उजेडात हरवलेला कलाकार…!

45

( आदरणीय श्री-दिनेश मधुकर साळुंखे सर- कला अध्यापक, ‘कठपुतली नृत्य’ जागतिक कलावन्त यांच्याविषयीचा व्यक्तिविशेष लेख….!)

उपरोक्त शिर्षक वाचून तुम्हाला अचंबा झाला असेल. उजेडात कुठे काही हरवत असते का! हरवणे आणि अंधार दोन्हीही नको असलेल्या बाबी. अंधारात काही दिसत नाही आणि हरवावे असे काहीच नसावे आणि सगळे आपल्या जवळच असावे; असेच वाटते. आपल्या जीवनातील हे एकमेव महत्वपूर्ण उदाहरण असेल ज्यात विज्ञानाच्या विरोधी काम आपल्या निदर्शनास येईल. म्हणजे अंधार व हरवणे जर नकारार्थी असेल तर नकारार्थी एकत्र येऊन सकारात्मक कसे होईल, ते तर अधिक नकारार्थी व्हायला पाहिजे. जसे चुम्बकाचे दक्षिण-दक्षिण व उत्तर-उत्तर ध्रुव एकत्र येऊ शकत नाही आणि उत्तर-दक्षिण ध्रुव आकर्षण बल असते. तिथे आपण नकारात्मकता एकत्र आणून आणखी नकारात्मक करणे; ही कला माणसालाच अवगत आहे.

जास्त गोंधळात पडले का? मी पण माणूसच आहे; म्हणून माणसासारखे उलट्यात जाऊ म्हटलं. अंधारात हरवलेला कलाकार म्हणण्यापेक्षा उजेडात हरवलेला कलाकार म्हणू; आणि ते मी आपल्याला पटवूनही देईल. तसा पटवून देण्यात माझा चांगलाच हातखंडा आहे.

एक नाव आहे, एका माणसाचे! दिनेश! ‘दिनेश’ या शब्दाचा अर्थ माहिती आहे का आपल्याला? माहीत असेल,नसेल तरी पुन्हा ऐका! दिनेश म्हणजे सूर्य! आणखी दुसरा अर्थ- आजचा देव! किती मोठा अर्थ यात दडला आहे. आणि ज्या व्यक्तीविषयी आज मी लिहिणार आहे, तो देखील या अर्थाइतकाच मोठा आहे. मोठा काय उत्तुंग आहे.किंबहुना दिलेल्या अर्थापेक्षा किंचित मोठाच असेल.

‘दिनेश मधुकर साळुंखे’ रा.चोपडा जि. जळगाव येथील कला अध्यापक! माझे अध्यापक विद्यालयातील माझ्यासोबत कित्येक बॅचमधील कैक विद्यार्थ्यांचे ते आदरस्थान आहेत. सन 2007 ला डी.एड. ला शिकायला गेलो असताना गावापासून कैक मैल दूर चोपडा हे गाव होते. मला सोडून माझ्यासाठी सगळे अनोळखी! पहिले काही दिवस तर असे होते, की मी मला विसरून जायची वेळ आली होती. तिथे राहण्याची, शिकण्याची उमेद वाढवणारे, जगण्यातील रुची व अभ्यासातील उत्कंठा, जिज्ञासा वाढवणारे एकमेव गुरुवर्य म्हणजे आदरणीय साळुंखे सर! साळुंखे सर म्हणजे अनेक चांगल्या गोष्टींचा समुच्चय. असते न ते- एकपात्री नाटक, ज्यात सर्व पात्रांची भूमिका एकच कलाकार करतो. जसे जनरल फिझिशियन असतो. तसे सर्व गुणांचे माहेरघर म्हणजे आदरणीय सर! शिकवण्यापासून ते शिस्त लावण्यापर्यंत सर्व कामात ते तरबेज. सरांबद्धल आदरयुक्त भीती होती, जी आजही कायम आहे.

साळुंखे सरांविषयी लिहायला एक लेख पुरेसा नाही. त्यासाठी लेखांची लेखमालिका सुरू करावी लागेल. तरीही गुरुजींचे कार्य संपणार नाही, इतके ते मोठे आहेत. पण होते कसं, ‘घर की मुर्गी दाल बराबर!’ सारखे आहे आपल्या भारतीयांना. घरच्या बापाने बिघडलेला टीव्ही दुरुस्त केला तर आम्हाला तो प्रॉब्लमच पुढे लहान वाटतो आणि थ्री पीनची जळालेली तार जरी बाहेरच्या इलेक्ट्रिशियनने जोडून दिली तर तो खूप मोठा प्रॉब्लम होतो. साळुंखे सर म्हणजे अध्यापक विद्यालयात शिकवणारे सामान्य प्राध्यापक नाहीत, तर ते जागतिक दर्जाचे कलावन्त आहेत. जे आम्ही तिथे असताना आम्हाला ते जवळून दिसले पण डोळे असून ओळखू आले नाही. कलेचा अखंड समुद्र आमच्यासमोर उभा होता, पण ओंजळ भरून पाणी घ्यायची अक्कल आम्हाला नव्हती. शेवटी घरभरून पाणी झाल्यावर जाग्यावर बसूनही चार शिंतोडे आपल्या अंगावर पडतातच! इच्छा असो की नसो. तशी सरांची कला अजाणतेपणी आम्हाला मिळाली. आजही त्याचाच वापर जमेल तसा अध्यापनात करतो.

