संकट काळातील मानवतेचे दर्शन

23

संकटाच्या काळात मदतीला धावून जाणे ही मानवी प्रवृत्ती आहे. तिलाच माणुसकी असे म्हणतात. भारताची तर ती संस्कृतीच आहे. घासातला घास आणि तांब्याभर पाणी देणे ही आपली परंपराच आहे. जगात आपला भारत देश हा एकमेव असा देश आहे जिथे दान धर्माला सर्वाधिक महत्व दिले जाते. दान धर्माचे अनेक दाखले आपल्या पुराणात पाहायला मिळतात. बळीराजाने वामनाला संपूर्ण पृथ्वी दान दिली होती. कर्णाने आपले कवच कुंडले दान दिले होते. संकट छोटे असो वा मोठे, सुलतानी असो वा आस्मानी एकामेकाच्या मदतीला धावून जाणे हीच आपली परंपरा आहे. मागील वर्षी कोरोनामुळे जेंव्हा देशव्यापी लॉक डाऊन जाहीर झाला होता तेंव्हा अनेकांचा रोजगार गेला. हातावर पोट असलेल्या मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला.

हजारो लोकांनी स्थलांतर केले अशा वेळी संपूर्ण देशातून मदतीचा ओघ सुरू झाला होता. या मदतीतून हजारो कुटुंबे सावरली. ज्याला जशी जमेल तशी त्याने मदत केली. कोरोनाचे संकट कायम असतानाच यावर्षी महाराष्ट्राला पुन्हा मोठ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागले. रत्नागिरी , कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना मागील आठवड्यात पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे या जिल्ह्यातील सर्व प्रसुख नद्यांना महापुर आला. कोकणातील काही गावांवर दरडी कोसळल्या. काही ठिकाणी भुस्खलनाच्या घटना घडल्या. या नैसर्गिक आपत्तीने क्षणात होत्याचे नव्हते झाले. अनेकांचा संसार पाण्यात वाहून गेला. शेकडो कुटुंबे रस्त्यांवर आली. घर, दुकाने, काद्यालये पाण्याखाली गेली. गावोच्या गावे पाण्याने आणि चिखलाने वाहून गेली.

हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. मोठ्या कष्टाने उभारलेली शेती पाण्यात वाहून गेले. हाती आलेली पिके नष्ट झाली. मुलाबाळांप्रमाणे सांभाळलेली गुरे ढोरे, पाळीव प्राणी नदीच्या प्रवाहात वाहून गेली. सर्वत्र पाणी आणि चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. महापूर हटला तरी सर्वत्र गाळ आणि चिखल पसरला त्यामुळे रोगराई वाढली. पिण्याचे पाणीही दूषित झाले. दोन दिवसाच्या पावसाने वर्षाची मेहनत पाण्यात गेली. काहींच्या घरातील कर्तीधरी व्यक्ती सोडून गेली. अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले. मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली. महापुरात सर्वस्व गमावलेल्या या हजारो कुटुंबांना तातडीच्या मदतीची नितांत गरज होती.

जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता त्यामुळे हजारो कुटुंबे प्रभावित झाली होती. शासन स्तरावरून मदतीची प्रक्रिया सुरू झाली होती पण त्याला मर्यादा होत्या. या संकटात माणुसकीचा, संवेदनशीलतेचा आणि सामाजिक जाणिवेचा सुखद अनुभव आला. हे संकट खूप मोठे आहे याची जाणीव राज्यातील जनतेला झाली. टीव्ही वर पुरग्रस्तांचा आक्रोश पाहून राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. ज्याला जशी जमेल त्याने तशी मदत केली. नेहमीप्रमाणे सामाजिक आणि सेवाभावी संस्था, धार्मिक आणि अध्यात्मिक संस्था, गणेशोत्सव मंडळे, क्रीडा मंडळे, तरुण मंडळे राजकीय आणि सामाजिक संघटना यांनी या भागात जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. ज्यांना शक्य होती त्यांनी आर्थिक मदत केली. वर्तमानपत्रांनी रिलीफ फंड खोलून त्यात आर्थिक मदतीचे आव्हान केले त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री सहायता निधीतही काहींनी मदत केली. सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार पुरग्रस्तांसाठी देऊ केला.

व्यापारी, उद्योगपती आणि सिलिब्रेटींनीही मोठ्या प्रमाणावर मदत केली. अशा आपत्कालीन परिस्थितीत ज्याला जशी जमेल त्याने तशी मदत करून पुरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचे काम केले. समाजातून माणुसकी संपत चालली आहे अशी ओरड नेहमी केली जाते पण अशा संकट काळात प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष मदत करून या संवेदनशील लोकांनी समाजात माणुसकी जिवंत आहे हे दाखवून दिले. या संवेदनशील लोकांमुळेच समाजातील माणुसकी आजही टिकून आहे. महापुरासारख्या आस्मानी संकटात प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष मदत करून पुरग्रस्तांचे अश्रू पुसत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या सर्व संवेदनशील लोकांचे मनापासून आभार!

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५