भटक्याचं गारूड

28

नव्या पिढीतल्या चळवळीतील्या तरूणांनी पंखात बळ धरावे आणि आकाशात उंच उंच उडावे.नवे मार्ग शोधावेत,नव्या वाटा शोधाव्यात,रूळलेल्या वाटांनी आम्ही इथवर आलो.त्या वाटाही पायवाटा होत्या .आमच्यासाठी कुणी वाटा धुंडाळल्या नव्हत्या.नव्या तरूणांसाठी आम्ही वाटाडे झालो.त्यांनी या थोड्याशा मळलेल्या पायवाटांनी निघावे किंवा आपल्यासाठी नव्या वाटा धुंडाळाव्यात .परंतु हा उपेक्षित-वंचितांचा ताफा आता बाबासाहेबांच्या समतेचा झेंडा खांद्यावर घेऊन जयभीम बोलत निघावा.तो एकच मार्ग तारील.”

लक्ष्मण माने
(बंद दरवाजा दुसरी आवृत्ती मनोगत)
या देशात मानवाला गुलाम करणारी एक शोषणकारी व्यवस्था होती.या व्यवस्थेने देशातील पंच्यान्नव टक्के लोकांना गुलाम केले होते.सर्व स्त्रीया,शुद्र व अतिशुद्र , आदिवासी,भटके विमुक्त,यांना आपल्या मनुव्यवस्थेच्या कुप्रथेने दास्य श्रृखंलेत बंदिस्त केले होते.मानवीय सारे अधिकार नाकारून अमाणूषतेचा महापूर सारीकडे आला होता.

सारे जग ज्ञानाच्या कक्षा वाढवत असतांना भारतीय धार्मिक ग्रंथानी इथल्या माणसाला रूढीपरंपरेत जखडून ठेवले होते.सिंधु सभ्यता व बुध्द धम्माचा काळ सोडला तर हा देश सातत्याने गुलामगिरीत वावरत होता हे इतिहासावरून समजून घेता येते.मनुव्यवस्थेच्या अमानवीय कौर्यभरी संहितेने सारा देश भग्नावस्थेत,अन्याय,अत्याचाराच्या खाईत लोटला होता.माणूस हा भटक्या स्वरूपात होता.अश्मयुगीन मानवाचं जीवन भटक्या अवस्थेचं होतं.उदरनिर्वाहाच्या शोधार्थ भटकत राहणाऱ्या लोकांच्या समुहाला भटके लोक म्हणतात.सातत्याने निसर्गासोबत राहून आपले जीवन उन्नत व विकसित केले.तरी आजही भटक्या समुहाचा विकास पाहिजे ज्याप्रमाणात झाला नाही.आधुनिक काळातही भटक्याचं गारूड संपलं नाही तर ते सातत्याने वाढतच आहे. काही जमातीवर १८७१ला ब्रिटीश सरकारने गुन्हेगार जमाती कायद्यामध्ये भारतातील १९८ जमाती घोषित केल्या होत्या .या जमातीवर गुन्हेगारीचा जो शिक्का बसला तो प्रजासत्ताक भारतातही पुसला गेला नाही.

भटक्या समाजाचा विकास व्हावा अशी संविधानाची अपेक्षा असली तरी त्यांना त्यांचे अधिकार न देणारी व्यवस्था सरकारमध्ये असल्याने त्यांना त्यांचे अधिकार मिळत नाही.गावकुसाबाहेर राहणारा हा घटक दरी डोंगर कपारीत आपले जीवन व्यथीत करतो.शहराच्या उड्डाणपूलाचा आसरा घेतो. शहरातील चौकाचौकात वेगवेगळे साहित्य विकतो.स्वतंत्र देशात आपल्या जीवनाचे अस्तित्व शोधत तो सातत्याने फिरस्ती करत आहे.संसाराचा भार फेलवत फेलवत स्वतः साभाळतो.या समुहासमोर ध्येय नसल्याने समाजाची उन्नती होत नाही.भटक्या समाजातील मुलांचे भविष्य अंधकारमय होत आहे.आपला संसार डोईवर घेऊन तो सातत्याने फिरत आहे.सरकारच्या रेकार्डवर त्याचे नाव दर्ज नसल्याने त्यांना कोणतेच सरकारी फायदे घेता येत नाही.सरकारने भटक्या व विमुक्त जमातीच्या अभ्यासासाठी रेणेके आयोग २००८स्थापन केला.या आयोगानी भटक्या जमातीची संख्या ३१३ व विमुक्त जमातीची संख्या १९७ एवढी दाखवली .तसेच देशात जवळपास ५०० भटक्या जमातीची संख्या १०० दशलक्ष असल्याचे अध्ययन केले.या आयोगाचा रिपोर्ट अजूनपर्यत अमलात आणली नाही.

