महानायक अण्णाभाऊ साठे

22

महाराष्ट्राला प्रबोधनाची मोठी परंपरा आहे. याच प्रबोधनाच्या परिवर्तनवादी चळवळीत काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ यांचे काम फक्त प्रबोधन पर्यंतच मर्यादित न राहता अण्णाभाऊ हे एक कुशल संघटक ही होते.

आज 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज देशभर साजरी होत आहे याच पार्श्वभूमीवर हा लेख लिहिण्याचा प्रयत्न

अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव तालुका-वाळवा जिल्हा-सांगली या ठिकाणी झाला.

महाराष्ट्राला प्रबोधनाची चळवळ आहे, तसेच महाराष्ट्र आणि देशात जातीव्यवस्था ही तितकीच मजबूत होती.जाती व्यवस्थेमध्ये अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या मांग जातीत या महानायकाचा जन्म झाला.त्या काळात महाराष्ट्रामध्ये जातीच्या बाबतीमध्ये परिस्थिती काय असू शकते याचा अंदाज आपणास आला असावा.तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णाभाऊ हे अतिशय गरीब कुटुंबातले होते.त्यांच्या वडिलांची इच्छा होती की अण्णाभाऊंनी शाळा शिकावी आणि वडिलांच्या आग्रहाखातर अण्णाभाऊ यांनी शाळेत प्रवेश घेतला. शाळेत गेल्यावर प्रत्येक जातीच्या विद्यार्थ्यांची वेगळी लाईन तिथे होती, त्याच पद्धतीने मांग जातीच्या लाईन मध्ये अण्णाभाऊंना शिकण्यासाठी बसवले हे मात्र अण्णाभाऊला रुचले नाही. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून अण्णाभाऊ मात्र पुन्हा शाळेमध्ये कधी गेलेच नाहीत . अण्णा भाऊंचा आणि शाळेचा तसा दीड दिवसाचा प्रसंग आला. अण्णाभाऊ चे कुटुंब फार हलाखीच्या परिस्थितीमध्ये होते अण्णाभाऊंचा वडिलांना फक्त वीस गुंठे जमीन होती.

त्यात त्यांच्या कुटुंबाला पुरेल इतके धान्य सुद्धा निघत नव्हते अवघ्या दोन महिने पुरेल एवढे धान्य त्या जमिनीतून निघायचे. शेवटी अण्णाभाऊंच्या वडिलांनी ठरवले की आपण मुंबईला जायचे, आणि वाटेगाव ते मुंबई हा प्रवास अण्णा भाऊ व त्यांच्या कुटुंबाने चालत पूर्ण केला.चालत प्रवास एकूण सहा महिन्यांमध्ये पूर्ण झाला या सहा महिन्यांमध्ये अण्णाभाऊ त्याच्या वडिलांनी व आईने वाटत जे मिळेल ते काम केले त्यातूनच सोबतच्या मुलांना वडिलांनी खाऊ पिऊ घातले अशाप्रकारची उपजीविका भागवत सहा महिने प्रवास करत अण्णाभाऊ व त्यांचे कुटुंब मुंबईमधील भयंदर या ठिकाणी पोहोचले भायंदर मध्ये कामगारांची वस्ती होती या कामगारांच्या वस्तीमध्ये अण्णाभाऊ राहू लागले.या कामगारांच्या वस्तीमध्ये अण्णाभाऊ राहत असल्यामुळे त्यांना कामगारांचा संप कामगारांचे आंदोलने सभा याचा जवळून अनुभव घेता आला आणि यातूनच अण्णाभाऊंना कामगारांच्या चळवळीचे प्रचंड आकर्षण वाटू लागले. कारण स्वतः अण्णाभाऊ देखील कामगार होते. त्यामुळे कामगारांच्या प्रश्नांची जाण अण्णाभाऊंना होती, पोटासाठी वणवण फिरून पडेल ते काम करूनही अस्थिरलेल्या व उपासमारीच्या फटाक्यांचे असह्य अण्णाभाऊंचा प्रवास सुरू होता.

