सो कॉल्ड ब्युटी…!

34

आज टीव्हीवर सलमान खानचा चित्रपट पाहत होतो. 55 वर्षांचा देखणा हिरो पाहताना, आश्चर्य वाटत होते. तो या वयातही इतका फिट कसा? हा प्रश्न सारखा मनात घोळत होता. नंतर चित्रपट सृष्टीतील मेकअप आर्टिस्टच्या हातातील जादू ध्यानात आली. जी जादू 71 वर्षांच्या अमिताभला 12 वर्षांचा मुलगा करू शकते, ज्यात शाहरुख खान स्वतःचाच फॅन स्वतः तरुण होऊ शकतो, ज्यात झिरो मध्ये हिरो पण शाहरुख ला दाखवता येते, आणखी बरेच! मग 55 काय 80 वर्षालाही सलमान स्मार्टच दिसेल. सलमान असो की इतर नट-नट्या यांना साक्षात पाहण्यापेक्षा जे त्यांना ‘विना मेकअप’ पाहतील तेच खरे भाग्यवान चाहते म्हणावे लागतील.असो!

माझ्या विषयावर येतो, जो की आपल्याला थोडा कळला असेलच. आपण जसे दिसतो तसे समोर प्रकट होतो, कारण बाळ जन्म घेते तेव्हा मेकअप करून येत नाही. काळ्याला गोरे करून, आणि अंगावर चोहोबाजूंनी चमक लावून तो येत नाही. त्याचा भेदभाव सुरू होतो, तो जन्म घेतल्यानन्तर! कारण तो आता या मृत्यूलोकाचा भाग झालेला असतो, ज्यातील अर्ध्यांची आर्धी जिंदगी लोकांशी तुलना करण्यात गेलेली असते. ज्यात या बाळाची, जे कधी बाळ होते त्यांची जन्मभर तुलना ही इतरांशी होणारच असते. विशेष करून मी सौंदर्याविषयक बोलत आहे.

उपरोक्त तुलनेच्या विळख्यात ‘आदर्श’ म्हणून जे अडकलेले असतात, त्यांचे त्यात राहणे भाग्यदायीच! कारण ते त्यातले दिशादर्शक असतात. ते काही समाजातले सर्वात ‘सुंदर’ नसतात. पण, जिथे हा गराडा तयार होतो, त्या वर्तुळातले ते सर्वाधिक सुंदर होत! त्यांना हा ‘ब्युटीफुल/हँडसम’ नावाचा किताब आपणच दिलेला असतो. जो फक्त उभा केलेला एक पुतळा असतो; ज्याचा उपयोग त्याच्याशी तुलना करून अनेकांना कमी लेखण्यासाठी वेळोवेळी घेतला जातो

थांबा! आपल्या लक्षात येत नसेल तर समजावून सांगतो. जसे की घरात सुनबाई आहे. सुनबाईपूर्वी ती एका मुलाची बायको आहे. पण, बायकोचे नाते इतर नाते जुळवताना कधी धूसर झाले हे कळलेच नाही. मग, ती भावजयी, वहिनी,सुनबाई, मामी, काकू आणि बरेच इतर काही पात्रे बदलून यात घुमत राहते, वेड्यागत! आता होते कसे, ही सुनबाई सुंदर आहे की कुरूप हा तिचा नवरा कधी ठरवतच नाही. कारण त्याला जशी मुलगी हवी होती, त्याच्या सौंदर्याच्या व्याख्येत बसणारी त्याने त्याच्या मर्जीने पसंत केलेली असते. तीचे सौंदर्य ठरवते तिची ननदबाई, तिची सासू,आणखी बरेच! कारण तिला कमी लेखण्यासाठी हाच एकमेव पैलू कामी येत असतो. हे लोकं तिला सौंदर्यहीन म्हणतात म्हणून ती वाईट नाहीच, फक्त यांनी तिला त्यांच्या सोयीने घोषित केले म्हणून!

आता तिला उगाच खराब दिसते, म्हणून बोलले तर चालणार नाही. त्यासाठी आपल्या बाजूचे, ओळखीचे एक ‘सो कॉल्ड’ बुजगावणे उभे केले जाते. जे घरच्या लोकांसाठी सौंदर्याची खाण असते. मग, या बुजगावन्याला सुंदर घोषित करून त्याच्याशी तुलना करून आपली सून बेकार म्हणून हवे तेव्हा घोषित करता येते. उद्देश एकच, की तू जास्त चांगली नाही; आणि तुझ्यापेक्षा चांगल्या मुली आहेत म्हणून तिला उडू न देता पंख वाढले की कापत राहणे.

