पेरूत समाजवादी पेड्रो कॅस्टिलो यांचे विजय आणि खडतर आव्हाने

40

(21 जुलै 2021 रोजी पेरु या देशात पेड्रो कॅस्टिलो नवीन अध्यक्ष निवडल्या गेल्या निमित्त लेख)

स्पॅनिश वसाहतवादातून मुक्त झाल्यापासून 200 वर्षांचा इतिहास असलेल्या पेरूत लोकशाही मात्र 20 वर्षांपासून पाळेमुळे धरत आहे. 1985 पासून सत्तेत येणारे सर्व पेरुव्हियन राष्ट्रपती भ्रष्टाचारात अडकले आहेत, गेल्या वर्षी नऊ दिवसांत देशात तीन राष्ट्रपती येऊन गेले. पेरूचे तीन राष्ट्रपती भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत गेले. एकावर न्यायालयीन खटला सुरू आहे. दुसर्‍या अॅलन गार्सिया, यांनी 2019 मध्ये पोलिस अटक करण्याच्या प्रयत्नात असताना आत्महत्या केली. तिसरे माजी अध्यक्ष मार्टिन विझकार्रा यांना भ्रष्टाचार प्रकरणांमुळे कॉंग्रेसने 10 वर्षे सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घातली आहे. लोकांचा प्रस्थापित भांडवली पक्षांवरचा विश्वास कमी होऊन ते नैराश्यात गेले होते. मागच्या महिन्यात पेरूमध्ये, कोरोनाव्हायरसमुळे मृत्यूमुखी पाडलेल्यांच्या आकडा जगातील दरडोई मृत्यूत सर्वाधिक होता. भ्रष्ट राजकीय वर्गाबाबत लोकांमध्ये घृणा वाढत चालली होती पण आर्थिक ध्रुवीकरण ही वाढत चालले होते.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या दुसर्‍या फेरीच्या जवळपास एक नंतर 21 जुलै 2021 रोजी, निवडणूक आयोगाने 51 वर्षीय पेड्रो कॅस्टिलो यांना अध्यक्ष घोषित केले. अगदी कमी फरकाने त्यांनी उजव्या विचारसरणीचे माजी राष्ट्रपती आणि स्वत: पेरुव्हियन शक्तीशाली धनाढ्य वर्गाची प्रतीक त्यांची मुलगी, कीको फुजीमोरी यांचा पराभव केला. राजकीय अस्थिरता आणि आर्थिक संकटाच्या काळात लोकांनी गरिबी आणि असमानता कमी करण्याचा विश्वास दाखवणार्‍या पेड्रो कॅस्टिलो या 51 वर्षीय शेतकरी आणि शिक्षकाला जिंकवलं आहे.

 

पेड्रो कॅस्टिलो कोण आहेत?

पेड्रो कॅस्टिलो पेरूच्या उत्तरी डोंगराळ परदेशात जन्मले व वाढले. त्यांचे पालक निरक्षर शेतकरी होते. लहानपणी 2 तास पायपीट करत शाळेत जावे लागायचे. शेत मजुरीची कामे केली. भाडे भरू न शकल्यावर जमीन मालकाने बालकावलेले पीक पाहून रडले आहे. शिक्षण पूर्ण करण्यासाठी अनेक नोकर्‍या केल्या, तरुण असताना त्याने लिमामधील हॉटेल खोल्या साफ केल्या. उत्तर पेरुमधील एका शहरात विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर, ते परत पाणी किंवा सांडपाण्याची व्यवस्था नसलेल्या आणि 40 टक्के मुलं कुपोषित असलेल्या डोंगराळ परदेशात गेले. शिक्षक झाल्यानंतर त्यांनी त्याच भागात शाळा सुरु केली. उत्तरेकडील कजामार्का येथील दुर्गम गावातल्या सॅन लुइस दे पुना या मूळ गावी त्यांनी गेल्या 25 वर्षांपासून प्राथमिक शाळेतील शिक्षक म्हणून काम केले. शालेय शिक्षकांच्या संघटनेचे कार्यकर्ते बनले आणि 2017च्या पगार वाढीसाठी मागच्या 30 वर्षांत झालेल्या सर्वात मोठ्या देशव्यापी संपात मोठ्याप्रमाणात शिक्षकांना उतरवले. मार्क्सवादी-लेनिनवादी पक्षात काम करू लागले आणि त्यांचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून विश्वास संपादन केले.

निवडणुकीचे मुद्दे:

किको फुजीमोरी यांनी “कम्युनिझम” च्या उदयाबद्दल, भूतकाळातील भूत आणि व्हेनेझुएलाच्या शैलीत देश कोसळण्याची भीती दाखवत “आपल्या भविष्याचा विचार करा, साम्यवादाला नाकारा” असा आक्रमक प्रचार केला. त्यांच्या ‘पॉप्युलर फोर्स’ पक्षाला उच्च भ्रू व्यावसायिक समर्थक गट तसेच माजी सैन्य नेत्यांचा पाठिंबा होता. त्या संपूर्ण निवडणूक मोहिमेत शायनिंग पाथ या अतिडाव्या कम्युनिस्ट बंडखोर गटाशी पेड्रो यांचे संबंध असल्याचा दावा करत होत्या. आणि लॅटिन अमेरिकेत सत्तेवर आलेल्या डाव्या नेत्यांवर टीकेचा भडिमार करत होत्या. किको यांनी त्यांच्या पॉपुलर फोर्स पार्टी द्वारे कम्युनिस्ट अत्याचाराची भीती दाखवणे (रेड-बाईटिंग), लोकांमध्ये निराधार भीती पसरवणे (फियर मोङ्ग्रिंग), विशिष्ट मतदारसंघातील रहिवाशांचा राजकीय पाठिंबा मिळाल्यास त्यांना सरकारी खर्चाचा फायदा देण्याचे वाचा त्याचा फायदा होईल (पोर्क बैरल), आणि सर्व खाजगी माध्यमांमध्ये प्रचंड जाहिरात खर्च या सर्व गोष्टींचा भडिमार केला. “लोकशाहीला होय! कम्युनिझमला नाही!” आणि “आम्ही दुसरे व्हेनेझुएला होऊ इच्छित नाही!” अश्या त्यांच्या घोषणा होत्या. 2021च्या निवडणुकीय प्रचारात किको फुजीमोरी यांनी ही निवडणूक “मार्केट्स आणि मार्क्सवाद” यांच्यातील लढाई म्हणून प्रचारीत केली आणि दुसर्‍या फेरीतील प्रतिस्पर्धी पेड्रो कॅस्टिलो यांना कम्युनिस्ट म्हणून हिणवले. किको फुजीमोरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे खटले चालू आहेत. त्यांचा दावा होता की जर तिने राष्ट्रपतीपद जिंकले तर परंतु 30 हून अधिक सहकारी प्रतिवादींवर खटले सुरूच राहतील पण तिला मात्र पाच वर्षांपर्यन्त खटल्यापासून मुक्तता मिळेल.

निवडणूक थोडक्याने हरलेल्या 46 वर्षीय फुजीमोरी ह्या पेरूचे माजी अध्यक्ष अल्बर्टो फुजीमोरी यांची कन्या आहेत. किको फुजीमोरी जपानी-पेरुव्हियन यांनी गरिबांसाठी दान केलेल्या कपड्यांचा घोटाला, परदेसात अवैधपणे पैसे गुंतवणूक, 2013 मध्ये कॅलाओ बंदरात अमली पदार्थविरोधी पोलिसांना त्यांच्या मालमत्तेच्या कंपनीच्या दुकानात 100 किलो कोकेन सापडणे, कोकेन माफियाशी हात मिळवणी, मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. त्या जेल मध्ये होत्या आणि 5 मे 2020 रोजी जामिनावर बाहेर पडल्या. पेरूच्या न्यायालयांमद्धे किकोवर आरोप सिद्ध झाल्यास अपहरण आणि निवडणूक घोटाळ्यासह अनेक आरोपात त्यांना 30 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी तुरूंगवास होऊ शकते.