दारिद्र्याचे आर्थिक विषमतेचे अनेक जीवघेणे चटके पचवत अण्णा भाऊंनी कम्युनिस्ट विचार समजून घेतला. वर्ग जागृत झाले भारतीय समाजातील आर्थिक आणि सामाजिक विषमता हा त्यांच्या चिंतनाचा विषय ठरला.
यातूनच अण्णाभाऊ मार्क्स आणि आंबेडकर वाद विचाराकडे वळले.
यातूनच अण्णाभाऊंनी प्रचंड दहशत साहित्य लिहिले.

*लिखित साहित्य -*

मार्क्स आणि आंबेडकरवादी विचाराची दिशा अण्णाभाऊंना मिळाली होती. याच दिशेतून अण्णाभाऊ नी 1940 पासून लेखनाला सुरुवात केली.अण्णाभाऊंना कामगारांच्या प्रश्नांची जाण होती.कामगारांचे प्रश्न ही माहित होते. कामगारांचे होणारे शोषण, याबाबतची मांडणीही त्यांच्याकडे होती .यालाच पाया बनवून त्यांनी मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती केली.

*कथालेखन,कादंबरीलेखन,लोकनाट्य,पोवाडे-लावण्या, नाट्यलेखन व प्रवासवर्णन याविषयी अण्णाभाऊंनी प्रचंड असे साहित्य निर्माण केले व लिहिले.*
नाटकांमधून सरंजामी व्यवस्थेच्या विरोधातील भूमिका त्यांनी स्वतःच्या नाटकांमधील लिहिण्याचे काम केले.नाटक मनोरंजनासाठी की प्रबोधनासाठी, नाटक आनंदासाठी की शोषणाविरुद्ध लढण्यासाठी, नाटक श्रद्धायुक्त जाणिवा जपण्यासाठी की मूल्य व्यवस्थेची पेरणी करण्यासाठी.. अशा विवेकनिष्ठ जाणिवेतून अण्णाभाऊंनी लेखन केले.
शाहीर हा जनतेच्या जनतेतील आणि जनतेसाठी चा प्रबोधन करत असतो.
अण्णाभाऊ यांनी रशिया मध्ये जाऊन सुद्धा पोवाडा गाण्याचा काम त्या काळामध्ये केले.
*”पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ती श्रमकरी कष्टकरी शेतकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे.”*

चा विज्ञानवादी विचार अण्णाभाऊंनी त्या काळात मांडला.

दिड दिवसाची शाळा अण्णा भाऊंच्या वाटेला आली त्या अण्णाभाऊंनी मराठी साहित्य क्षेत्रामध्ये मराठी भाषेला उंचीवर नेण्याचे काम त्या काळामध्ये त्यांनी केले.
म्हणून 1 ऑगस्ट हाच मराठी भाषा दिवस असला पाहिजे ही सुद्धा मागणी करणे गरजेचे आहे.
अण्णाभाऊंनी लिहिलेली फकिरा ही कादंबरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली.
अण्णाभाऊंनी साहित्य पोवाडे लावण्या लिहिल्या व हे सर्व जणमाणसात मांडण्यासाठी त्यांनी लाल बावटा पथकाची स्थापना केली.

*विदेशाचा प्रवास -*

ज्या अण्णाभाऊंना वाटेगाव ते मुंबई हा चालत सहा महिने प्रवास करावा लागला होता. त्याच अण्णाभाऊंनी 1961 मध्ये मुंबई ते मॉस्को हा प्रवास विमानाने करत त्याठिकाणी जाऊन प्रबोधन करण्याचे काम केलं रशियाचा प्रवास म्हणजे अण्णाभाऊंच्या जीवनातील एक अत्यंत आनंदाचा क्षण होता.
त्याठिकाणी अण्णाभाऊंनी शिवरायांवर पोवाडा सादर केला होता.
देश विदेशात जाऊन अण्णाभाऊंनी स्वतःच्या पोवाड्यांची मांडणी त्या काळामध्ये केले व खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ लोकशाहीर म्हणून पुढच्या काळामध्ये नावारूपाला आले.

