रुई,पाचगाव, बेटाळा फाटा येथे अवैद्य दारुची खुलेआम विक्री

34

🔹पोलिस प्रशासनाने कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.28जुलै):- चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठली असली तरी अवैद्य दारूविक्री मध्ये गुंतलेले काही अवैद्य दारुव्यावसायिक अजुनही आपला धंदा सोडायला तयार नाही.
ब्रम्हपुरी तालुक्यातील रूई,पाचगाव येथुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत व बेटाळा फाटा येथे अवैद्य दारुविक्रेते मोठ्या थाटात खुलेआम दारूविक्री करतांना दिसत आहेत.
या दारुविक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात 1 एप्रिल 2015 ला दारुबंदी झाली होती. त्यानंतर जिल्ह्यात अवैद्य दारुविक्री व वाहतूक करणारे अनेक माफीया उदयास आले. अनेकांनी या व्यवसायातुन करोडो रुपयांची माया गोळा केली. आता या वर्षी दारुबंदी उठली मात्र अवैद्य दारुविक्री करणारे व्यावसायिक ग्रामीण भागात ज्या ठिकाणी परवाना धारक दुकाने नाहीत त्या ठिकाणी आपले जाळे पसरवत आहेत.

परवाना असलेल्या दारू दुकानांमध्ये वयस्कर व ओळखीतील व्यक्ती असतात असा समज करून अल्पवयीन, शाळकरी व तरुण मुले त्या दुकानांमध्ये जाण्यासाठी घाबरतात. मात्र गल्लीबोळात, घरपोच सहजपणे मिळणाऱ्या अवैद्य दारुच्या आहारी अल्पवयीन, शाळकरी मुले गेल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे ब्रम्हपुरी-आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील रुई व पाचगाव गावालगत खुलेआम दारूविक्री करणाऱ्या या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.निलज रूई परीसरात बसस्थानक, दैनंदिन भाजीपाला मार्केट, मच्छी मार्केट, शाळा, महाविद्यालय, विविध प्रतिष्ठाणे, दवाखाने, मेडिकल इत्यादी असल्याने सदर परीसरात नागरिकांची मोठी वर्दळ असते. या ठिकाणी दारु पिणाऱ्यांचा इथून आवागमण करणाऱ्या महिलांना त्रास सहन करावा लागतो.त्यामुळे येथील दारुविक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.