गेल्या तीस वर्षांपासून पेरूवर प्रभुत्व असलेल्या फुजीमोरिझम आणि नियोलिबरल मॉडेलचा वरचष्मा राहिला आहे. किको यांचे वडील अल्बर्टो फुजीमोरी यांच्या काळात ‘ग्रुपो कोलिना’ या मृत्यू पथकाद्वारे सामाजिक आणि कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांना गायब करून त्यांची हत्या अडीच लाखांहून अधिक स्थानिक आदिवासी महिलांची सक्तीने नसबंदी, सरकारी मालाकीच्या उद्योगांचे खासगीकरण आणि शेकडो कोट्यवधी डॉलर्सची चोरी यांचा समावेश होता. त्यातील गुन्ह्यांमुळे अल्बर्टोला पंचवीस वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. मागच्या तीस वर्षे मोठ्या उद्योगपती जास्त श्रीमंत होत गेले तर गरीब अधिक गरीब झाले.

पेड्रो यांनी आपल्या डोंगराळ प्रदेशातील लोक परिधान करतात त्या रुंद-ब्रम्ड स्ट्रॉ टोपी घालून शेतकर्‍याप्रमाणे प्रचार केला. नैसर्गिक वायूसारख्या काही संसाधनांचे राष्ट्रीयकरण करून सार्वजनिक कंपन्यांना चालना देण्याचे आणि पेरूच्या अर्थव्यवस्थेचा इंजिन असलेल्या खाण कंपन्यांशी नव्याने कर करारावर करतील असे सभेत ते बोलले. त्यांच्या फ्री पेरु पार्टीने निवडणूक प्रचार मोहिमेदरम्यान व्हेनेझुएलामधील अमेरिकेच्या हस्तक्षेपाला विरोध दर्शविला आणि असे वचन दिले की निकोलस मादुरोच्या सत्ता उलथून टाकण्यासाठी प्रयत्न करणार्‍या उजव्या विचारसरणीच्या सरकारांचा समावेश असलेला ‘लीमा ग्रुप’ला हद्दपार करतील. दुसरीकडे कॅस्टिलोच्या कायदेशीर कार्यसंघाने देखील मानल्या गेलेल्या फसवणूकीबद्दल फुजीमोरीचे बहुतेक दावे रद्दबादल करण्यात आणि त्यांना अधिकृत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दरम्यान, अध्यक्षपदाची औपचारिक मान्यता मिळण्यापूर्वीच त्यांच्या आर्थिक संघाने एकीकडे कामगार संघटना आणि सामाजिक चळवळी आणि दुसर्‍या देशातील आर्थिक आणि व्यवसायातील अभिजात आणि प्रतिनिधी यांच्याशी बोलणी सुरू केली. स्वत: कॅस्टिलो यांनी सक्रियपणे देश दौर्‍यास सुरवात केली, महापौर, राज्यपाल आणि प्रांतिक प्रतिनिधी तसेच अमेरिका, ओएएस आणि युरोपियन युनियनच्या प्रतिनिधींची भेट घेतली.

 

निवडणूक निकालाचे अन्वयार्थ:

पेरूच्या सर्वात श्रीमंत शेजारच्या सॅन इसिद्रो येथील 88% रहिवाशांनी फुझिमोरीला मतदान केले, पेरूच्या सर्वात गरीब अँडियन प्रांतात, हुआन्काव्हेलिका येथे, 85% लोकांनी कॅस्टेलोला पाठिंबा दर्शविला. अलीकडच्या काही दशकात हा श्रीमंत आणि गरिबांमधला हा टोकाचा ध्रुवीकरण बघायला भेटला आहे. पेद्रो कॅस्टेलो यांना एकूण 8,836,280 मते मिळालीत जी फुजीमोरीचे यांना मिळालेल्या 8,792,117 मतांपेक्षा फक्त 44,163 मते जास्त आहे. मतमोजणी इतक्या पारदर्शकतेने करण्यात आली की युनायटेड स्टेट्स, युरोपियन युनियन आणि 14 निवडणूक अभियानाद्वारे मतदान योग्य असल्याचे निश्चित झाले. युएसएला या निवडणुकीला प्रदेशासाठी “लोकशाहीचे मॉडेल” असे संबोधावे लागले. लीमा इथल्या श्रीमंतांच्या वर्चस्वाला नका देत बर्‍याच ग्रामीण भागातून पेड्रो यांना 80 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. फुजीमोरीने जवळजवळ 2 लाख मते बाद ठरवण्यासाठी डॉनल्ड ट्रंपप्रमाणे अनेक आकांडतांडव केले. सरतेशेवटी, निवडणूक अधिका्यांनी किको यांच्या सर्व विनंत्या फेटाळून लावल्या. फुजीमोरीने रडीचा डाव खेळत याला फसवणूक म्हणत निकाल उलटण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू केली आहे.

 

किको यांनी 2011, 2016, आणि 2021च्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविली परंतु तिन्ही वेळा दुसर्‍या फेरीत अल्प फरकाने त्यांचा पराभव झाला. तिन्ही निवडणुकीत त्यांना व्यावसायिक समुदाय, पुराणमतवादी, बहुसंख्य प्रेस, उदारमतवादी व्यावसायिक, छोटे व्यवसाय, चर्च आणि बरेचसे लीमा मध्यमवर्गाकडून समर्थन मिळाले होते. पेरूत व्यावसायिक, सैनिकी किंवा प्रभावशाली आर्थिक वर्गाशी संबंधित असलेली व्यक्तीच नेहमी अध्यक्षपदी राहिलेली आहे. त्या व्यतिरिक्त कोणती इतक्या उच्च पदापर्यंत पोहोचला नाही. जिथे आजवर तिथल्या मूळ आदिवासींना जवळजवळ नेहमीच सर्वात निकृष्ट सार्वजनिक सेवा मिळाली आहे, तिथे पेरूचे अध्यक्ष होणारे ते पहिले आदिवासी समाजातले शेतकरी आहेत. विजयाचा अंतर जरी कमी असला तरी मागच्या 30 वर्षांच्या इतिहासात गरीब अँडियन प्रांतातील “कॅम्पिसिनो” किंवा शेतकरी म्हणून आयुष्य जगलेले पेरूचे पहिले डाव्या विचारसरणीचे अध्यक्ष असतील.

पेड्रो कॅस्टिलो यांनी विजयी भाषणात त्यांनी, “श्रीमंत देशात यापुढे गरीब नाही. ज्यांच्याकडे कार नाही त्यांच्याकडे किमान एक सायकल असावी. कामगार, शेतकरी नेते किंवा शिक्षक यांची थट्टा उडवणे बंद करा. आपण तरुणांना, मुलांना शिकवायला हवे की आपण सर्व जण कायद्यासमोर समान आहोत” अशी घोषणा केली. गरीबी आणि विषमता दूर करण्यासाठी राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेची फेरबदल करण्याचे आणि सध्याच्या राज्यघटनेची बदल करून अर्थव्यवस्थेत राज्याची भूमिका वाढविण्याच्या दृष्टीने बदलण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहेत.

