“आयुष्याची वारी झाली “

21

(भाग -एक)
आयुष्यातील पहिली वारी अनुभवली तेव्हा माझं वय वर्ष फक्त दहा होतं,इयत्ता चौथीत शिकत होतो .. अगदी निरागस बालवय .. आषाढ महिना आला , पंचक्रोशीतुन पंढरपूरच्या दिशेने दिंड्या पताका जावू लागल्या , गावातील वारकरीही दोन दिवस आधीच तयारी करू लागले वारीला जाण्याची , त्यातलेच एक बाबा बोललेत , लेका चालतोस का वारीला , जणु त्या पंढरपुरच्या विठुमाऊलीने हाक दिली, लेका ये की रे भेटायला , तेव्हाच आस लागली विठु दर्शनाची … आईबाबांजवळ हट्ट धरला की पंढरपूरी जायचचं , माझाही बालहट्ट , तो पुरवावाच लागला , मायमाऊलीने विठुमाऊलीच्या भरवश्यावर पोटचा गोळा वारीला पाठवला .. धन्य ती माऊली . प्रस्थानाचा दिवस आला , पंढरपूरच्या दिशेने आम्ही निघालो , माझा दहा वर्षाचा देह, इवलीशी कोवळी पावलं झपझप झपझप चालु लागली.

मनात आस होती माऊलीच्या दर्शनाची , बोबड्या बोलाने विठ्ठल विठ्ठल गात होतो … उन्हातान्हात चालतच रहायचो …पंधरा दिवसाचा हा अलौकिक प्रवास देहभान विसरून पार पाडत होतो , जेव्हा थकायचो एखादे वारकरी मला खांद्यावर उचलून चालायचेत …. जिव्हाळा , प्रेम, काळजी , माया , हे सगळं शिकलोय या वारकरी मायबापांकडुन … स्वतःहून जास्त काळजी घेतात ते आपल्या साथी आलेल्यांची … जसा सासुरवाशिन लेकीला माहेरची ओढ तशी त्या जगजेठीला भेटण्याची ओढ लागली होती , नाचत गात भक्तीत तल्लीन होत हा प्रवास चालुच होता ..
जेव्हा बोबड्या बोलात विठु विठु म्हणायचो तेव्हा बाकी वारकरी उद्गारले लेकरा धन्य तुझे माता पिता . माझ्या भक्तीमुळे माझ्या मायबापांना धन्यता प्राप्त व्हायची .

“आपुलिया हिता , जो असे जागता ,
धन्य माता पिता , तयाचिया “

तो पांडुरंग हाक मारतोय की काय , अस वाटायचं
“मी चाललो चाललो
माझी माय बोलावते “

ओढ संपली शेवटचा दिवस उगवला , सावळ्या हरीला बघायचचं होतं , कशी आहे ती कर कटेवर ठेवुन विठेवर उभी असलेली सावळी माय , कधी तीला आलिंगन देतो असं झालं होतं .. प्रतिक्षा संपली , डोळा दिसली ती संथ वाहणारी माय चंद्रभागा , जणु स्वागतालाच उभी होती .. आम्ही सगळे पात्राजवळ गेलो , ते पवित्र शीतल जल ओंजळीत घेतलं , आणी जणु माय चंद्रभागाचं बोलू लागली कि काय असं झालं .. जा लेकरा जा तुझी ती सावळी माय गाभारी पंधरा दिवसापासून तुझी वाट बघत आहे , आता विलंब नको .. चंद्रभागेत स्थान करून , लगबगीने निघालो , नामदेवपायरीपाशी नतमस्तक झालो , जनाई आठवली ,नामा आठवला …पुढे होता तो गरूडखांब , गरूडखांबाला आलिंगन देण्यासाठी माझे लहानशे बाहु पुढे केले , पण खांब काही कवेत येईना , तेव्हांच निश्चय केला जोपर्यंत गरूडखांबाला कवेत घेत आलिंगन देत नाही तोपर्यंत निरंतर वारी करेन …

ओढ काही आवरेनात , धावतच गाभार्यात गेलो , डोळ्याचं पारणं फिटलं , आयुष्य सार्थकी लागलं डोळ्यात चंद्रभागा अवतरली , पुढे होती ती माझी पंढरीची सावळी विठाई , माझीच वाट बघत होती , दर्शनाला रांग होती, हळु हळु पुढे सरकु लागलो , माय जवळ येत होती , कधी माऊलीच्या चरणी डोक टेकवतो असं झालं होत . पांडुरंगासमोर हे दहा वर्षाचं लेकरू हात जोडुन उभ होतं, विचारत तुच का रे बा पांडुरंगा , भेटायला किती रे वेळ लावला , बघ इवल्याशा पावलाला फोड आलेत , डोक चरणावर टेकवलं , डोळ्यातले दोन थेंब चरणी ओघळले , माऊलीला सांगत होतो , दमलोय रे , शिणलोय , थकलोय चालून चालुन घे एकदा खुशीत . ती मायही मजवर मातृत्वाचा वर्षावचं करत होती , कासव जशी नयनांनी पिल्लांना पान्हा पाजते तशीच माझ्या विठाईने नयनांनी पान्हा पाजुन मला तृप्त केलं , कोपर्यात क्षणभर विसावत सगळं गाह्याणं रंगाला सांगत होतो , आईला सांगत होतो अगं काढ तो कठेवरचा हात अन् ठेव की माझ्या मस्तकी घे गं कुरवाळुन मला , तुही दमला असशील, थकला असशील युगेनयुगे या विठेवर उभा आहेस , चल पायचं चेपतो , इवल्या इवल्या हातांनी माऊलीचे पाय चेपत होतो ,मुर्ती सजीवचं भासत होती … न रहावत त्या विटेलाचं प्रश्न केला , काय गं काय पुण्य केलं होतं की हा चक्रपाणी तुजवर विराजमान आहे …