*लाल बावटा पथकाची स्थापना -*

अण्णाभाऊ फक्त कथा- कादंबऱ्या , लोकनाट्य, पोवाडे, हे लिहिण्या पर्यंत थांबले नाहीत तर, हे सर्व तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी व समाजातील शोषित उपेक्षित वर्गासाठी मुंबईतील कामगारांच्या प्रबोधनासाठी “लाल बावटा कला पथकाची स्थापना केली”. या कला पथकांमध्ये अण्णाभाऊ साठे शाहीर अमरशेख शाहीर गव्हाणकर यांचीसुद्धा महत्त्वाची भूमिका होती.या पथकाच्या माध्यमातून या तिघांनीही महाराष्ट्र पिंजून काढला महाराष्ट्रभर प्रबोधन केले व सरकारच्या चुकीच्या धोरणांचा ही समाचार या माध्यमातून त्यांनी घेतला.त्यामुळे त्यांना अनेकदा प्रस्थापितांच्या विरोधात सुद्धा प्रचंड संघर्ष करावा लागला.

*कष्टकरी कामगारांचा नेता –*

अण्णाभाऊ हे फक्त साहित्यिक समाजप्रबोधनकार शाहीर एवढेच त्यांचे कार्य मर्यादित नव्हते, तर अण्णाभाऊ एक उत्कृष्ट संघटक सुद्धा होते.कामगारांच्या प्रश्नावर फक्त बोलणे किंवा लिहिणे मांडणीत पर्यंतचे थांबत नव्हते, तर ते प्रश्न सोडविण्यासाठी अण्णाभाऊ रस्त्यावर उतरत. अण्णाभाऊ कम्युनिस्ट पक्षाचे काम करत होते मुंबई मधे 20000 कामगारांचा मोर्चा अण्णाभाऊंनी काढला व त्यात प्रमुख घोषणा होती “ये आझादी झुठी है देश कि जनता भुकी है” एवढा भव्य मोर्चा अण्णाभाऊंनी काढला होता अस आश्रम कन्यांचा नेता म्हणजे त्यांना अण्णा भाऊ होते.

*संयुक्त महाराष्ट्र चळवळतीत अण्णाभाऊ यांचे योगदान -*

1957 मध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करून गुजरात ला जोडण्याचा प्रयत्न होऊ लागला. हा डाव अण्णाभाऊंच्या लक्षात आला, या धोरणाला विरोध करण्यासाठी अण्णाभाऊंनी प्रबोधन करायला सुरुवात केली. या धोरणाविरोधात अण्णाभाऊंनी रान उठवले. ‘माझी मैना गावावर राहिली’ ही प्रसिद्ध लावणी याच विषयाला धरून अण्णाभाऊंनी त्या काळात लिहिली.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्रत्यक्ष सहभाग घेऊन अशा लावण्यांच्या माध्यमातून त्यांनी मराठी माणसाला जागे केले. कारवार,निपाणी,बेळगाव,मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे. अशी भूमिका त्या काळामध्ये अण्णाभाऊंनी घेतली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अशाच अण्णाभाऊ सारख्या लढाऊ कार्यकर्त्यांमुळे सामर्थ्यशाली बनली व बऱ्याच प्रमाणात यशस्वी देखील झाली.

अण्णाभाऊ हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते कामगार कवी लोकशाहीर,कथाकार,कादंबरीकार,नाटककार,चळवळीत काम करणारा कार्यकर्ता,कामगारांचा नेता,उत्तम नट आणि मानवी जीवनावर उत्कट प्रेम करणारा माणूस. संघर्ष हा या व्यक्तिमत्त्वाचा केंद्रबिंदू होता.मार्क्स आणि आंबेडकरवादी विचाराने प्रेरित होऊन एका हातात आणि एका हातात लेखणी घेऊन लढणारा हा योद्धा होता.
अशा महानायकाचा मृत्यू 18 जुलै 1969 रोजी झाला. अण्णाभाऊंच्या विचारांचं श्रमकरी कष्टकरी शेतकऱ्यांच राज्य देशात येवो याच या जयंती निमित्त शुभेच्छा..!

✒️लेखक:-अविनाश धायगुडे(प्रसिद्ध व्याख्याते)मो:-9423242415

▪️संकलन:-नवनाथ पौळ(बीड,अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185