पेरूच्या सर्वसामान्य व गरीब लोकांनी त्यांना दरीद्र्याच्या खाईत लोटणार्‍या नवउदरवादी धोरणांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी त्यांची निवड केली आहे. पेरूच्या सार्वजनिक आरोग्य सेवेच्या कमतरतेमुळे कोरोंना काळात दरडोई मृत्यू दर जगात सर्वाधिक आहे. कॅस्टिलो यांनी खाण क्षेत्रातील महसूल शिक्षण आणि आरोग्यासह सार्वजनिक सेवा सुधारण्यासाठी वापरण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

सोशल मीडियाची कसोटी:

ही निवडणूक सोशल मीडियाच्या ताकदीची कसोटी होती. कीको यांचा जहरी प्रचार आणि ट्रोल सोशल मीडियावर जोरात होता ज्याने मध्यमवर्गावर प्रभाव तयार केला. ‘गावंढळ शेतकरी’ देशाचे नेतृत्व करू शकत नाही असे पोस्ट्स सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात वायरल करण्यात आले. त्या उलट कॅस्टेलो यांचे पहिल्या फेरीचे मतदान सुरू होईपर्यंत ट्विटर किंवा इन्स्टाग्राम खाते देखील नव्हते. त्यांचे सोशल मीडियाकडे दुर्लक्ष होते आणि पारंपरिक पद्धतीने त्यांनी प्रचार राबवला.

किको यांनी निवडणुकीत मतांची धांधली झाल्याचा मिथक कायम ठेवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरूच ठेवला आहे. पेरुमधील माहिती लँडस्केप राष्ट्रपतिपदाच्या कार्यकाळानंतर इतका विषारी झाला आहे की बर्‍याच पेरुव्हियांना यापुढे कोणत्या मीडियावर विश्वास आहे करावं हे समजत नाही आहे. पेरूमधील सोशल मीडिया कंपन्यांनी पसवलेल्या फेक बातम्यांविरोधात अमा ल्युला या फॅक्ट-चेकिंग गटाने खोट्या व्हायरल पोस्ट्सच्या विरुद्ध ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकचा वापर दिवसाच्या बातम्यांभोवती फॅक्ट-चेकिंग मेम्स आणि थेट किंवा रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ चर्चा टाकून चुकीच्या माहितीच्या विरूद्ध प्रतिकांचाचा सर्जनशील पद्धतीने वापर सुरु केला आहे. यांची शक्ति खोट्या माहितीच्या ट्रोल आर्मीपुढे अत्यंत कमी असल्याचे फॅक्टर्स चेकर्सपैकी एक, एल फिल्ट्रोचे संस्थापक पॅट्रिसियो ऑर्तेगा स्वतः स्वीकारतात. फेक पोस्ट्सवर आक्रमक भूमिका घेतल्यास फेसबुक आणि किको मुस्कटदाबी चालू असल्याचा प्रचार सुरू करतील म्हणून पेड्रो यांनी सोशल नेटवर्क्सवर पोस्ट केल्या जाणार्‍या पोस्ट्स फॅक्ट-चेक करणायची सूचना फेसबुक व इतरांना केली आहे.

पेरुचा अस्थिर राजकीय इतिहास

जुआन वेलॅस्को अल्वाराडो:

भ्रष्टाचार आणि हलाखीच्या परिस्थितीत अडकेल्या पेरूच्या ग्रामीण मागासलेल्या भागांमध्ये क्युबन क्रांतिने प्रेरणा घेऊन 1964-65च्या दरम्यान अनेक ठिकाणी सशस्त्र कम्युनिस्ट उठाव होऊ लागले. सैन्यातही क्रांतिकारी विद्रोह झाला आणि एजर्किटो डी लिबेरॅसीन नॅशिओनल (ईएलएन) आणि मोव्हिमिएंटो दे इझक्विएर्डा रेवोल्यूसियानारिया (एमआयआर) या दोन सैन्य क्रांतिकारी गटांचा नयनाट करण्यासाठी मोठ्याप्रमाणात खोलवर सैन्य पाठविण्यात आले. ह्या दोन्ही चळवळी त्यांच्या सुरुवातीच्या काळातच सशस्त्र सैन्याने वेगाने चिरडून टाकला पण यासाठी अनेक लष्करी अधिकारी देशाच्या अत्यंत गरीब भागांकडे गेले आणि देश-बाजूचे वास्तव पाहिल्यानंतर आणि उठावाची कारणे अभ्यासल्या गेल्यानंतर ते स्वतःच सामाजिक असमानता आणि दारिद्र्य यांना राष्ट्रीय पातळीवरील सुरक्षा धोका मानू लागले आणि डाव्या विचारसारणीने प्रभावित झाले.

1968चे पेरुव्हियन अध्यक्ष फर्नांडो बेलेंदेयांचे त्यांच्या स्वत:च्या अ‍ॅक्यॉन पॉपुलर (पॉपुलर एक्शन) पक्षामध्ये आणि विरोधी पक्ष एपीआरए-यूएनओ (युनियन नॅशिओनल ओड्रिस्टा) यांची युती मध्ये खटके उडू लागले होते. उत्तर पेरूच्या तालारा प्रांतात अमिरातच्या राजघराण्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय पेट्रोलियम कंपनीशी झालेल्या करारातले महत्वाचे पानच गहाळ झाल्याने या तेल व्यवहाराशी संबंधित परवान्याबाबत भ्रष्टाचाराच्या चर्चांना उधाण आले होते. अश्या घोटाळ्यांमुळे सगळीकडे राजकीय अस्थिरता व हिंसा माजल्याने सशस्त्र सैन्याने सक्तीने सत्ता काबीज केली, वादाचा केंद्र बनलेली तेल क्षेत्रे सैन्याने ताब्यात घेतली आणि अहिंसक व शांततामय तर्‍हेने अध्यक्ष बेलांडे यांना देशाच्या हद्दपार करण्यात आले. हा अहिंसक सत्तापालट करणारा सैन्य अधिकारी जनरल जुआन वेलॅस्को अल्वाराडो होता जो कम्युनिस्ट उठावाचा बिमोड करण्यासाठी पाठवण्यात आला पण स्वतः त्याने प्रभावित होऊन गेला होता.

 

‘सशस्त्र सैन्याने क्रांतिकारक सरकार’चे अध्यक्ष म्हणून वेलस्को अल्वाराडोने देशाचे कारभार हाती घेतले. आंतरराष्ट्रीय सार्वभौमत्व व स्वातंत्र्य वाढविण्यासाठी मजबूत राष्ट्रीय उद्योग निर्माण करण्याच्या उद्देशाने व्यापकपणे सामाजिक लोकशाही, विकासवादी आणि स्वतंत्र राष्ट्रवादी धोरणांची अंमलबाजवणी वेलास्को सरकारचे वैशिष्ट्य होते. त्यांनी मत्स्यपालन ते खाण ते दूरसंचार ते वीज निर्मितीपर्यंतच्या विविध उपक्रमातील कंपन्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना एकल उद्योग-केंद्रित सरकारी-संस्थांमध्ये एकत्रित केले आणि मोठ्याप्रमाणात उद्योगांचे राष्ट्रीयकरण करून रोजगार निर्मिती केली. विविध क्षेत्रांमद्धे गडगांज नफा आणि मक्तेदारी मिळवलेल्या खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांच्या आर्थिक कारवायांवर सरकारचे नियंत्रण वाढविले. शिक्षण व्यवस्थेत बदल करून त्यात गरीब आणि अति मागास लोकांना प्राधान्य दिले गेले. शेतकर्‍यांसाठी सरकार उभे राहू लागले. स्पॅनिश वसाहत असल्याने पेरूची मातृभाषा स्पॅनिश करण्यात आली होती. परंतु डाव्या सरकारने 1972च्या शैक्षणिक सुधारणेत जवळपास अर्ध्या लोकसंख्येचा समावेश असलेल्या अँडिस आणि मेझॉनमधील आदिवासींसाठी द्विभाषिक शिक्षणाची सोय केली गेली. 1975 मध्ये व्हेलास्को सरकारने क्वेचुआला स्पॅनिशच्या बरोबरीची पेरूची अधिकृत भाषा म्हणून कायदा बनविला. त्यांच्यानंतर मूळ आदिवासी भाषा संवर्धंनाचा कार्यक्रम मागे पडला आणि क्वेशुआ आणि आयमारा लोकसंख्या बाहल भागातच त्यांना अधिकृत असा महत्व मिळाला.

