सायकल स्नेही प्रा. पारखी यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस: परिवारातर्फे ५० झाडांचे वृक्षारोपण आणि वृध्दाश्रमात फळवाटपाने साजरा

34

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.31जुलै):-सायकल चालवा, आरोग्यवान व्हा आणि प्रदूषण हटवा हा महत्त्वपूर्ण संदेश जनमाणसात रूजविण्याचे कार्य गेल्या तीन वर्षापासून सायकल स्नेही मंडळ ही स्वयंसेवी संस्था गडचिरोली शहरात आणि परिसरात सातत्याने कार्य करीत आहे . याच मंडळाचे आणि वृक्षसंवर्धक , सर्पमित्र म्हणून उत्स्फुर्तपणे सेवा देणारे सायकल स्नेही प्रा. विलासराव पारखी यांचा सत्कार करण्यात आला.

श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या सामुदायिक प्रार्थना मंदिरात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डाॕ. शिवनाथजी कुंभारे होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , अरविंद पा. वासेकर , सायकल स्नेहीचे उपाध्यक्ष प्रा. डाॕ. योगेश पाटील , महाराष्ट्र अंनिसचे विलासराव निंबोरकर , धम्मअभ्यासक भोजराज कान्हेकर , कवी पुरूषोत्तम ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रास्तविकपर भाषण विलासराव निंबोरकर यांनी केले. सामुदायिक प्रार्थनेनंतर मंडळातर्फे ग्रामगीता आणि मानवस्त्र देऊन प्रा. पारखी यांचा सत्कार डाॕ. कुंभारे यांचे हस्ते करण्यात आला.याप्रसंगी डाॕ. कुंभारे म्हणाले , आदर्श समाज निर्मितीसाठी राष्ट्रसेवेचे कार्य प्रत्येकांनी आपआपल्या परीने सुरू ठेवले पाहिजे . यातून समाजात सेवाभाव वृध्दींगत होण्यास मदत होते. ग्रामगीताचार्य बोढेकर म्हणाले , मानवी विकासाचा मार्ग हा एकमेकांच्या जीवनास परस्परपूरक स्वरूपातून उन्नत होत असतो. वैज्ञानिक आणि मानवतेच्या दृष्टीने असे सत्कार्य केले जावे. या पार्श्वभूमीवर प्रा. पारखी यांचे पर्यावरण संवर्धनाचे कार्य महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले .

पारखी परिवाराच्या वतीने सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने गडचिरोली येथील वृध्दाश्रमात फळांचे वितरण केले गेले तसेच ५० विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन पंकज भोगेवार यांनी केले तर आभार प्रमोद राऊत यांनी मानले. किशोर पाचभाई ,दत्तात्रय पाचभाई , सौ. गीता पाटील, श्रीमती मनिषा कायरकर,तुषार निकुरे, चेतन नंदनवार, नितेश गेडाम आदींनी सहकार्य केले.