन्न टोकाची भूमिका दिलीप कुमार यांनी सहज सुंदर आणि परिणामकारक रित्या साकार करून प्रेक्षकांची मने जिंकली.
याच चित्रपटापासून प्रेरणा घेऊन यानंतर अनेक निर्मात्यांनी दुहेरी भूमिकेच्या चित्रपटांची निर्मिती केली.वर्ष १९७६ च्या बैराग नंतर दिलीप कुमार हे जवळपास पांच वर्षापर्यंत चित्रपट सृष्टीपासून अलिप्त राहिले.१९८० मध्ये निर्माता-निर्देशक मनोज कुमार यांच्या विशेष विनंतीला मान देऊन दिलीप कुमार यांनी क्रांति या चित्रपटात जरी चरित्र अभिनेता म्हणून भूमिका केली तरी प्रत्यक्षात मात्र त्यांच्याच नावावर चित्रपट चालला गाजला वर्ष १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या शक्ती सामंत यांच्या शक्ति ची चित्रपट कारकीर्दीतील एका उत्कृष्ट चित्रपटात गणना केली जाते.या चित्रपटात अमिताभ बच्चन समोर कुणाला ही सहजतेने काम करायला अडचणी आल्या असत्या.परंतु शक्ति या चित्रपटात दिलीप कुमार सोबत काम करताना अमिताभ बच्चन याचीच अनेक वेळा गाळण उडताना दिसली.

या चित्रपटात दिलीप कुमार अमिताभचा पाठलाग करत आहेत त्यावेळी त्याला मागे वळून पहायचं असं एक दृश्य आहे. जेव्हां तो असे करतो त्यावेळी तो दिलीप कुमार यांच्या नजरेला नजर मिळवत नाही ही गोष्ट कुठल्याही चाणाक्ष आणि अभ्यासू रसिकांच्या नजरेतून सुटत नाही.या दृश्याचे अनेक रिटेक घेऊन ही परिणामकारक दृश्य मिळत नाही हे पाहून दिग्दर्शकाला हा नाद सोडून द्यावा लागला.हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वाधिक फिल्म फेयर पुरस्कार प्राप्त करण्याचा विक्रम दिलीपकुमार यांच्या नावाने नोंद आहे.चित्रपट सृष्टीतील दिलीप कुमार यांच्या अनमोल योगदानाबद्दल वर्ष १९९४ मध्ये चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च सम्मान ‘दादा साहेब फाळके’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.याशिवाय पाकिस्तान सरकारने देखील त्या देशाचा सर्वोच्च सम्मान निशान-ए-इम्तियाज प्रदान करुन गौरव केला आहे.वर्ष १९८० मध्ये मानाचे समजले जाणारे ‘मुंबई चे शेरिफ’ या पदावर त्यांची नियुक्त केली गेली होती.

चित्रपट सृष्टीत दिलीप कुमार ही एकमेव व्यक्ती आहे जे ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असे खंडीभर चित्रपट घेऊन कधीच काम केले नाही.त्यांनी चित्रपटांच्या संख्येकडे कधीच पाहिले नाही.सदैव कामाच्या दर्जावर ते लक्ष्य केंद्रीत करतो असतं.म्हणून तर आपल्या साठ वर्षात साठ चित्रपटातून भूमिका केल्या.जगल्या आणि रसिकांची मने जिंकली.त्यांच्या चित्र सृष्टीतील आगमनानंतर ख-या अर्थाने अभिनय कशाला म्हणतात त्याची सुरुवात झाली.आणि रसिकांना कळायला लागलं.आज हिंदी सिनेमासृष्टी इतकी समृद्ध आणि संपन्न असून जगात नावलौकिक मिळवून आहे याचे बरेचसे श्रेय दिलीप कुमार यांना द्यावे लागते.दिलीप कुमार हे फक्त एक नाव नाही तर ते सिनेमा सृष्टीतील एक पर्व होते.हिंदी चित्रपट सृष्टीतील एक पर्व एक अध्याय आता संपला आहे.निळ्या डोळ्यांचा राज, देखणा सॉफिस्टिकेटेड देव हे अभिनयाचे आपापले एक साचेबद्ध स्वतंत्र विद्यापीठ होती मात्र दिलीपकुमार त्याला अपवाद होते. दिसायला जितका गंभीर तितकाच अवखळ दिलिप कुमार मात्र प्रत्येक भुमिकेत वेगळा भासला .