वेलास्कोच्या राजकीय आणि आर्थिक रणनीतीच्या केंद्रात शेती आणि कृषी सुधार कार्यक्रम राबविणे ही होते. जमीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत अतिविशाल जमिनी बळकावून गब्बर बनलेल्या मोठ्या जमिनदारांकडून जमिनी घेऊन शेतीच्या मालकीचे योग्यरित्या वितरण करण्यात आले. सशस्त्र सेना क्रांतिकारक सरकारने जवळपास 1 लाख वर्ग किमी जमिनी 3 लाख भूमिहीन शेतकरी शेतमजुर कुटुंबांना म्हणजे पुनर्वितरण केल्याने त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिति सुधारली. कृषी सुधारानंतर, लोक लिमा आणि इतर किनारपट्टीच्या शहरांमध्ये स्थानांतरित झाल्याने शहरीकरण देशभर सुरू झाले. वेलॅस्कोने राबविलेले भूमी सुधार हे क्युबा नंतर लॅटिन अमेरिकेच्या इतिहासातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी जमीन सुधारणा होती. या कार्यक्रमास विरोध करणार्या मोठ्या जमीनदारांनी आणि भांडवलदारांना माजी अध्यक्ष फर्नांडो बेलेंदेयांची निकडाने गरज भासू लागली. परंतु या कालावधीत कृषी सुधार करण्यासाठी शासनाने कृषी विकास, राज्य अनुदान आणि प्रशासकीय खर्चास प्रोत्साहन देण्यासाठी दिलेले स्वस्त कर्ज यामुळे अंशतः राज्य दिवाळखोरी झाली.

1970च्या दशकातल्या बहुतेक लॅटिन अमेरिकन देशांमध्ये अमेरिकी हितांना फायदा पोचवणार्‍या आणि सीआयएचा भक्कम पाठिंबा लाभलेल्या उजव्या विचारसरणीच्या लष्करी हुकूमशाही होती. मात्र क्युबन क्रांतिशी प्रभावित पेरूची डावी सैन्य हुकुमशाही अमेरिकन कंपन्यांना नैसर्गिक संसाधने व श्रमची लूट करण्यास आडवी आल्याने मोठी डोकेदुखी ठरत होती. जनरल वेलॅस्को आणि त्यांची सैन्य राजवट सत्तेत आल्यापासूनच अमेरिका आणि पेरू यांच्यातील संबंध तणावपूर्ण व वैरपूर्ण होते. त्यांनी क्युबा- फिदेल कॅस्ट्रो आणि समाजवादी सोव्हिएत ब्लॉकशी पेरूचे संबंध घट्ट केले.

पेरुच्या समुद्र सीमेच्या आत घुसून मासेमारी करणार्‍या अमेरिकन मासेमारी बोट्स पेरु सरकारने जप्त केल्या आणि सीमेपासून 200 माइल्सपर्यन्त आपली समुद्री सीमा असल्याचे ठणकावून संगितले. बेकायदेशीरपणे बेसुमार नफेखोरी करणार्‍या अमेरिकन तांबे खाण कंपनी सेरो डी पासको कॉर्पोरेशनचे अधिग्रहण सरकारने केले. 1968मध्ये सत्तेत आल्याच्या अवघ्या पाच दिवसातच जनरल वेलॅस्कोने पेरुच्या अर्थव्यवस्थेचे राष्ट्रीयकरण सुरु केले अमेरिकन इंटरनॅशनल पेट्रोलियम कंपनी (आयपीसी)च्या ताब्यात असलेल्या उत्तरी पेरुव्हियन तेल बंदर आणि पियुरा येथील रिफायनरीच्या अधिग्रहण व राष्ट्रीयकरणाने अमेरिकन कंपन्यांच्या मनमानीला अनपेक्षित धक्का दिला. नंतर हा वाद चर्चेने सोडवण्यात आला तरीही अमेरिकेने या देशाला आपले शत्रू मानायला सुरुवात केली आणि सीआयएने अस्थिरता आणण्यासाठी आणि जनरल वेलॅस्कोला उखाडण्यासाठी योजना आखण्यास सुरवात केली.

अमेरिकेने या देशावर अनेक प्रकारचे प्रतिबंध लावले आणि लोकशाहीच्या नावाने आक्रमक प्रचारतंत्राचा वापर केला. 1974 मध्ये वर्षभर अनेक आजारांनी त्रस्त असलेल्या वेलास्को सरकारच्या विरोधात सीआयए पुरस्कृत सैन्य तुकड्यांनी उठाव केला आणि देशभरात पुन्हा हिंसा आणि अस्थिरता माजली. वेलास्को यांना हिंसा नको होती. व्यथित वेलास्को यांनी फक्त 7 वर्षानी सत्ता सोडली आणि 1977 साली त्यांचा निधन झालं. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वेलस्कोचे मृतदेह आपल्या खांद्यांवर घेत व्यथित हजारो शेतकर्‍यांनी लिमाभोवती सहा तास त्यांची अंत्ययात्रेत मोठ्या अभिमानाने सहभागी झाले.

त्यांच्या जागी फ्रान्सिस्को मोरालेस बर्मेडेज हे नवे सैन्य हुकूमशाह बनले. पण अमेरिकेला देशावर लोकशाही मार्गाने नियंत्रण पाहिजे असल्याने 18 जून 1978 रोजी संविधानसभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या आणि मार्शल लॉं लागू करत 1 मे 1980 रोजी अमेरिका धार्जिणे फर्नांडो बेलांडे टेरी पुन्हा दुसर्‍यांदा अध्यक्ष म्हणून निवडले गेले.

1980मध्ये पेरूच्या लष्करी सरकारने ज्या पद्धतीने निवडणुका फिक्स्ड केल्या त्या पाहून तेव्हा पेरुचा कम्युनिस्ट पार्टी हा भाग घेण्यास नकार असलेल्या काही डाव्या राजकीय गटांपैकी एक होता. त्यांनी त्याऐवजी अयाकुचो प्रांतात गनिमी युद्धाच्या कारवाईस सुरुवात केली. 3 डिसेंबर 1982 रोजी पेरूच्या कम्युनिस्ट पक्षाने अधिकृतपणे “पीपल्स गेरिला आर्मी” म्हणून ओळखली जाणारी एक सशस्त्र शाखा स्थापन केली. याचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य म्हणजे लढाऊ सैनिकांपैकी 50 टक्के आणि कमांडरपदी 40 टक्के महिला होत्या. 1980मध्ये पेरुव्हियन माओवादी अबीमएल गुझमान यांनी आपल्या ‘शायनिंग पाथ’ या गटासमवेत गनिमी युद्धाला सुरुवात केली. 1990 साली टापॅक अमारू क्रांतिकारक चळवळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या अतिडाव्या गटाने यात सक्रियतेने भाग घेण्यास सुरुवात केली. यांचे हल्ल्यांचे लक्ष लोकशाही पद्धतीने काम करणारे कम्युनिस्ट- समाजवादी कार्यकर्ते व नेते ही असायचे ज्यांना हे लोकं ‘सुधारणावादी’ असण्याचा ठपका ठेऊन हल्ले करायचे.

