पर्यावरण जनजागृतीसाठी चक्क नदीपात्रातून ‘माणगंगा मॅरेथॉन’

23

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.30जुलै):- ते पळशी अशी आज सकाळी स्पर्धकांच्या अलोट उत्साहात व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत माणगंगा नदीपात्रातून मॅरेथॉन झाली. आरोग्य व पर्यावरण संवर्धनासाठी या मॅरेथॉन व जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून पिंकाथॉन दहिवडी माणदेशी मॅरेथॉन वडूज माण मेडिकल असोसिएशन आणि प्रांताधिकारी कार्यालय यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी प्रांताधिकारी सूर्यवंशी, तहसीलदार बी. एस. माने, डॉ. संदीप पोळ यांच्यासह सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक व महसूल क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पर्यावरण संरक्षण, माझे मूल माझी जबाबदारी, आरोग्य संवर्धन, वृक्षारोपण व माणगंगा नदीकाठी बांबू लागवड करणे हे या स्पर्धेचे उद्देश होते. स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर सध्या कोरड्या असलेल्या नदीपात्रातील वाळूतून स्पर्धक मार्गस्थ झाले. यात स्वतः आमदार गोरे, प्रांताधिकारी सूर्यवंशी, तहसीलदार मानेही सहभागी झाल्यामुळे स्पर्धकांचा उत्साह वाढला होता. खड्डे, खाचखळगे, काटेरी वनस्पती, पाणी, सिमेंटचे बंधारे अशा अनेक अडथळ्यांवर मात करत स्पर्धकांनी स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेत म्हसवडच्या सूरज लोखंडे याने प्रथम क्रमांक मिळवला.

संतोष माने याने द्वितीय, विशाल वीरकर याने तृतीय, आकाश लोखंडे याने चौथा, तर सुनील गायकवाड याने पाचवा क्रमांक मिळवला. स्पर्धेदरम्यान वाकी स्मशानभूमीत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आबासाहेब पोळ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने स्पर्धकांना पाणी, चहा व बिस्कीटची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, आमदारांसह मान्यवरांनी आज प्रत्यक्ष पळशी, वाकी, वरकुटे म्हसवड येथील वाळूची लूट पाहून संताप व्यक्त केला.