सरांना, वर जागतिक दर्जाच्या कलावंत उगाच म्हणालो नाही. ते तसे आहेत म्हणून म्हणालो. आपल्याला बँकेत कॅशीयर दहा हजार मोजून देताना एकदा, बँकेत दुसऱ्यांदा आणि घरी तिसऱ्यांदा पैसे मोजण्याची सवयच आहे. सवय काय भरोसाच नाही कोणावर! म्हणून सर जागतिक दर्जाचे कलावन्त का? याचे उदाहरणे, पुरावे सगळे सादर करतो.

सन 2016 ला ‘वर्ल्ड पपेट कार्निव्हल’ पोलंड-युरोप साठी एकमेव भारतीय प्रतिनिधी म्हणून तिथे गेले होते. ‘हार्मनी पपेट फेस्टिव्हल 2018’ – फुकेट (थायलंड), ‘रेनफॉरेस्ट वर्ल्ड पपेट कार्निव्हल 2019’- कुचिंग (मलेशिया) या सर्व ठिकाणी कठपुतली कार्यक्रम सादरीकरणासाठी ते एकमेव भारतीय प्रतिनिधी होते. सन 2016 ला मी गुरुजींची जागतिक वारीची बातमी वृत्तपत्रात वाचली होती; वाचून आनंद तर वाटलाच, सोबत अभिमानाने उर भरून आला. जागतिक दर्जाच्या शिक्षकाकडे आपण शिकलो हे आठवून बरे वाटायला लागले. कित्येक जणांना मी सांगितलेही की, ते माझे गुरुजी आहेत असे. वाटले की सर आता विनाअनुदानित शाळेवर कमी पगावर काम करत नसतील. सरांना मोठं-मोठी कामे मिळून आर्थिक सुबत्ताही असेल असे वाटले. पण,माझं दुर्दैव मला सरांच्या संपर्कात राहायला मिळाले नाही. काही महिन्यांपूर्वी आमच्या डीएडच्या मित्रांनी एक व्हाट्सअप्प ग्रुप केला ज्यात सरांनाही ऍड केले. नन्तर सरांना फेसबुकवर फ्रेंड केले. तेव्हा मला सरांची होत असलेली व्यथा कळली. मी त्याला व्यथा म्हणणार नाही. कारण तुम्ही शाळेत पहिला नंबर यायच्या पात्रतेचे असताना जर फक्त ढकलपास होत असाल तेव्हाचे होणारे दुःख म्हणजे काय हे सरांकडे पाहून कळले.

गुरुजींना आताही काम आहे. भरपूर काम आहे. पण, त्यांच्या गुणवत्तेला साजेसं निश्चितच नाही. एखादा मुलगा चांगले गायन करत असेल, तरीही भारतीय पालक म्हणतात की ओरडून पोट भरत नाही. त्यासाठी काम करावे लागते. एकतर चांगल्या बाबीला वाईट म्हणायचे. म्हणजे शिक्षकाला मास्तर, गायनाला ओरडणे, नृत्याला धिंगाणा वरती या कलेने पोट भरत नाही, ही मानसिकता! ते असे का म्हणतात? कारण भारतीय लोकांची स्थिती तशीच आहे. हस्तकलेच्या वस्तू निर्मितीत साळुंखे सर सारखाच भारत देश प्राचीन काळापासून जगविख्यात होता. पण, आपल्यालाच त्या कलेची कदर नसल्यामुळे ती कला लोप पावत गेली. आज आपण आपल्याच पूर्वजांनी बनवलेल्या वस्तू, जे जगातल्या कुठल्यातरी संग्रहालयात असतील त्या अँटिक म्हणून विकत घेऊन मिरवतो. पण, आज कोणीतरी काना-कोपऱ्यात आशा वस्तू घडवत असेल तर आपल्याला त्याची न कदर आहे ना आदर!