या जमातीच्या गुन्हेगारीची घोरफळ पिच्चा सोडत नाही.राजकारणात या समाजाचे नेतृत्व नसल्याने राजकिय पक्षावर यांचा फारसा प्रभाव पडत नाही.हा समाज शिक्षणापासून फार लांंब आहे.स्वतःच्या संस्कृतील पंरपरेला तो सोडायला तयार नाही.हा वर्ग समाजातील विकास प्रवाहातून बाहेर फेकल्या जात आहे.

भटक्या समाजाची कोणता धर्म हे माहित नाही पण त्यांना सरकार हिंदू म्हणून गणतो.जेव्हा हक्काची वेळ येते तेव्हा त्यांचे अस्तित्व नाकारतो.हिंदूचे व भटक्याचे रितीभाती वेगळ्या आहे.भटका समाज लढवय्य आहे.छत्रपती शिवाजी महारज यांच्या सैन्यात त्यांनी मोठा पराक्रम केला होता.
भटक्या समाजाने आता कुणाच्या आशेवर जगण्यापेक्षा संविधानातील अधिकाराचा उपयोग करून आपली लढाई सुरू करावी.आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षणाची कास धरावी.फुले -शाहू -आंबेडकर यांचे विचारपरिवर्तनाचा वसा अंगीकार करावा.वनवासी आश्रमापेक्षा शिक्षणवासी शाळेची कास धरावी.भटक्याचे पालं सातत्याने उठतं असल्याने त्याचे जीवन उध्दवस्त व मातीमोल होत असते.एखाद्या शहराचा आसरा घेऊन आपल्या मुलांचे योग्य शिक्षण करावे.आपला सामाजिक आर्थिक व राजकीय विकास करण्यासाठी आंबेडकरवादी विचाराची ऊर्जा मेंदूत घ्यावी.

वाट्याला आलेलं जीवन जगणं व मरणं एवढचं आयुष्य नाही.आपल्या जात पंचायतीची कट्टरता सोडून संविधानात्मक विचारांचे बीजरोपण पालावर होणे गरजेचे आहे.जातीला व धर्माला चिकटून राहून काही उपयोग नाही .तुमची उन्नती तुमच्या बळावरच करायची आहे.राजकिय पक्षाच्या फसव्या जाळ्यातून आपल्या. समाजातील पुढाऱ्याची सुटका करावी.
भटक्याचं आयुष्य बदलविण्यासाठी अनेक समाजसुधारक काम करत आहेत.पण काही समाजसुधारक सोडले तर बाकीचे समाजसुधारक यांचा भावनिक फायदा घेतात.धर्मवादी मेंदू तयार करून दंगलस्थित उपयोग करून घेतात.आपल्या समाजाचे दुःख वेशीवर मांडून नवे मूल्यमंथन करण्याचे काम लक्ष्मण माने,लक्ष्मण गायकवाड,आत्माराम कनीराम राठोड,एल के मडावी,पन्नालाल राजपूत,प्रकाश राठोड, संतोष पवार,अशोक पवार,रामनाथ चव्हाण,रेखा राठोड,के .ओ.गिऱ्हे,यांनी आपल्या लेखनातून या समाजाचे वास्तव देशासमोर मांडले आहे. लक्ष्मण माने यांनी बुध्द् धम्म स्वीकारून समाजाला बुध्दाच्या मार्गावर आणले आहे. अनेक लेखक व कवी या समाजाचे चित्रण आपल्या लेखनीतून रेखांखित करत आहेत.पण जी अस्सलता साहित्य कृतीत हवी ती दिसत नाही.

आज भटक्या व विमुक्त,आदिवासी यांनी नवे मूल्यमंथन करावे .आपले दलित्व नाकारून नवा आत्मविश्वास जागृत करावा. म. जोतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची महाऊर्जा घेऊन नवे सम्यक महाआंदोलन तयार करावे.देशातील प्रस्थापित पक्षांना आपले मत न विकता आपल्या मताचे मूल्य समजून उपयोग केला तर भटक्याचं गारूड समाप्त होऊ शकते.जर आपले अधिकार सरकार देत नसेल तर सैंवधानिक मार्गाने लढवून मिळवले पाहिजे.आपल्या समाजावर होणार अन्याय व अत्याचार यावर जबरदस्त प्रहार करून नवा क्रांतीकारी मार्ग स्वीकाला पाहिजे. यातून नवा परिवर्तनशील माणूस तयार होईल अशी अपेक्षा आहे. भटक्याचं गारूड संविधानाच्या प्रकाशपर्वातूनच समाप्त होऊ शकते.

“चलो साथीयो मिलकर लढना है।
अपनी जंजीरो को तोडना है।
नई उमंग लेकर खुद को जगाना है।
नई तरंग लेकर घुमत के जीवन को रूकाना है।”

✒️संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००