‘सो कॉल्ड ब्युटी!’ म्हणजे काय? जे सर्वांगसुंदर नसतात ते दुसऱ्याच्या फायद्यासाठी गोष्टींचा डोंगर उभारून मेकअप करून सुंदर केले जातात. जी/जे प्रत्येक वर्तुळात एकतरी पहायला मिळतेच. वर्तुळ बदलले की सुंदर माणसे बदलतात, त्यांचे निकष,समीकरणे बदलतात. एक सुंदर अनेक कुरुप ही एकमेव टॅगलाइन असते.

तुम्हीपण एकदा आठवाच! तुमच्या पाहुणेमंडळीत आहे का कोणी असे सुंदर नमुना उदाहरण? ते तुम्ही नसणारच! जरी तुम्ही कितीही चांगले असो, जळकूट लोकांसाठी खराबच! आश्चर्याची गोष्ट अशी, की दुसऱ्या सर्कलमध्ये तुम्ही सुन्दरतेचा नमुना असू शकता ज्यांच्याशी अर्थाअर्थी तुमचा काहीच संबंध नसेल. तुम्ही कोणाला तरी कमी लेखण्यासाठी कामी यायले हेच काय ते तुमच्या सौंदर्याचे महत्व! मग त्या विवक्षित सर्कलमध्ये तुम्ही सुंदर असण्याची गरजही नाही.

गम्मत अशी आहे,की हे सौंदर्याचे नमुने त्यांच्या सो कॉल्ड जवळच्या लोकांना कधी सुंदर वाटतच नाहीत. मग ते सुंदर असो की नसो काही संबंध नाही.

पुरुषांच्या बाबतीत पण हे असे कमी अधिक प्रमाणात घडते. फरक इतकाच की पुरुष याकडे जास्त लक्ष घालत नाहीत; आणि जे बिचारे भावनिकदृष्ट्या हळवे असणारे लक्ष देतात ते कुठेतरी स्वतःला हरवून न्यूनगंडात उगाच खितपत पडतात.

सांगण्याचे तात्पर्य हे, की आपल्याच लोकांना कमी लेखण्यात कुठली आली मजा! शरीराच्या रंगाला, दिसण्याच्या मोहकतेपेक्षा माणसाच्या अंगचे चांगले गुण पाहणार आहात की नाही? सुंदर असतो तो हुशार असतोच असे नाही, आणि कुरूप असणे म्हणजे दुर्लक्षित करणे याला काही अर्थ आहे का? जे-जे चढवून अति सुंदर होण्याने फुगून गेले आहेत, कृपया त्यांनी जमिनिवर यावे. तुमचा मतलब सम्पला की तुमचे सौंदर्यही न परतणाऱ्या परतीच्या गावाकडे जाईल आणि ‘सौंदर्य’ बंदिवासात कायमचे बंद होईल. तुमची चुणूक दाखवायची असेल तर अंगभूत गुणात, कलेत, कामात दाखवा. केसाला फणी लावणे ठीक, पण फणीचा फण करून जीवनाची अस्सल मजा का गमावत आहात?

ज्यांनी अशी ही नकारात्मकता पसरवली त्यांना व ज्यांच्यावर या नकारात्मकतेचा परिणाम झाला त्यांच्यासाठी एकच सांगणे आहे, की या सम्पूर्ण विश्वात अमर आणि अजरामर काहीच नाही. नाशवंत सगळे आहे आणि उरणार इथे ती माती आहे. जे शरीरचं मातीचे असेल तर मग ती माती काळी काय आणि गोरी काय! तिची सुपीकता कशी व कामी कोणत्या येते हे महत्त्वाचे आहे.

सौंदर्याचा घमंड करणाऱ्यांनी त्याचा घमंड करायचा असेल तर करा; जर तुम्ही जगातले सर्वात सुंदर व्यक्ती असाल तर! उगाच ‘वासरात लंगडी गाय शहाणी!’ होण्यात मूर्खपणाच!

काय तुझी कांती

अन् हरवलेली भ्रांती

रंगवायला कलर घेशील किती

मिळेल अशी कशी शांती

चांगुलपणा सिद्ध करून

कामाची सर्वोत्कृष्टता तुझ्या

त्यातच आहे खरी क्रांती!

✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती(लेखक/कवी/व्याख्याते,नांदेड)मो-8806721206