सन 2014 ला सोनी टीव्हीवर झालेल्या ‘एंटरटेनमेंट के लिय कुछ भी करेगा’ शोमध्ये 11,111/- रूपयांचे बक्षीस मिळाले म्हणून सरजी अभिमानाने सांगतात. पण, मी काय म्हणतो तुमची कला त्या 11,111/- पेक्षा कित्येक पट्टीने अमूल्य आहे. पण हे इथे असे का सांगावे लागते? कारण सोनी टीव्हीने कौतुक केले म्हणून दर्जेदार! म्हणजे आपली मानसिकता जशी तसे सरही बोलायला लागलेत आता.

आता सांगतो! उजेडात हरवणारा कलाकार हेच शिर्षक का? उजेड म्हणजे आशा, विश्वास, सकारात्मकता, केवळ चांगले. म्हणजे उजेडात काहीच हरवत नाही. सगळे लख्ख असते, प्रसन्न असते. या उजेडाच्या जगात आपण आहोत. जिथे टीव्ही आहे, फ्रिज आहे, ए.सी. आहे, मोबाईल त्यावर व्हाट्सअप्प ,फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर शिवाय फिरायला बरीच पांचट स्थळे, दारू, मटका, ताश, गाड्या-घोड्या सगळेच आहे. पण, याहीपेक्षा विना विद्युतचा हरहुन्नरी कलाकार दिसायला जिवंत नजर आपल्याकडे नाही. डोळे आहेत, पण उजेडातही दिसायला काळे आणि पहायलाही काळेच.

कॅब्रे डान्स करून नट्या नाचवता न, त्यांना पण पोट आहे. द्या की काम! कोण नाही म्हणते. आनंद साजरा करायला डी.जे. लावताच की. मग एक जगविख्यात कलावन्त जो कलेमध्ये शिकून ,अनुभवाने पारंगत आहे. ज्यांना कठपुतली नृत्य, त्यातून विद्यार्थ्यांना शिकवण तर मिळतेच, शिवाय संमोहन शास्त्राचे ज्ञान अवगत आहे. जो व्यक्ती स्वतः चा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि समाजात आपल्या कलेने जागृती निर्माण करण्यासाठी भटकतो आहे. त्याची भटकंती तुम्ही थांबवणार आहात की नाही?

गुरुजींचा कठपुतली नृत्य ‘बाहुल्यांचे विश्व’ म्हणून प्रसिद्ध आहे. ज्यात ते बाहुली नृत्याद्वारे गाण्याच्या आवाजावर बाहुल्यांचे नृत्य सादरीकरण करतात. ज्यात भरसक शिकवनही दिली जाते. या सर्व बाहुल्या सरांनी स्वतः घडवलेल्या असतात. बऱ्याच प्रकारची शिक्षक-विद्यार्थी उपयोगी स्वनिर्मित शैक्षणिक साधने त्यांनी निर्माण केली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कुठल्याही शाळा-विद्यालयाने त्यांच्या ‘शैक्षणिक साधने निर्मिती’ कार्यशाळेचे आयोजन केले तर खूप मोठा फायदा होईल. महाराष्ट्रातील नामवंत व हुशार शिक्षकाकडून शिकायला मिळेल. हे त्या विद्यार्थ्यांचे भाग्यच असेल.

अगोदर कलाकारांना राजाश्रय असायचा. आता राजाश्रयही सोयीच्या लोकांनाच आहे. मग, त्यांना किमान लोकाश्रय तर मिळावा! वाढदिवस, लग्न समारंभ, साखरपुडा, दुर्गा महोत्सव, गणेशोत्सव,इतर अनेक खाजगी, सार्वजनिक कार्यक्रम यासाठी गुरुजींना बोलवा. ते त्यांच्यासाठी फारच लहान काम आहे. पण कलाकारालाही पोट आणि कुटुंब असते. त्याच्या वेगवेगळ्या गरजा असतात. म्हणून काम तर करावेच लागेल. कलेला काम म्हणणे साळुंखे सरांनाही पटणार नाही. कारण त्यांची ते पॅशन आहे. पण काय करता आजच्या कलयुगात तसे म्हणल्याशिवाय पर्यायही नाही. पण, एवढे निश्चित की सरांचा शो पाहून मंत्रमुग्ध व्हाल!

कशाला जन्मले इथे

इथल्या भूमीत

इच्छा विचारली का कोणी

दर्जा तुमचा

अत्युच्च आहे

मी घेतो हमी…

सरांना तुमच्या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी त्यांचा संपर्क-

नाव- प्रा.श्री.दिनेश मधुकर साळुंखे मु.पो.ता.चोपडा जि. जळगांव

शिक्षण-ए. टी. डी., सी.टी. सी., बी.एफ.ए.

( कठपुतली नृत्य, संमोहनशास्त्र समुपदेशक)

मो- 9860520603

7020072265

धन्यवाद!

✒️लेखक- अमोल चंद्रशेखर भारती,नांदेड( आदरणीय साळुंखे सरांचा विद्यार्थी )मो-8806721206