अॅलन गार्सिया 1985-90: अॅलन गार्सिया यांच्या अध्यक्ष कार्यकाळात वार्षिक दरवर्षी 13,000 टक्क्यांहून अधिक अशी जगात विक्रमी दराने महागाई वाढली. प्रशासनाने स्थानिक अर्थव्यवस्था तसेच सर्व सरकारी संस्था उद्ध्वस्त केल्या. भूक, भ्रष्टाचार, अन्याय, सत्तेचा गैरवापर, पक्षपाती वर्चस्व आणि सामाजिक अशांतता गार्सियाच्या दुष्कर्मांमुळे आणि अक्षमतेमुळे संपूर्ण देशभरात नाट्यमय पातळीवर अराजकता पसरली आणि दहशतवादाला चालना मिळाली. आर्थिक गोंधळामुळे सामाजिक तणाव आणखी वाढला आणि शायनिंग पथ म्हणून ओळखल्या जाणार्‍या हिंसक माओवाद्यांच्या बंडखोर चळवळीला मोठा हातभार लागला, ज्याने पेरूमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू केला. दर्शनशास्त्र आणि कायद्याचा विद्यार्थी असलेला मध्ये हुमांगा विद्यापीठाच्या सॅन क्रिस्टाबल येथे तत्त्वज्ञानाचा कम्युनिस्ट प्राध्यापक अबीमेल गुझमन याने चिनी सांस्कृतिक क्रांतीशी प्रेरणा घेऊन शाईनिंग पथ हा मार्क्सवाद आणि माओवादाच्या राजकीय गट स्थापन केला होता. त्यांनी आदिवासींच्या सक्षमीकरणावर जोर देऊन सशस्त्र संघर्षाची एक विचारधारा विकसित केली.

गार्सिया प्रशासनाने वाढत्या दहशतवादाचा लष्करी तोडगा शोधण्यासाठी मानवी अधिकारांची पायमल्ली करत अनेक हत्याकांड घडवून आणले ज्यांची चौकशी आजवर चालू आहे. यामध्ये अकोमार्का हत्याकांडांचा समावेश आहे, ज्यात ऑगस्ट 1985 मध्ये 47 निशस्त्र स्त्री पुरूषांना कॅम्पिनो रहिवाशांना सशस्त्र दलांनी ठार केले. कायारा हत्याकांडात (मे 1988), ज्यात सुमारे तीस लोक ठार आणि डझनभर बेपत्ता झाले. अॅलन गार्सिया यांच्या काळात हजारो लोकं सैन्याकडून बेपत्ता करण्यात आली ज्यांच्याबद्दल आजवर माहिती नाही. याच काळात गार्सिया यांनी ‘बीसीसीसाय’ या आंतर्राष्ट्रीय बँकेत अवैधरीत्या कोट्यावधी रुपयांचे गैरव्यवहार जमवल्याचे उघडकीस आले. 1992मध्ये तत्कालीन-यू.एस. सिनेटचा सदस्य जॉन केरी यांच्या चौकशी अहवालाच्या आधारावर न्यूयॉर्कचे जिल्हा अटर्नी रॉबर्ट मॉर्गेंटहा यांनी गार्सियावर अधिकृतपणे आरोपपत्र ठेवले आणि असा निष्कर्ष काढला की गार्सिया केवळ भ्रष्टाचारासाठी दोषी नाही, तर त्यांचा ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या आंतरराष्ट्रीय रॅकेट नेटवर्कमध्ये थेट सहभाग होता. पण अशयावेळी पेरूवियन कायद्याचा फायदा उचलत गार्सिया पुन्हा पेरूत दाखल झाले. पण तोवर आल्बर्तो फुजिमोरी यांच्या हाती सत्ता आलेली होती. करवाईच्या भीतीने योग्य संधीची वाट बघत चुपचाप बसले आणि 1993 ते 2001 दरम्यान फक्त त्यांच्या पहिल्या राष्ट्रपतीपदावरील काही कामांच्या प्रकाशनाशिवाय पेरूच्या राजकारणात सक्रियपणे भाग घेतला नाही.

 

अल्बर्टो फुजीमोरी (1990- 2000) :

1990च्या दशकात अल्बर्टो फुजीमोरी अध्यक्ष म्हणून निवडले गेले त्यानंतर त्यांनी ग्रूपो कोलिना (पहाडी चमू) नावाची एक अंडरकव्हर मृत्यू पथक तयार करून त्याला बेछूट अधिकार आणि पैसे उपलब्ध करून दिले. 5 एप्रिल 1992 रोजी रविवारी रात्री फुजीमोरी टीव्ही वर अवतरले आणि सरकारच्या न्यायिक शाखेची पुनर्रचना करण्याचे आणि तात्पुरत्या स्वरुपात संसद भंग केल्याचे जाहीर केले. पेरूच्या सैन्याने संसदेचा ताबा घेतला अधिवेशन घेण्याचा प्रयत्न करणार्‍या सिनेटर्स वर अश्रु गोळे भिरकावून संसदेवर ताबा मिळवला.

1990 ते 1994 दरम्यान ग्रूपो कोलिना हजारो अतिउजव्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांचे शिरकाण केले. ग्रूपो कोलिनाचा वापर हजारो विरोधक आणि लोकशाही पद्धतीने काम करणारे कम्युनिस्ट समाजवादी कार्यकर्ते व नेत्यांना धमकावणे, अपहरण, प्राणघातक हल्ले आणि हत्या करण्यात ही सर्रास करण्यात आला. त्यांनी बॅरियस हत्याकांड, अल्टोस हत्याकांड, सांता हत्याकांड आणि ला कॅन्टोटा हत्याकांडात घडविण आणले ज्यात एकाच गावातील एकूण 34 निर्दोष लोकं ठार झाले होते.

जेव्हा लोकशाही घटनात्मक कॉंग्रेसने ला कॅन्टुटा हत्याकांड तपास करायला घेतले तेवहे या ग्रूपो कोलिना सशस्त्र दलांचे सरचिटणीस निकोलस हर्मोजा रिओस याने रस्त्यावर रणगाडे उतरवले आणि संसदेला आम्ही जुमानत नसल्याचे जाहीर केले. परंतु अतिरेक झाल्याने वाढत्या दबावामुळे अल्बर्टो फुजीमोरीला कारवाईला विरोध करता येत नव्हते. फुजीमोरी यांनी एक वादग्रस्त कायद्यावर स्वाक्षरी केली ज्याने सशस्त्र सैन्याने किंवा पोलिसांद्वारे केलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी दोषी, दोषी ठरवले किंवा शिक्षा ठोठावलेल्याना माफी दिली गेली. कोर्टाने हा कायदा असंवैधानिक ठरवलं. तेव्हा फुजीमोरी यांनी माफीच्या कायद्यांवरील न्यायालयीन पुनरावलोकनाचा अधिकार काढून नवीन कायद्यावर स्वाक्षरी केली. हा दुसरा कायदा “बॅरियस अल्टोस लॉ” म्हणून ओळखला जात असे कारण यामुळे बॅरियस अल्टोस हत्याकांड घडवून आणणार्‍या ग्रूपो कोलिनामधील सदस्यांना मुक्त केले जाईल याची खात्री केली गेली होती. शेवटी, मानवी हक्कांच्या आंतर-अमेरिकन कोर्टाने कर्जमाफीचे दोन्ही कायदे रद्दबातल केले. फुजीमोरी सरकार पडल्यापासून, ग्रूपो कोलिना यांच्या गुन्ह्यांसाठी अनेक जणांवर खटला चालला होता, ज्यात स्वत: फुजीमोरी देखील होता, ज्यांना ला कॅन्टोटा हत्याकांड आणि बॅरियस अल्टोस हत्याकांड प्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. आजवर या मृत्यू पथकाचे अनेक मोठे अधिकारी मानवाधिकारांच्या विविध उल्लंघनांसह तसेच सशस्त्र व्यापार, मादक पदार्थांची तस्करी आणि राजकीय भ्रष्टाचाराच्या आरोपासाठी सत्तरपेक्षा जास्त खटल्यांचा सामना करीत जेल मध्ये आहेत. ट्रान्सपेरेंसी इंटरनॅशनलने फ्यूजिमोरी यांनी अपहार केलेल्या पैशांची रक्कम ही 1984 ते 2004 मध्ये सक्रिय सरकारप्रमुखांपैकी सातवा क्रमांकावर असल्याचे मानले आहे.