” काय पुण्य केलं बये , पंढरीचे इटं (विट)
विठोबाचे पाय सापडलं कुठं “

पवित्रता चराचरात होती , पण वेळ आली ती निरोपाची , डोळे भरलेले , धसाधसा रडलो , बा विठ्ठला येतो रे पुन्हा , नाहीतर तुच चलं की माझ्या घरला , आर्त हाक देत होतो …
माझा चक्रपाणीही जणु हळवा झाला होता , निरोप देताना तोही व्याकुळला की काय असंच जाणवलं , लेकरं परतीला चाललीत मग माय तर रडेलचं की , ती म्हणत होती लेकरांनो मी वाट पाहतोय पुन्हा या , गाभारा सोडेपर्यंन्त पांडुरंग कठीचा हात निठळी ठेवुन लेकांना न्याहाळतो की काय असा भास होत होता ..मन भरून आलं मागे परतुन परतुन बघु लागलो , लेक सासुरी जाताना जशी टाहो फोडते तस मन व्याकुळ झाले होते ,

“कन्या सासुराशी जाये , मागे परतुनी पाहे ,
तैसे झाले माझ्या जीवा “…

 

भाग – दोन

दिंडी, पताका, वैष्णवजण , चंद्रभागेच वाळवंट , गरूडखांब, तुळशीचा सुगंध, बुक्याची आवड , रखुमाई व विठाई हे सगळं सगळं डोळ्यात साठवलं व जड अंतकरणाने पायरी उतरलो .
सगळे वारकरी मायबाप जमले होते , एकमेकांचा निरोप घेत होते, प्रेमभावाने आलिंगन देत होते.. रडत होते , अश्रू पुसत होते … पंधरा दिवस एका तालात एका सुरात गात नाचत निघालो होतो आम्ही त्या सावळ्या विठुमाऊलीला भेटायला . कोण कुठल्या जातीचे, कोण कुठल्या धर्माचे हे विसरून आपण सगळे त्या पंढरीच्या आईची लेकर अशा पवित्र भावनेने सारे देहभान विसरून , फुगड्या खेळत श्रद्धेची वाट चालत होतो.

कोण कुठुन आलंय , कोण कोणत्या जातीधर्माच हे सगळ्चं विसरलो होतो , कोण कुणाला माय म्हणायचं , कोण भाऊ , कोण बहीण, तर कुणी माऊली म्हणुन हाक मारायचं , अगदी आपुलकीने दिलेली ही हाक असायची , वाटेने चालताना स्वता तहानेने , भुकेने व्याकुळ व्हायचेत पण आपल्याबरोबरच्या वारकरीला मात्र तृप्त करायचे हीच शिकवण …एकमेकांचा निरोप घेतला , पाया पडलो . मागे बघत बघत पुन्हा त्याच इवल्याशा पावलांनी परतीला निघालो , पावलं मंदावली होती .खळखळणारी चंद्रभागाही शांत झाली होती . हे माये चंद्रभागे येतो गं म्हणत निरोप दिला , डोळ्यातुन टपटपणारे थेंब चंद्रभागेत विलीन झालेत .. लेकरं परतीला निघालीत , आता गजबजलेलं पंढरपूर सून सून होईल म्हणून तिनेही आकांत मांडला .. तीही म्हणत होती कार्तिकीला लवकर या ही माय भीमा पोरकी होते तुमच्या वाचुन.. जीव कासावीस झाला …
विठाईच्या कळसाकडे पाहत म्हणत होतो” विठोबा मला मुळ धाडा , धावत येईन दुडदुडा , चरणी लोळेण गडबडा , माझा जीव झाला वेडा .. परतीचा प्रवास सुरू झाला ….

तेव्हापासूनच माझा हा वारीचा प्रवास, ही मांदियाळी ,हा सोहळा, वर्षानुवर्षे त्याच भक्तीभावाने चालत आहे …मग तो मुक्ताईनगर असो , त्र्यंबकराज असो , पैठण असो किंवा अलंकापुरी ….ही पाऊल थकलीच नाही . त्यांनाही माउलीची ओढ लागते . अख्ख आयुष्य तव चरणी समर्पित केलंय ..

दहा वर्षाचे असताना वाट चाललेली ही पाऊल आज एकवीस वर्षाची कणखर झाली आहेत पण छातीठोकपणे सांगतो ही पाऊल कधीच वाईट मार्गाला गेली नाहीत आणी जाणारही नाहीत . हीच विठोबाची सगळ्यात मोठी देणं आहे …याच माय माऊलीने माझ्यावरचे सगळे आघात झेललेत , हाक देता ही दीनदयाळा , हा चक्र पाणी ही विठाई आली आहे, ठाई ठाई आहे विठाई ..माझी हरीपाठात नाचणारी ही पाऊल कधीच वाकडे पडले नाही …. पंढरपुरच्या पाऊलखुणा माझ्या पावलांना अवगत झाल्या आहेत …जन्मोजन्मी ही वारी करण्याचं भाग्य ईश्वर देवो हीच मागणी . ही पंढरीची माय हदयात बसली आहे व चंद्रभागा रक्तात भिनते आहे .

“माझ्या आयुष्याचीच वारी झाली आहे..”

✒️लेखक:-कु .सौरभ हिरामण आहेर(तिसगाव, ता- देवळा जि-नाशिक)मो:-९८३४३४७८३३