किशोर कुमार : चित्रपट सृष्टीला लाभलेले अनमोल रत्न

33

हिंदी चित्रपट सृष्टीतील अवलिया व्यक्तिमत्त्व असलेले किशोर कुमार यांचा आज जन्मदिन. किशोर कुमार हे हिंदी चित्रपट सृष्टीला लाभलेले अनमोल रत्न आहे. चित्रपट निर्मितीतील असे कोणतेच क्षेत्र नाही की ज्यात त्यांचा सहभाग नाही. पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, पटकथा लेखक असे चित्रपट निर्मितीतील सर्वच प्रकारात त्यांनी मुक्त विहार केला. किशोर कुमार यांचे मूळ नाव आभास कुमार गांगुली असे होते. ४ ऑगस्ट १९२९ रोजी मध्यप्रदेशातील खांडवा येथे किशोर कुमार यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कुंजलाल गांगुली हे वकील होते तर आई गौरादेवी या गृहिणी होत्या. त्यांचे थोरले बंधू अशोक कुमार आणि अनुप कुमार हे दोघेही हिंदी चित्रपट सृष्टीत नायक म्हणून कार्यरत होते. किशोर कुमार हे देखील आपल्या भावांप्रमाणे चित्रपट सृष्टीत नशीब आजमावण्यासाठी धडपडत होते.

१९५० साली कुंजलाल गांगुली यांनी किशोर कुमार यांना मुक्कदर या चित्रपटात काम दिले. १९५२ ते १९६० या दरम्यान किशोर कुमार यांनी बऱ्याच चित्रपटात काम केले. नोकरी, अधिकार, धोबी डॉक्टर, ईलजाम, मिस माला, झलक हे चित्रपट त्यांनी १९५४ या एकाच वर्षात पूर्ण केले. १९५६ साली तर त्यांनी ९ चित्रपटात भूमिका केल्या. हा त्याकाळी एक विक्रम होता. त्यानंतर ते अभिनयासाठी गायनही करु लागले. अभिनय आणि गायन असा त्यांचा समांतर प्रवास सुरू झाला. किशोर कुमार यांनी आपल्या मिश्किल स्वभावाने चित्रपट सृष्टीत विनोदी भूमिकांचा नवा ट्रेंड आणला. अभिनय करताना गायन आणि संगीताचा तालावर थिरकने असा नवा ट्रेंड त्यांनी सुरू केला. किशोर कुमार यांच्या या नवीन स्टाईलने तरुणांना भुरळ घातली. त्याकाळातील सर्व दिग्गज नायिकांसोबत त्यांनी भूमिका केल्या. मधुबाला सोबत त्यांची जोडी विशेष जमली. अभिनयासोबत गायनातही ते यशस्वी होऊ लागले. त्यांची गाणी लोकप्रिय होऊ लागली. किशोर कुमार यांना संगीतकार सचिन देव बर्मन यांनी अनेक संधी दिल्या. सचिन देव बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी गायलेली सर्व गाणी लोकप्रिय झाली.

पुढे सचिन देव बर्मन यांचे चिरंजीव राहुल देव बर्मन उर्फ पंचमदा यांच्याशी जोडी जमली या जोडीने अनेक लोकप्रिय गाणी चित्रपट सृष्टीला दिली. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासोबत त्यांनी शेकडो गाणी गायली ती सर्व लोकप्रिय झाली. किशोर कुमार यांनी तीन दशकांहून आधीक काळ गायन केले. देव आनंद यांच्यापासून अनिल कपूर यांच्यापर्यंत सर्वच नायकांना त्यांनी आवाज दिला. किशोर कुमार यांचा आवाज ज्या नायकासाठी वापरला गेला तो नायक स्टार बनला. राजेश खन्ना यांना बॉलिवूडचा सुपरस्टार बनवण्यामागे किशोर कुमार यांचाही मोठा हात आहे. राजेश खन्ना यांच्या सर्व चित्रपटांमध्ये किशोर यांचाच आवाज वापरला गेला. आराधना पासून जमलेल्या या जोडीने पुढे इतिहास घडवला. या जोडीची सर्व गाणी हिट झाली. ज्या ज्या वेळी राजेश खन्ना यांचे नाव निघते त्या त्या वेळी किशोर कुमार यांचेही नाव घेतले जाते. किशोर कुमार यांनी ४०० हुन अधिक चित्रपटात शेकडो गाणी गायली ती सर्व लोकप्रिय झाली. नायक, गायक यासोबत ते दिग्दर्शकही होते. चलती का नाम गाडी यासारख्या विनोदी चित्रपटसोबतच दूर गगन की छाव मे यासारखा गंभीर चित्रपटही त्यांनी काढला.

त्यांनी काही चित्रपटांना संगीतही दिले तर काही चित्रपटांसाठी गाणीही लिहिली. किशोर कुमार यांनी चित्रपटाच्या पटकथाही लिहील्या. असा हा हिंदी चित्रपट सृष्टीतील अवलिया अष्टपैलू १३ ऑक्टोबर १९८७ रोजी जगाला अलविदा करून कायमचा निघून गेला. किशोर कुमार यांच्या जादुई आवाजाची मोहिनी आजही कायम आहे. आजही त्यांची गाणी पूर्वीइतकीच लोकप्रिय आहेत. किशोर कुमार यांनी चित्रपट सृष्टीवर असा ठसा उमटवला आहे की त्यांच्या नावाशिवाय हिंदी चित्रपट सृष्टीचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. किशोर कुमार यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)