जपानी मूळचे अल्बर्टो फुजीमोरी 1990च्या दशकात अतिडाव्या व हिंसक ‘शायनिंग पाथ’ या गनिमी चळवळीचा बिमोड केल्याने चर्चेत आले होते पण भ्रष्ट व निर्दयी पद्धतीच्या कामांमुळे 2000 मध्ये त्यांचा पराभव झाला आणि अटक होऊ नये म्हणून ते आपल्या मूळ देशी जपान येथे पसार झाले. . राजकीय वातावरणाचा अंदाज घेऊन ते परतले पण पेरूत विरोधकांना मारण्यासाठी ‘मृत्यू पथके’ संचालित करत असल्याचे पुरावे उघड झाल्याने त्यांना पुन्हा अटक करण्यात आली.

 

अॅलन गार्सिया (2006 -16) : 2001 मध्ये फुजिमोरी यांची वाईट दिवसे सुरू झाली आणि गार्सिया पुन्हा सक्रिय झाले. त्यांनी 2001च्या निवडणुकीनंतर ते एपीआरए पक्षाचे नेते म्हणून विरोधी पक्षनेते बनले. 2006च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळी वेनेझुएलाचे अध्यक्ष ह्युगो चावेझ यांनी गार्सियाचा प्रतिस्पर्धी ओलॅन्टा हुमाला यांना पाठिंबा जाहीर केला आणि गार्सियाचा “दरोडेखोर”, “डाकू” आणि “पेरूचा कार्लोस अँड्रेस पेरेझ” असा उल्लेख केला. त्यावेळी लॅटिन अमेरिका हयुगो शावेजच्या करिष्म्याने प्रभावित होता. कम्युनिस्ट विरोधी अमेरिकेला या निविडणुकीत त्याच गार्सियाच्या बाजूने यंत्रणा उभी करावी लागली ज्याला त्यांचा न्यायालयाने भ्रष्टाचाराचा दोषी धरला होता. 31 मे 2006 रोजी निवडणुकीच्या काही दिवस अगोदर, गार्सियाचे आर्थिक सल्लागार एरिक कोर्नेजो यांनी माध्यमांना सांगितले की, जर गार्सिया दुसर्‍या फेरीत जिंकला तर त्याचे सरकारला अमेरिकेच्या मदतीने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून 442 मिलियन डॉलर्सचे मदत पॅकेज मिळणार. अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज बुश यांचा पाठिंबा आणि प्रभावी प्रचारामुळे गार्सिया निवडणूक जिंकले. 11 जानेवारी 2007 रोजी गार्सिया यांना पहिल्या मोठ्या राजकीय पराभवाला सामोरे जावे लागले, जेव्हा कैद केलेल्या शायनिंग पथ बंडखोरांना शिक्षा म्हणून फाशीची शिक्षा देण्याचा त्यांचा प्रस्ताव संसदेने 49 विरुद्ध 26 या मताने फेटाळला.

सैन्याकडून सरकारविरोधी आंदोलने चिरडण्यात आली. सैन्याने अनेक आंदोलकांची हत्याकरून त्यांचे मृतदेह नदीत फेकले. सरकारकडून अश्या न्यायधीशांची निवडणूक करण्यात आली जे सैन्याच्या कृत्याचा समर्थन करत आणि सरकारविरोधी निदर्शने कारणार्‍याना कडक शिक्षा करत. यात गार्सिया यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. पीडितांना मदत करण्याचा प्रयत्न करणा स्वयंसेवी संस्थांचे काम करणे कठीण बनविण्याचा प्रयत्न ही यांनी केला या संस्थांना आवश्यक संसाधने मिळू नये म्हणून नवीन कायदे बनवण्यात आले आणि लष्करी अधिकार्‍यांना करवाईचे अधिकार देण्यात आले. अध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर ब्राझिलियन बांधकाम कंपनी ओडेब्रेक्ट कडून बेहिशेबी पद्धतीने 1 लाख डॉलर्स घेतल्यामुळे त्यांच्यावर पुन्हा वाद सुरू झाले. 2016-17 मध्ये गार्सियाच्या पाच माजी मंत्र्यांविरूद्ध पेरूच्या न्याय प्रणालीने भ्रष्टाचाराचा आरोप ठेवला. नोव्हेंबर 2018 मध्ये, ओडेब्रेक्ट घोटाळ्याच्या चौकशीमुळे गार्सियाला कोर्टाने पेरू सोडण्यास बंदी घातली होती. ब्राझीलच्या बांधकाम कॉर्पोरेशनकडून भ्रष्टाचाराच्या चौकशीशी संबंधित प्रकरणात दहा दिवसांचे प्राथमिक अटक वॉरंट निघाल्यावर 17 एप्रिल 2019 रोजी, गार्सियाने बेडरूममध्ये स्वत:च्या डोक्यावर गोळी झाडून आत्महत्या केली.

केंझी फुजिमोरी: अल्बर्टो फुजीमोरीची केनजी, कीको, हिरो आणि सॅची ही 4 मुलं आहेत. सर्वचे सर्व पेरूचे मोठे श्रीमंत व्यावसायिक आहेत तर केंजी आणि किको सक्रिय राजकरणात निवडून येतात. या चौघांची नावे चोरमार्गाने कोट्यवधींचा काळा पैसा अमेरिकन मीडिया व्यवसायात गुंतवण्याच्या घोटाळ्यात समोर आली होती. त्यांच्यावर शवपेटींच्या घोटाळ्याचे ही आरोप आहेत. अल्बर्टो फुजीमोरीचे भाऊ देखील राजकरणात खासदार आणि मोठे व्यावसायिक आहेत. केंझी फुजिमारो 2011 आणि 2016 मध्ये खासदार म्हणून निवडून आले. 21 मार्च 2018 रोजी, अध्यक्ष पेद्रो पाब्लो कुझेंस्कीला दुसर्‍या वेळी महाभियोग प्रक्रियेला सामोरे जाण्याच्या दोन दिवस आधी, एका अधिकार्‍याकडून महाभियोगाविरूद्ध मत विकत घेण्याचा प्रयत्न करीत त्यांचे वकील आणि केनजी फुजीमोरी यांच्यासह कुझीन्स्की सहयोगींचा एक व्हिडिओ वायरल झाला. प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर अध्यक्ष कुझीन्स्की यांना अधिकृतपणे मंत्रीपरिषदेकडे आपला राजीनामा द्यावा लागला. जून 2018मध्ये, घोटाळा झाल्यानंतर कॉंग्रेसने केंझी आणि त्यांच्या पक्षाच्या इतर दोन कॉंग्रेससमवेत प्रभाव पाडण्याच्या आणि लाचखोरीच्या गुन्ह्यांसाठी निलंबित केले गेले. जानेवारी 2020मध्ये माजी अध्यक्ष पेद्रो पाब्लो कुझेंस्की यांना महाभियोग होण्यापासून रोखण्याच्या कटात मते विकत घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सरकारी वकील माजी खासदार केंजी फुजीमोरी यांना 12 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. याच प्रकरणात पक्षातला असंतोष शमवण्यासाठी पक्ष विरोधी भूमिका घेत मतदनाला गैरहजर राहिल्यामुळे किको फुजिमोरी यांना शिस्तभांगाची कारवाईचा देखावा म्हणून त्यांना पक्षाबाहेर काढण्यात आले.