मग तो सलिम असो , देवदास असो , आन मधला प्रेमिक असो , कोहिनूर मधला राजकुमार असो किंवा नया दौर मधला तडफदार नौजवान असो अथवा गंगा जमना किंवा संघर्ष मधला बंडखोर नायक, दिलिपकुमारला विनोदाची जाण जबरदस्त होती हे राम और शाम,कोहिनूर अशा चित्रपटांनी शिक्कामोर्तब केले आहे.अभिनयाचे ते एक विश्वविद्यालय होते. दिलीपकुमार हा एक असा “माणूस” होता की,ते जर चित्रपट सृष्टीत आले नसते तर एक विख्यात खेळाडू, समाजसुधारक नक्कीच झाले असते.पूर्वी नैसर्गिक आपत्ती आली की, समाजाप्रती आपले कर्तव्य समजून सिनेजगतातील सर्व अभिनेता, अभिनेत्री एकत्र रॅली काढून निधी गोळा करत असत. त्या गर्दीत दिलीपकुमार यांच्या हातात हात देऊन निधी साठी पैसे देणा-यांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याचे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे.देव राज दिलीप या अभिनयाच्या कडीतला अखेरचा दुवा अभिनय सम्राट दिलिप कुमार आज जन्नतुल मध्ये आपलं अधिराज्य प्रस्थापित करायला मार्गस्थ झाला आहे.दिलीप कुमार हे फक्त एक नाव नाही तर ते सिनेमा सृष्टीतील एक पर्व होते.हिंदी चित्रपट सृष्टीतील एक पर्व एक अध्याय आता संपला आहे. अभिनयातील एक संस्था आज काळाच्या पडद्याआड गेली आहे.

मात्र माझ्यासाठी दोन सुखद आठवणी मनात घर करून माझ्या दृष्टीने हा एक इतिहास सदैव माझ्या मनात कायमचा आदर्श म्हणून माझ्या सोबत राहणार आहेत.मला मनोमन वाटायचं की,युसूफ साहेबांनी ” सेंचुरी” पार करावी. ही इच्छा आज अशीच राहून गेली. माझ्या जीवनात आनंदाचे जे क्षण आले त्यातल्या त्यात दिलीपकुमार यांच्या आठवणीतून मी स्वतःला भाग्यवान समजतो. कारण युसूफ साहेबांना अगदी जवळून भेटण्याचे दोन प्रसंग माझ्या आयुष्यात आले.एकदा सोलापुरातील पानगल हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात आणि दुस-यांदा मुंबई वीटी ते लोनावळा पर्यंत त्यांच्या सोबत प्रवास करुन. अंधजनांच्या मदतीसाठी निधी गोळा करण्यासाठी “आंतरराष्ट्रीय ब्लाइंड असोसिएशन” द्वारा एक विशेष गाड़ी चालवली गेली होती त्यावेळी त्यांच्या सोबत सायरा बानो,सई परांजपे होते. मी आणि मुंबईतील माझा एक मित्र त्या दिवशी त्यांच्या सोबत लोनावळ्या पर्यंत प्रवास केला.माझ्या जवळील ओळख पत्राचा मी पहिल्यांदा दुरुपयोग केला.याचे एकमेव कारण म्हणजे, दिलीपकुमार यांच्या विषयी मनात असलेला आदर, कलेविषयी निष्ठा असल्यामुळे अभिनय सम्राट म्हणून त्यांच्यावरील अपार श्रद्धा असल्याने त्यांना पुन्हा एकदा जवळून पाहण्याची इच्छा. त्यादिवशी दोन मिनिटांसाठी का होईना अगदी त्यांना जवळून पाहण्याची दिलीपसाहेबांशी हात मिळविण्याची संधी मिळाली.

ही १९८३ ची गोष्ट आहे.तेव्हां आजच्या सारखे तंत्रज्ञान विकसित नव्हते, असते तर आयुष्यातले हे सुवर्ण क्षण टिपून मोठ्या अभिमानाने, मोठ्या गर्वाने जगासमोर मांडले असते.परंतु ती जवळीक हाताचा तो स्पर्श मला लाभलेला अनमोल ठेवा समजून मनाच्या आतल्या कप्प्यात मी आजही माझ्या जिवापाड जपून ठेवला आहे.तो ठेवा माझ्यासोबतच नेणार आहे.भारतीय चित्रपट सृष्टीतील या महान पर्वाला अखेरचा सलाम !आज हमने एक महान ,रहम दिल ,नेक बंदे को खो दिया है अल्लाह ताला उन्हें जन्नतुल फिरदोस में आला मुकाम अता फरमाए .आमीन !

दिलीप साहब हर हमेशा अमर है.

✒️लेेखक:-विठ्ठलराव वठारे(उपाध्यक्ष,पॉवर ऑफ मिडिया फाऊंडेशन, महाराष्ट्र)
joshaba1001@gmail.com