महाराष्ट्रात १५ ऑगस्ट रोजी २८,८१३ गावांत वृक्षारोपण – जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे

28

🔸”झाडांचे शतक,शतकांसाठी झाड”

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.30जुलै):-सह्याद्री देवराई व सरपंच परिषद मुंबई यांच्या एकत्रित प्रयत्नांतून ‘झाडांचे शतक,शतकांसाठी झाड’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.ज्‍येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून १५ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे.सयाजी शिंदे यांनी स्वतःला वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन यात झोकून दिले आहे.त्यासाठी तन,मन,धनाने सहभागी झाले आहेत.सह्याद्री देवराई उपक्रम महाराष्ट्रातील काही गावांमध्ये यशस्वी केल्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातच वृक्षारोपणाची चळवळ सुरू करण्याचा निश्चय केला आहे.यात त्यांना सरपंच परिषदेची साथ मिळत आहे.

१५ ऑगस्ट हा दिवस एक उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे.या दिवशी महाराष्ट्रातील २८ हजार ८१३ गावांमधील वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या आजी-आजोबांना फेटे बांधून त्यांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे.या आजी-आजोबांच्या हस्ते प्रत्येकी कमीत कमी एक अशी १०० व त्यापेक्षा जास्त रोपे लावायची आहेत.त्या रोपांचे संगोपन नातवांनी करायचे,असा उपक्रम सलग २५ वर्षे राबवायचा अशी ही संकल्पना आहे.याबाबत सयाजी शिंदे म्हणाले,एखाद्या गावात जर ५०० चिंचा लावल्या तर दहा वर्षांनंतर ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.याच पध्दतीने आवळा,लिंबू,फणस,भोकर,वाळा गवत हे सर्व आपल्याला कमी-अधिक प्रमाणात उत्पन्न देऊ शकतात.

दहा ते २० वर्षे आपण झाडं जपली तर ती आयुष्यभर आपल्याला जपतात.या उलट आपण झाडांना महत्त्‍व न देता त्यांची कत्तल करत बसलो.त्यामुळे दुर्दैवी पण आपले डोळे उघडणाऱ्या घटना आजूबाजूला घडताना आपण पाहतोय.वृक्षारोपण केले तर भूस्खलनारख्या दुर्दैवी घटना आपण टाळू शकतो.कोणालाही दोष देत न बसता एकत्र येऊन काम केले तर आपण मोठा बदल घडवू शकतो.यासाठी प्रत्येक गावातील महिला,तरुण मंडळे,भजनी मंडळे,पदाधिकारी,ग्रामस्थांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले.

“झाडांचे शतक,शतकांसाठी झाड” या उपक्रमांतर्गत सरपंच,ग्रामसेवक हे ग्रामस्थांच्या सहकार्याने काय जादू करू शकतात,हे आपण पाहणार आहोत.१५ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात या उपक्रमाची सुरुवात करणार आहे.मी स्वतः उदगीर तालुक्यात उपस्थित राहणार आहे.या उपक्रमात महाराष्ट्रातील सर्व गावांनी राजकारण बाजूला ठेऊन सहभागी व्हावे,असे माझे सर्वांना आवाहन आहे.असेही शेवटी सयाजी शिंदे म्हणाले.
———————————————-
प्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे हे ग्रामविकासाचे स्वप्न घेऊन पुढे चालले असताना सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रामस्थ म्हणून त्यांच्या पाठीमागे ताकदीने उभे राहणे,ही आमची जबाबदारी आहे.यावर्षी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन पुढील वर्षी लाखो झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात येईल,याची आम्हांला खात्री आहे.
दत्ता काकडे,प्रदेशाध्यक्ष,सरपंच परिषद,मुंबई