किको फुजिमोरी: कीको फुजीमोरी ह्या माजी अध्यक्ष अल्बर्टो फुजीमोरी यांची थोरली कन्या आहे. त्यांची मुलगी हवा पाहून किको फुजिमोरी हवा पाहून कधी आपल्या वडिलांची स्तुति करते तर कधी निंदा.

अल्बर्तोच्या अटकेमुळे ते पक्षाचे अध्यक्षपदी असल्यास नुकसान होईल म्हणून कीको फुजीमोरी यांना पक्षाचा नेता आणि अध्यक्षीय उमेदवार निवडलं गेलं. कीको फुजीमोरी ह्या पेरूचे माजी अध्यक्ष अल्बर्टो फुजीमोरी आणि सुझाना हिगुची यांची मोठी कन्या आहेत. त्यांच्या 1994 ते 2000 ह्या पेरुच्या प्रथम महिला असल्याचा कार्यकाळातही त्यांच्यावर अनेक आरोप लागले. त्यांनी जपानी-पेरुव्हियन यांनी गरिबांसाठी दान केलेल्या कपड्यांना खाजगी फायद्यासाही वापरले केले. हा वाद सर्वोच्च न्यायालयासमोरदेखील गेला. तिने सरकारी पॅलेसच्या खोल्या गुलाबी रंगाने रंगवल्याचा आदेश दिला आणि तिच्या शक्तिमान वडिलांनी छळ केलेल्या आईची साथ देण्यात व तिचा बचाव करण्यात स्पष्ट नकार दिला. वडील तुरुंगात गेल्यावर त्याच आईशी समेट घडवून किको त्यांना सोबत राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक मोहिमांमध्ये सोबत ठेवत. पेरूच्या कॉंग्रेसने अधिकृतपणे तिचे वडील अल्बर्टोचे पेरुचे अध्यक्षपद सोडायला भाग पडल्यावर ही त्या 20 वर्ष उपभोगलेलं सरकारी महाल काही सोडत नव्हत्या. तेव्हा जबरदस्तीने त्यांना 21 नोव्हेंबर 2000 रोजी पेरुचा सरकारी महाल सोडण्यास भाग पाडले गेले. त्याचप्रमाणे मार्च 2013 मध्ये कॅलाओ बंदरात अमली पदार्थविरोधी पोलिसांना त्यांच्या मालमत्तेच्या कंपनीच्या दुकानात 100 किलो कोकेन सापडल्यानंतर फुजिमोरी कुटुंब घोटाळ्यात अडकला होता.

कीको फुजीमोरी यांनी बदनाम झालेल्या पक्षा नाव वापरण्या ऐवजी त्याच लोकांना घेऊन उजवा विचारांच्या पॉपुलर फोर्स (स्पॅनिश: फुएर्झा पॉपुलर, एफपी),या पक्षाची स्थापना करत त्याची विचारधारा त्यांनी आपल्या वडिलांच्या नावावर ‘फुजीमोरिस्ट’ अशी ठेवली. तिच्या पार्टीचा भगवा रंगाचा लोगो तसाच ठेवत त्यात मोठा पांढरा “के” (किकोसाठी) ठेवला गेला. एका प्रकरणात, पेरूच्या सर्वात मोठ्या बँकेचे माजी प्रमुख, बँको डी क्रॅडिटो म्हणाले की, 2011च्या निवडणुकीसाठी तिला 6.6 दशलक्ष रुपयांची फांडिंग केली होती. सप्टेंबर 2018 साली एल कमरसिओ डी लीमा या वृत्तपत्राने पेरूमधील ओडेब्रेक्टचे माजी प्रमुख जॉर्ज बराटा आणि लॅटिन अमेरिका आणि अंगोलाच्या बांधकाम कंपनीचे माजी व्यावसायिक नेते लुईझ अँटोनियो मामेरी यांच्यात एन्क्रिप्टेड ईमेलची नोंद केली, ज्यानुसार त्यांनी किको फुजिमोरी यांना 2011च्या निवडणुकीत बेहिशोबी पद्धतीने 5 लाख अमेरिकन डॉलर्सची मदत केली होती. 10 ऑक्टोबर, 2018 रोजी न्यायाधीश रिचर्ड कॉन्सेपसीन कारहुआन्चो यांनी या मनी लाँड्रिंग प्रकरणात इतर 19 जणांसह केको फुजीमोरीच्या दहा दिवसांच्या प्राथमिक अटकेचे आदेश दिले.

2019च्या सप्टेंबरमध्ये ला रिपब्लिका या वृत्तपत्राने फुजीमोरी आपल्या पक्षाच्या नेत्यांसह ‘टायटॅनिक ग्रुप’ नावाच्या टेलिग्राम समूहाच्या चॅटमध्ये रूथ हे छद्मनाम वापरत पार्टीचे महत्त्वपूर्ण निर्णय घेत असल्याचे दाखवून दिले. पुढे जोसे कॅमॅयो या व्यावसायिकाने ऑपरेशन कार वॉश स्पेशल टीमसमोर घोषित केले की भ्रष्टाचाराचा आरोप असलेला सेयोरा के, खरं तर कीको फुजीमोरी असल्याचे जाहीर केल्याने त्यांच्या अडचणी वाढून गेल्या. ओडेब्रेक्ट कंपनीकडून मनी लौंड्रिंगच्या आरोपाची चौकशी प्रभावित करणे आणि अडथळे आणले जात असल्याचे दिसून आल्यावर 2 जानेवारी रोजी न्यायाधीश व्हिक्टर झुनिगा उरडे यांनी किकोवर 15 महिन्यांसाठी प्रतिबंधात्मक कारावास लावला. पुढे 30 एप्रिल 2020 रोजी, पेरूच्या अपील कोर्टाने व्यक्तीगत स्वातंत्र्याच्या घटनात्मक तरतुदीच्या आधारे तिचा 15 महिन्यांच्या अटकेचा आदेश रद्द केला आणि तिला तुरुंगातून सशर्त सुट दिली. अखेर 5 मे 2020 रोजी तिला जामिनावर सोडण्यात आले. पेरूच्या न्यायालयांमद्धे किकोवर आरोप सिद्ध झाल्यास अपहरण आणि निवडणूक घोटाळ्यासह अनेक आरोपात त्यांना 30 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी तुरूंगवास होऊ शकते.

