सुराज्य प्रतिज्ञा स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

25

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.20ऑगस्ट):-यंदा 15 ऑगस्ट रोजी आपल्या देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला. स्वातंत्र्यदिन म्हणजे देशभक्तीची, अभिमानाची भावना निर्माण होऊन साजरा केला जाणारा उत्सव.परंतु 15 ऑगस्ट चा तो देशभक्तीपर भावनेचा दिन सरला की भावना देखील सरून जाते. एक दिवसापूरत देशप्रेम आणि एकच दिवसाचा देशाबद्दलचा कळवळा…. परंतु या एक दिवसाच्या उसण्या देशप्रेमाने खरंच देश महासत्ता होईल का हो? हा प्रश्न उभा राहतो. यावर सुराज्य प्रतिज्ञा स्पर्धेतून हे देशप्रेम दैनंदिन जीवनात अबाधित कसे राहील यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी भारत फ्लॅग फाउंडेशन आणि स्वराज्य मीडिया ग्रुप यांच्या वतीने एक अभिनव उपक्रम 15 ऑगस्ट 2021 ते 25 ऑगस्ट 2021 या दरम्यान राबवण्यात येत आहे.गेल्या वर्षी कोरोनामुळे आपण स्वातंत्र्य दिन साजरा करू शकलो नव्हतो. यंदाही सावट होतेच. परंतु राष्ट्रप्रेमाची ज्योत तेवत ठेवणे हेही तसे महत्त्वाचेच आहे या भावनेतून
करोना बाबतचे सर्व नियम पाळत ऑनलाईन झेंडावंदन करण्यात आले. याचे प्रक्षेपण स्वराज्य न्यूज मीडिया या यु ट्यूब चॅनेलवर करण्यात आले होते.

यादिनी आजच्या काळाशी सुसंगत अशी अभिनव ‘सुराज्य प्रतिज्ञा’ आपण देशबांधवांना अर्पण करण्यात आली.अत्यंत समर्पक आणि ‘काळाची गरज’ असणाऱ्या या ‘सुराज्य प्रतिज्ञेचे’ प्रसारण स्वराज्य मीडिया 24 च्या यूट्यूब चॅनलवर झाले. 15 ऑगस्टच्या ऑनलाईन झेंडावंदन कार्यक्रमानंतर आता खऱ्या अर्थाने देशभक्तीचा एक नवा अध्याय सुरु झाला आहे.

या ऑनलाईन झेंडावंदन कार्यक्रमात घेतल्या जाणाऱ्या सुराज्य प्रतिज्ञ्रेवर एक विशेष स्पर्धा घेतली जात आहे. ज्यामध्ये सहभागी स्पर्धकाला स्वराज्य न्यूजच्या या कार्यक्रमात दिली जाणारी प्रतिज्ञा घरी म्हणायची आहे. ही प्रतिज्ञा म्हणताना ताठ उभे राहून प्रतिज्ञ्रेसाठी हात पुढे करून म्हणायची आहे. ही प्रतिज्ञा तुम्ही सहकुटुंबही म्हणू शकता. या प्रतिज्ञ्रेचे मोबाईल चित्रणही आपल्याला करायचे आहे. चित्रण करताना मोबाईल स्थिर असावा, आवाज सुस्पष्ट असावा व चित्रण क्लियर दिसावे याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे.

प्रतिज्ञा म्हणताना आपल्या जवळ एक झेंडा असणे अनिवार्य आहे. या स्पर्धेसाठी चौकाचौकात मिळणारा कागदी झेंडा किंवा मुलांनी स्वतः घरी रंगवून तयार केलेला तिरंगी झेंडा सुद्धा ध्वजवंदना साठी वापरला तरी चालेल. तिरंगी झेंड्या जवळ थांबून सुराज्य प्रतिज्ञेचे वाचन करावे. याचा व्हिडिओ swarajyanews24@gmail.com
या इमेल वर 15 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2021 दरम्यान पाठवायचा आहे. त्यातून निवडक व्हिडीओजला 27 ऑगस्टला नामांकन दिले जाईल. नामांकन झालेल्या व्हिडीओजला स्वराज्य मीडिया च्या यु ट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध करण्यात येईल. या व्हिडीओज मधून जनतेचे लाईक्स, परीक्षकांचे गुण याआधारे विजेते घोषित केले जातील.

आणि 29 ऑगस्ट 2021 रोजी प्रसारित होणाऱ्या स्वराज्य मीडियाच्या यूट्यूब चैनल च्या स्पेशल कार्यक्रमात विजेत्यांची नावे जाहीर केली जातील. विद्यार्थी, तरुण, सीनियर सिटीजन…. सर्वांसाठी ही स्पर्धा खुली असणार आहे. यासाठी वयाची अट नाही तसेच कसलेही शुल्कसुद्धा नाही.आनंदाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सहभागी स्पर्धकास डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अशी माहिती स्वराज्य न्यूज मीडियाचे मुख्य संपादक श्री सागर ननावरे व भारत फ्लॅग फाउंडेशन चे अध्यक्ष गिरीश मुरुडकर यांनी दिली.

या अभिनव उपक्रमाचे कौतुक मोठया प्रमाणात होत असून यासाठी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अभिनेता समीर धर्माधिकारी, प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ, अभिनेत्री दीप्ती नाईक, अभिनेता गणेश मयेकर यांनी विशेष सदिच्छा देत स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.