?भक्तांसोबतच पाऊसही होता सज्ज
✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883
चामोर्शी(दि.11सप्टेंबर):- वर्षभरापासून ज्या क्षणाची प्रतीक्षा भक्तांमध्ये असते, तो क्षण शुक्रवारी आला.श्रीगणेश चतुर्थीला शुक्रवारी श्री गणपतीचे आगमन घरोघरी झाले आणि श्रीगणेशोत्सवास प्रारंभ झाला. यावेळी भक्तांमध्ये दिसून येत असलेला उत्साह अवर्णनीय असाच होता. कोरोनाचे सगळे प्रोटोकॉल जपत आपल्या लाडक्या देवतेच्या आगमनाची प्रतीक्षा शुक्रवारी संपली आणि पुढचे दहा दिवस भक्त बाप्पाची आवभगत करण्यास सज्ज झाले.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदा कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध तेवढे कठोर नसले तरी प्रशासनाने सजगता म्हणून भक्तांना आपला जल्लोष आवरता घेण्याचे आवाहन केले. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी मूर्तिकारांकडून श्रीगणेशाची मूर्ती आपल्या स्थळी नेताना भक्तांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले होते. जल्लोषाला आवर घातला तरी भावना उचंबळणार नाही तो बाप्पाचा भक्त कसला म्हणून, मध्येच ‘गणपती बाप्पा मोरया’ अशा घोषणा दिल्या जात होत्या आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांचा उत्साह द्विगुणित केल्या जात होत्या.मूर्तिकारांकडून बाप्पाला घेऊन जाताना यंदा मिरवणुकीचा लवाजमा नव्हता.
दरवर्षीप्रमाणे ढोल-ताशा पथकांचा गजर झाला नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाप्पाला घरी नेण्यासाठी येणाऱ्या मंडळींमध्ये लहान मुलांचा समावेश दिसत नव्हता.
गर्दी टाळावी म्हणून भक्त समुहाने येण्याऐवजी दोन किंवा चारच जण बाप्पाला नेण्यासाठी आलेले दिसत होते.उत्सवावर निर्बंध असल्याने मंडळांमध्ये सजावटीचे साहित्य घेण्याची उत्सुकता दिसत नव्हती.घरगुती गणपतीच्या सजावटीवरही मर्यादा आल्याचे बाजारातील कमी झालेल्या गर्दीवरून दिसत होते.
नागरिकच कोरोनाचे नियम पाळत असल्याचे दिसत असल्याने पोलिसांची दमछाक होताना दिसली नाही.