आष्टी येथील राष्ट्रीय लोक अदालतीला उस्फुर्त प्रतिसाद:२९० प्रकरणे तडजोडीने निकाली

22

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.2ऑगस्ट):-महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई,बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार आष्टी तालुका विधी सेवा समिती आणि आष्टी तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१ ऑगस्ट २०२१ रोजी आष्टी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे प्रांगणात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न झाली.या लोकअदालतीमध्ये प्रलंबीत दिवाणी आणि फौजदारी स्वरुपाची १६७४ प्रकरणे तसेच ६६२ दाखलपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.त्यापैकी प्रलंबित २१३ दिवाणी आणि ३२ फौजदारी तसेच ४५ दाखलपुर्व प्रकरणे असे एकुण २९० प्रकरणे निकाली निघाली.या लोकअदालातीमध्ये प्रलंबीत व दाखलपुर्व प्रकरणात १ कोटी ५९ लाख ५९ हजार ८३६ रुपये वसुल झाले.

या लोकअदालतीत चार पॕनल करण्यात आले होते.पॕनल प्रमुख म्हणुन आष्टीचे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर के.के.माने,बीडचे तिसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी.बी.देशपांडे,आष्टीचे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व्हि.एन.शिंपी,बीडचे सहावे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर झेड.झेड.कादरी यांनी काम पाहिले.या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबीत दिवाणी दावे,दाखल पूर्व प्रकरणे,बँककर्ज प्रकरणे,धनादेशाचे प्रकरणे,ग्रामपंचायत,नगरपंचायतची थकबाकी प्रकरणे,घरगुती कौटुंबिक वाद,पोटगी प्रकरणे आणि तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे सामोपचाराने आपसात तडजोडीने निकाली निघाले आहेत.या राष्ट्रीय लोकआदालतीमध्ये कोरोना बाबतच्या सर्व नियमावलीचे पालन करण्यात आले होते.ही लोकआदालत यशस्वी होण्यासाठी न्यायाधीश,वकील संघाचे पदाधिकारी आणि सदस्य,महसुल प्रशासन,पोलीस प्रशासन आणि न्यायालयातील सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.