सोहम प्रशांत सहस्त्रबुद्धे याने निसर्गाच्या विहंगम दृश्याचे टिपलेल्या छायाचित्राला मिळाला प्रथम क्रमांक

29

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

अहमदनगर(दि.9ऑगस्ट):- महानगरपालिका आयोजित खुल्या निसर्ग छायाचित्र स्पर्धेत सोहम प्रशांत सहस्त्रबुद्धे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला.अहमदनगर येथील महानगरपालिकेच्या १८ व्या स्थापनादिनाचे औचित्य साधून पालिकेच्या वतिने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्यातील एक भाग असलेल्या खुल्या छायाचित्र स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.यावेळी “निसर्ग” या विषयावरील छायाचित्र स्पर्धेत अनेकांनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेत विविध भागातील निसर्गाचे छायाचित्र स्पर्धकांनी टिपले होते.

परंतु चहूबाजूने असलेला डोंगर त्याच्या मध्यभागी असलेला तलाव,आकाशात साठलेले काळे ढग आणि डोंगराच्या कपारीतून तलावात पडणारे पाणी हे विहंगम दृश्य सोहम प्रशांत सहस्त्रबुद्धे याने त्याच्याकडे असलेल्या मोबाईल मध्ये टिपले होते.हे छायाचित्र सोहमने पारनेर तालुक्यातील कर्जुले हरेश्वर जवळील डिंबे धरणाच्या खाली रोईचोंडा नावाच्या धबधब्याचे आहे.या छायाचित्रातील जिवंतपणाने परिक्षकांना भूरळ घातली आणि सोहमने प्रथम क्रमांक पटकावला.यावेळी सोहमचे वडील प्रशांत सहस्त्रबुद्धे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि,सोहमला मुळातच फोटोग्राफीची आवड असल्यामुळे कुठेही बाहेर फिरायला गेल्यावर किंवा कुठल्याही कार्यक्रमात फोटोग्राफी करण्याचे काम सोहमकडेच असते.

विशेष म्हणजे हा फोटो सोहमने मोबाईलमध्ये टिपला असून कुठल्याही प्रकारचे एडिटिंग केले नाही व कोणताही व्यवसायिक उपयोगाच्या कॅमेर्‍यातून काढलेला नसल्याने अपेक्षित नसतानाही केवळ एखाद्या गोष्टीचा छंद आणि त्यातून मिळणारा आनंद घेण्यासाठी त्याने टिपलेले हे छायाचित्र त्याला प्रथम क्रमांक मिळवून गेले याचा आनंद झाला असून आम्ही कुटुंबिय याचा प्रत्यक्ष अनुभव घेत असल्याचेही सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.या यशाबद्दल सोहमचे सर्व आष्टीच्या पत्रकार संघाने अभिनंदन केले आहे.