2011, 2016, आणि 2021च्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविली परंतु तिन्ही वेळा दुसर्‍या फेरीत अल्प फरकाने त्यांचा पराभव झाला. तिन्ही निवडणुकीत त्यांना व्यावसायिक समुदाय, पुराणमतवादी, बहुसंख्य प्रेस, उदारमतवादी व्यावसायिक, छोटे व्यवसाय, चर्च आणि बरेचसे लीमा मध्यमवर्गाकडून समर्थन मिळाले होते. त्या आपला देशातल्या उजव्या पक्षांप्रमाणेच जेल आरोपींना कमीत कमी सुविधा देणं, बाल लैंगिक छळ, डाका आणि दहशतवादी कृत्य करणार्‍या आरोपींना सरळ मृत्युदंड फर्मावण्याचे कायदे करण्याची मागणी करतात.त्यांची कार्यशैली अक्राळविक्राळ प्रकारची आहे. सप्टेंबर 2007 मध्ये, तिने तिच्या वडिलांच्या समर्थनार्थ निदर्शने आयोजित केली, वडिलांना इतरांच्या भ्रष्टाचार, खून, मानवाधिकार उल्लंघन आणि इतर गुन्ह्यात गोवण्यात आल्याचे सांगून त्यांचा राजकीय आणि न्यायालयीन छळ चालू असल्याचे तिने जाहीर केले आणि पेरूच्या न्यायव्यवस्थेवरुण विश्वास उडून गेल्याचे जाहीर केले. त्यांनी असे ही जाहीर केले की जर त्या अध्यक्ष म्हणून निवडली गेली तर राष्ट्रपति पदाचे अधिकार वापरुन तिच्या वडिलांना माफी देण्यात संकोच करणात नाहीत. एप्रिल 2019मध्ये, अल्बर्टोला दुसर्‍या वेळी दोषी ठरविण्यात आले होते, यावेळी मानवतेविरूद्धच्या नरसंहारच्या गुन्ह्यांसाठी 25 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात येण्याच्या काही दिवसांपूर्वी 10 हजार लोकांची निदर्शने आयोजित करून न्यायालयालाच आव्हान केले. त्यावेळी घेतल्या गेलेल्या मतचाचणी मध्ये 70 टक्के लोकांना फुजीमारो दोषी तर 27% लोकांना ते निर्दोष असल्याचे वाटत होते.

खासदार म्हणून त्यांची कामगिरी वादग्रस्त राहिली आहे. ला रेपब्लिका प्रकाशनानुसार, फुजीमोरी संसदेच्या 500 सत्रांना गैरहजर राहिल्या आहेत. त्या 2006 ते 2010 दरम्यान अमेरिका आणि चिली येथे 100 दिवस पर्यटन करत एकूण दरम्यान एकूण 223 दिवस देशाबाहेर होत्या. त्या सदस्य असलेल्या आर्थिक आयोगाच्या 42 सत्रांपैकी त्या केवळ 7 मध्ये हजार राहिल्या. किको निवडून आल्या तर देश अंमली पदार्थाचा अड्डा बनेल ही भीती देखील व्यक्त होते.

2006 मध्ये पहील्या अध्यक्ष पदाच्या निवडणूक मोहिमे दरम्यान ड्रग्सच्या तस्करीत सामील असलेल्या दोन दोषी महिलांनी किको यांना 10,000 डॉलर्स दान दिल्याचे सांगितल्यावर त्यांना त्या लोकांकडून दान मिळाल्याची कबुली द्यावी लागली व त्या नवीन घोटाळ्यामध्ये अडकल्या. त्या काही गुन्ह्यांना फाशीची शिक्षा लागू करणे, रोजगार निर्मिती करणे, दारिद्र्याशी लढा देणे, मुक्त व्यापार, भ्रष्टाचारशी लढा, शैक्षणिक सुधारणा यांना मुद्दा करत.

पेड्रो यांच्या पुढील खडतर आव्हाने:

तिथल्या संसदेत ज्याला कॉंग्रेस म्हटले जाते तिथे आवश्यक व्यापक पाठिंबा नसल्याने ही सरकार भयंकर अस्थिर आहे. 1970साली चिलीमध्ये सत्तेवर आलेल्या डावे अध्यक्ष साल्वाडोर अलेन्डे आणि 1962मध्ये ब्राझीलचे अध्यक्ष बनलेल्या डाव्या पक्षाचे जोओ गौलर्ट यांच्या सारखीच त्यांची परिस्थिति आहे. जवळपास संपूर्ण लीमा त्यांच्या विरुद्ध आहे. म्हणूनच पेड्रो सावध पावलं उचलत आहेत. बहुराष्ट्रीय खाणी आणि नैसर्गिक वायु कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याबाबतचे आपल्या प्रस्तावाबाबत ते नरमले आणि महसूल वाढवण्यासाठी तांब्याच्या उच्च किंमतीमुळे नफ्यावर कर वाढविण्याच्या विचारात आहेत.

80 सेवानिवृत्त लष्करी अधिका्यांनी पेरूच्या सशस्त्र दलांना विनंती केली की त्यांनी पेड्रो कॅस्टेलो यांना विजेते म्हणून घोषित केल्यास अध्यक्ष म्हणून न स्वीकारण्याची विनंती केली आहे. त्यांनी लष्करी अधिकार्‍यांना कठोर कारवायांसाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या आहेत. सैन्याचा हस्तक्षेप सरकार पाडणायसाठी कधीही केला जाऊ शकतो.

कधीच पदभार न सांभाळलेल्या कधीच पदभार सांभाळलेल्या कॅस्टिलोकडे तसा राजकीय अनुभव आणि लोकप्रियता नाही. ती त्यांना त्यांच्या कामातून कमवावी लागेल. जशी दक्षिण अमेरिका खंडात सत्तेवर येणार्‍या इतर डाव्या विचारसरणीच्या नेत्यांकडे होती. डावे समाजवादी विचारांचे अध्यक्ष बनलेल्यांपैकी 1998 मध्ये व्हेनेझुएलामध्ये ह्युगो चावेझ, 2002 मध्ये ब्राझीलमध्ये लुईझ इनसिओ लुला दा सिल्वा, आणि त्याच वर्षी इक्वेडोरमध्ये राफेल कोरेया आणि 2005 मध्ये बोलिव्हियामध्ये, इव्हो मोरालेस यांना मिळालेल्या लोकप्रिय बहुमताप्रमाणे त्यांच्याकडे व्यापक बहुमत नाही आणि ते राजकीय अर्थाने अतिशय लोकप्रिय देखील नाहीत.

पेरूची राजधानी लिमामध्ये एका समाजवादी विचाराच्या पण कमी परिचित असलेला एका शिक्षक निवडणूक जिंकला आहे. या विजयानंतर पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांमध्ये राजधानी लीमा आणि देशभरातल्या छोट्या परंतु देशाच्या आर्थिक नाड्या हातात असेलया धनाढ्य शहरी वर्गातल्या लोकांच्या भीतीदायक प्रतिक्रिया वाचून सध्या या उच्चभ्रू लोकांमध्ये एकप्रकारचा मास हिस्टीरिया पसरल्यासारखा जाणवत आहे. कोरोना महामारीने हैराण करून सोडलेल्या पेरूत पेड्रो कॅस्टिलो आणि किको फुजीमोरी यांच्यातील ही निवडणूक ही वैचारिक लढ्यात बाजू निवडण्याची निवडणूक होती. पेरूच्या निवडणुकीत सरकारविरोधी असंतोषाची झळ आता अनेक लॅटिन अमेरिकन देशांमध्ये पोहोचली आहे. विशेषतः कोलंबिया अनेक आठवड्यांपासून झालेल्या हिंसक निषेधांनी हादरले आहे. चिलीमध्ये दीर्घ-मुक्त बाजारपेठेचे मॉडेलचा विरोध चालू आहे. आहे, सॅंटियागोच्या महापौरपदी एका साम्यवादी नेत्याची लोकांनी निवड केली. पेरूची निवडणूक नवउदरवादी आणि क्रोनी भांडवलशाही विरुद्ध व्यक्त झालेल्या जनमतचा आणि समाजवादी आंदोलंनांसाठी आशेचा विजय म्हणून पहिला गेला पाहिजे.

✒️लेखक:-एड. संजय पांडे(मो:-9221633267)

adv.sanjaypande@gmail.com